9 ऑगस्ट म्हणजे काय? आचार्य अत्रे 9 ऑगस्टची माहिती सांगताना म्हणतात, ‘9 ऑगस्ट म्हणजे काय, हे ज्याला कळत नाही तो मुळी भारतीयच नाही. ज्याला 9 ऑगस्ट म्हणजे काय हे उलगडत  नाही असा म्हातारा जगायला लायक नाही. 9 ऑगस्टला याच दिवशी अखिल हिंदी जनता जागृत होऊन ब्रिटिश साम्राज्याशी दोन हात करायला आपल्या दोन पायांवर उभी राहिली.

मौलाना आझाद यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसखाली मुंबईत गवालिया टँक मैदानावर भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात पं. नेहरुंनी ‘चले जाव’चा ठराव मांडला. 8 ऑगस्टला तो प्रचंड मतांनी मंजूर झाला. वेळ रात्रीची होती. 73 वर्षांच्या गांधीजींनी घणाघाती असे दोन तासांचे भाषण केले.त्यात ‘करेंगे या मरेंगे’चा मंत्र उच्चारला. या क्षणापासून या देशातील प्रत्येक स्त्री-पुरुष आपण स्वतंत्र आहोत असे समजून वागावे, असा संदेश दिला. 

9 ऑगस्ट 1942 रोजी पहाटे पाच वाजून दोन मिनिटांनी मुंबईचे पोलीस आयुक्त बटलर बिर्ला भवनात आले. त्यांनी गांधीजींना अटक केली. त्यांच्या पाठोपाठ नेहरू, मौलाना आझाद, सरदार पटेल इत्यादी मुख्य पुढार्‍यांना अटक केली. गांधीजींचा संदेश सांगण्यासाठी कस्तुरबा गांधी यांनी तयारी दर्शवली, तेव्हा त्यांनाही अटक करण्यात आली. गवालिया टँक मैदानावर सकाळी आठ वाजता नेहरुंच्या हस्ते झेंडावंदन होणार होते. म्हणून हजारो लोक जमले होते. आपल्या नेत्यांना अटक केली आहे, हे लोकांना माहीत नव्हते. तितक्यात पोलिसांनी तिरंगा खाली ओढला. त्याच्या रक्षणासाठी गेलेल्या स्वयंसेवकांना बेदम मारहाण केली आणि तेव्हाच ऑगस्ट क्रांतीचे रणशिंग फुंकले. आपल्या पुढार्‍यांना तुरुंगात टाकल्याची बातमी वार्‍यासारखी सार्‍या देशात पसरली. परंतु, निःशस्त्र जनतेवर ब्रिटिशांनी भयानक लाठीमार केला. तसेच गोळ्या घालण्यासही मागे-पुढे पाहिले नाही.

तथापि, ज्या पुढार्‍यांची धरपकड झाली नव्हती, त्यांनी लढा कसा चालवायचा यावर विचारविनिमय केला. तेव्हा गुप्तपणे लढा द्यावा, असे ठरले. गांधीजींनी ‘गुप्तपणा’ हे पाप आहे, असे सूत्र सांगितले होते. पण, आता त्याला कोणीच महत्त्व दिले नाही. कारण, ही अखेरची संधी आहे, हे प्रत्येक भारतीय जाणून होता. चळवळ दुसर्‍या फळीतील नेत्यांच्या हातामध्ये गेली. त्यात अच्युतराव पटवर्धन, राम मनोहर लोहिया, सुचेता कृपलानी इत्यादींची एक समिती तयार करून प्रत्येकाने भूमीगत राहून लढा द्यायचे ठरवले. या काळात कार्यकर्त्यांमध्ये आणि जनतेमध्ये उत्साह निर्माण व्हावा, अशी एक घटना घडली. बिहारमधील हजारी बाग तुरुंगातून जयप्रकाश नारायण आणि त्यांच्या काही सहकार्‍यांनी जिवावर उदार होऊन पलायन केले. या नाट्यमय घटनेने 1942च्या चळवळीत नवे चैतन्य संचारले. त्याचबरोबर डॉ. लोहियांनी भूमीगत रेडिओ केंद्र सुरु केले होते. चळवळ हाहा म्हणता सार्‍या भारतभर पसरली. बिहारात प्रचंड उठाव झाला. तो दडपण्यासाठी सरकारला 15 दिवस लागले. संयुक्त प्रांतातील जनतेने सरकारी यंत्रणेवर खूप आघात केले. गुजरातमध्ये छोटूभाई पुराणी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी पोलीस चौक्यांवर हल्ले केले. कर्नाटक आणि आंध्रमध्येही पोलीस चौक्यांवर हल्ले झाले. बंगालमध्ये अनुशीलन समिती व फॉरवर्ड ब्लॉकच्या कार्यकर्त्यांनी झुंजारपणे चळवळ लढवली. चितगाव, ढाका येथील विद्यार्थ्यांनी निदर्शने केली. आसाम, आंध्र, तामिळनाडूत सैन्यावर हल्ले झाले. महाराष्ट्रात स्थापन झालेल्या प्रतिसरकारमुळे तर इंग्रजी सत्ता कोलमडली. क्रांतिसिंह नाना पाटील तीन वर्षे सातार्‍यावर राज्य करत होते. याशिवाय गमिनी काव्याचे तंत्र वापरून रेल्वे पूल, तारयंत्रणा ठप्प करणे इत्यादींमुळे इंग्रज सरकार हैराण झाले. एकंदरीत ऑगस्ट क्रांतीने इंग्रजांचे नीतीधैर्य खच्ची झाले. त्यांच्या प्रशासनाचा पोलादी सांगाडा खिळखिळा झाला. या क्रांतीमुळे ब्रिटिश साम्राज्याचे फुटलेले जहाज आता करू शकणार नाही, अशी नोंद गुप्त ब्रिटिशांनी अहवालात केली. 

या क्रांतीमुळे ब्रिटिशांचे युद्धसाहित्य व इतर महत्त्वाचे कारखाने बंद पडले. त्यातच कापड गिरण्या बंद पडल्याने ब्रिटिश सेनादलाला आवश्यक कपडे मिळत नव्हते. अत्यावश्यक वस्तूंचे उत्पादन 50 टक्के घटले. रेल्वे वाहतूक यंत्रणा कोलमडली. त्यामुळे कोळसा, पेट्रोल, कच्च्या मालाची टंचाई निर्माण झाली. परिणामी, लष्करी साहित्याचे उत्पादन धोक्यात आले. विशेष म्हणजे, या काळात दुसरे महायुद्ध सुरु होते. जपानी आक्रमणाचे ढग भारताच्या किनार्‍यावर जमले होते. एकंदरीत, इंग्रजी साम्राज्याचा सूर्य मावळायला ऑगस्ट क्रांती महत्तवपूर्ण ठरली. 

ऑगस्ट क्रांतीने ब्रिटिशांची केलेली वाताहत, त्यात त्यांच्या लंगड्या सामर्थ्याची त्यांना झालेली जाणीव. म्हणूनच की काय सर्व काँग्रेसच्या पुढार्‍यांना 15 जून 1945 रोजी मुक्त करून 15 ऑगस्ट 1947 साली इंग्रज हा देश सोडून गेले.            

(सौजन्य : सहज शिक्षण यू ट्यूब वाहिनी)

दिनांक 9 ऑगस्ट 2019 

इतर दिनविशेष : 

1) जागतिक मूळ देशवासी दिन. 

2) राष्ट्रीय महिला दिन - द. आफ्रिका

3) राष्ट्रीय दिन- सिंगापूर

4) 1901- मराठी रंगभूमीचे जनक विष्णुदास भावे यांचे निधन. 

5) 1909- ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कन्नड साहित्यिक डॉ. विनायक कृष्ण गोकाक यांचा जन्म.

अवश्य वाचा