जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभागाने आदिवासी समाजाचे दैवत क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या स्मरणार्थ 9 ऑगस्ट हा दिवस राज्यात ‘आदिवासी दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. खरे तर, बिरसा मुंडा यांनी आदिवासींच्या न्याय्य हक्कांसाठी इंग्रजांशी जो लढा दिला, त्याची ही पावतीच आहे.

‘आदिवासी’ हा खर्‍या अर्थाने जंगलांचा रक्षणकर्ता आहे. आदिवासी माणूस हा परिस्थितीने जरी गरीब असला, तरी तो मनाने श्रीमंत असतो. आदिवासी स्त्री-पुरुष हे स्वभावाने साधे-भोळे आणि स्वच्छ मनाचे असतात. ‘मोडेल पण वाकणार नाही’ हा बाणा त्यांनी पिढ्यान्पिढ्या जपला आहे. धनुर्विद्येच्या बळावर वनवासींनी मेवाडचे महाराजा महाराणा प्रताप यांना हळदीघाटाच्या युद्धात मदत करुन विजय मिळवण्यात योगदान दिले. यावरुन आदिवासी जमात ही लढवय्यीदेखील आहे, हे सिद्ध होते. आदिवासी ही जमात वेगवेगळ्या नावाने जगात ओळखली जाते. त्यांच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक प्रश्‍नांवर आंतरराष्ट्रीय पातळीवर विचार व्हावा व ‘ते’ प्रश्‍न मार्गी लागून आदिवासींचे जीवन सुखी व समृद्ध व्हावे, या उद्देशाने युनो या आंतरराष्ट्रीय संघटनेतर्फे 9 ऑगस्ट हा दिवस ‘जागतिक आदिवासी दिन’ म्हणून साजरा केला जातो. 

जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभागाने आदिवासी समाजाचे दैवत क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या स्मरणार्थ 9 ऑगस्ट हा दिवस राज्यात ‘आदिवासी दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. खरे तर, बिरसा मुंडा यांनी आदिवासींच्या न्याय्य हक्कांसाठी इंग्रजांशी जो लढा दिला, त्याची ही पावतीच आहे. बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी झारखंड राज्याच्या रांची जिल्ह्यातील उलिहातू या गावात झाला. कुटुंबाची आर्थिक स्थिती बेताची असल्याने लहानपणी ते जंगलात गुराखीचे काम करीत असत. बिरसा हे धनुर्विद्येत तरबेज होते. शालेय जीवनात ते बुद्धिमान असल्याने आईवडिलांनी त्यांना जर्मन मिशन स्कूलमध्ये दाखल केले. परंतु, या स्कूलमध्ये प्रवेश घेण्यासाठी तत्कालीन काळात ईसाई होणे अनिवार्य होते. म्हणून धर्मांतर करुन ईसाई धर्म स्वीकारल्याने त्यांचे नाव बिरसा डेविड असे झाले. परंतु, त्यांचे मन शिक्षणात रमले नाही. यास्तव त्यांनी जर्मन मिशन स्कूलचा त्याग केला. कालांतराने बिरसा हे प्रसिद्ध वैष्णवभक्त आनंद पांडे यांच्या सान्निध्यात आले. त्यांनी पुढे महाभारत, रामायण व अन्य हिंदू धर्मीय ग्रंथांचा सखोल अभ्यास केला. दरम्यान, बिरसा मुंडा यांनी पुनःश्‍च हिंदू धर्माचा स्वीकार करुन ईसाई धर्म त्यागला. आपल्या वडिलांचे जोरजबरदस्तीने धर्मांतर केल्याने बिरसाला इंग्रज अन् ख्रिस्ती मिशनरींचा मोठा राग होता.आपल्या तरुणपणी त्यांनी समविचारी लोकांचे संघटन उभे केले. अशिक्षित, भोळ्याभाबड्या आदिवासींवर इंग्रज सरकारकडून होणार्‍या अमानुष अत्याचाराविरुद्ध लढा देऊन त्यांनी इंग्रज अधिकार्‍यांना धडा शिकविण्याचा प्रण केला. आनंद पांडे यांना गुरुस्थानी मानून बिरसाने 1895मध्ये छोटा नागपूर क्षेत्रात फिरंग्यांविरुद्ध लढा उभारला. याशिवाय त्यांनी आपल्या आध्यात्मिक शक्तीने अनेकांच्या व्याधी बर्‍या केल्या, त्यामुळे आदिवासी लोक त्यांना दैवत मानत असत. मुंडा यांच्या प्रभावाने ख्रिस्ती धर्मांतर थांबवून अनेेकांनी पुनःश्‍च हिंदू धर्म स्वीकारला. यावरुन बिरसा हे हिंदूत्वप्रेमी होते, हे दृष्टोत्पत्तीस येते.

बिरसा मुडा यांची 19व्या शतकातले ‘जननायक’ म्हणून जनमानसात ख्याती होती. त्यांनी समस्त मुंडांना संघटित करुन इंग्रज सरकारकडे लगान माफीसाठी मागणी करुन त्यासाठी त्यांनी तीव्र आंदोलन केले. राजद्रोहाच्या आरोपाखाली इंग्रज सरकारने 3 मार्च 1900 रोजी चक्रधरपूर येथे बिरसासह 460 मुंडांची धरपकड करुन त्यांचा कारागृहात अमानुष छळ केला. त्यातच बिरसाचा 9 जून 1900 रोजी रांची कारागृहात मृत्यू झाला. त्यांच्या महान बलिदानासाठी लोकांनी त्यांना ‘जननायक’ हा किताब बहाल केला. त्यांच्या बलिदानाची सदैव भारतीयांना आठवण राहावी, या उद्देशाने केंद्र सरकारने रांची येथे बिरसा मुंडा केंद्रीय कारागृह आणि बिरसा मुंडा हवाई अड्डा उभारला. 

सर्वात वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे, बिरसा मुंडाचे तैलचित्र पार्लमेंटमध्ये लावण्यात आले आहे. बिरसा मुंडा यांनी स्वातंत्र्यलढ्यात दिलेल्या योगदानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, एका महान क्रांतिकारकाला बिहार, ओडिशा, छत्तीसगड, झारखंड व पश्‍चिम बंगालचे लोक आपले दैवत मानतात.

आदिवासी लोकांच्या सर्वांगिण विकासासाठी युती सरकार सर्वंकष प्रयत्न करीत आहे. अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींना आदिवासी उपयोजनेंतर्गत पाच टक्के निधी थेट अनुदान म्हणून देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. त्यामुळे आदिवासींच्या सक्षमीकरणास गती प्राप्त झाली आहे. इतकेच नव्हे तर, अंगणवाडी क्षेत्रातील प्रत्येक गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांच्या उत्तम आरोग्यासाठी डॉ. ए.पी.जे. अब्दुुल कलाम अमृत आहार योजना राबविणारे महाराष्ट्र हे देशात अत्योत्कृष्ट राज्य म्हणवले गेले आहे. पेसा कायदा तसेच अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वनवासी (वनहक्क) कायदा अंमलात आल्याने त्यांना वनोपजांवरील अधिकार कायद्याने मान्य झाले आहेत. आज सुमारे सात हजार वनवासींना एकूण दहा हजार एकर दळी जमिनींचे वाटप करण्यात आले आहे. आदिवासी समाजाच्या मुला-मुलींना परदेशात शिक्षण घेणे सुकर व्हावे, यासाठी पालकांच्या वार्षिक उत्पन्नाची मर्यादा 4.5 लाखांवरुन आता सहा लाख करण्यात आली आहे. आदिवासींचा सर्वांगीण विकास हेच युती सरकारचे मुख्य धोरण आहे.

स्वातंत्र्यसेनानी बिरसा मुंडा यांनी आदिवासींच्या हक्कांसाठी इंग्रज राजवटीविरुद्ध प्रखर लढा दिला. इतकेच नव्हे तर, त्यासाठी त्यांनी आपल्या प्राणाची आहुतीही दिली. आदिवासी-वनवासी लोकांच्या सर्वांगिण कल्याणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी विकास विभाग ठोस पावले उचलत आहेत. राज्यातील आदिवासींचे रोटी, कपडा, मकान, वनजमीन, शिक्षण व आरोग्य हे मूलभूत प्रश्‍न सरकारने सामाजिक जाणिवेतून सोडवावेत, म्हणजे हीच बिरसा मुंडा यांना खरी मानवंदना ठरेल. आदिवासी बंधू-भगिनी व विद्यार्थी मित्रांना आदिवासी दिनाच्या शुभेच्छा!

अवश्य वाचा

हृतिक रोशनने घेतले दर्शन.

शिवभक्तांची रांग.