भारतीय राजकारणात महिलांचे स्थान आगळवेगळे आहे. देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवणार्‍या मोजक्या महिलांमध्ये इंदिरा गांधी आणि सुषमा स्वराज यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. दोघीही खमक्या. हजरजबाबी तितक्याच बाणेदार. दोघींच्या नेतृत्त्वाची तुलना करता येणार नाही; परंतु, सुषमाजी यांना कोणतीही राजकीय पार्श्‍वभूमी नसताना त्यांनी मारलेली राजकीय मजल अनेकांना प्रेरणादायी ठरेल.

राजकारणात एक तर महिलांना अतिशय कमी प्रतिनिधित्त्व मिळते. नेतृत्त्वाची संधी मिळवणार्‍यांकडे सातत्याने वेगळ्या भावनेने पाहिले जाते. कर्मठ कुटुंबातली एखादी मुलगी राजकारणाचे क्षेत्र निवडते आणि हरियाणासारख्या राज्यात वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी कमी वयातली पहिली मंत्री म्हणून नाव कमावते, हे उदाहरणच तिचे कर्तृत्त्व सांगण्यासाठी पुरेसे ठरावे. सात वेळा खासदार, चार वेळा आमदार, माहिती-तंत्रज्ञान, परराष्ट्रमंत्रीपद, दिल्लीचे मुख्यमंत्रीपद अशी किती तरी पदे भूषवल्यानंतर आता राजकारणातून विश्रांती घेतलेली बरी, असे वाटणे हेच मुळात सुषमाजी यांचे वेगळेपण दाखवून देते. त्या राजकारणात अजातशत्रू होत्या. कुठे थांबायचे, हे त्यांना कळले होते. इतरांनी दूर करण्याअगोदर त्यांनी स्वतःच दूर होणे पसंत केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पंतप्रधानपदासाठी सुषमाजींचे नाव पुढे केले होते, यावरून त्यांच्या क्षमतेची आणि सर्वसमावेशकतेची कल्पना यायला हरकत नाही. अर्थात, सुषमाजींना आपल्या मर्यादांची जाणीव होती. राजकारणावर स्वत:ची छाप सोडणार्‍या भारतीय जनता पक्षाच्या ‘फायरब्रँड नेत्या’ म्हणून त्यांची ओळख होती. सुषमाजींना आव्हाने स्वीकारायला आवडत. त्यामुळेच सोनिया गांधी यांच्याविरोधात बेल्लारी लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली. त्यांनी त्या वेळी अवघ्या काही दिवसांमध्ये कन्नड भाषा आत्मसात केली होती. यावरून त्यांच्या बुद्धिमत्तेची कल्पना यायला हरकत नाही. 

लालकृष्ण अडवाणी यांच्या अतिशय जवळच्या म्हणून त्यांची ओळख होती. त्याला कारणही तसेच होते. अडवाणी जसे निर्वासित म्हणून भारतात आले तसेच सुषमाजींचे आई-वडीलही लाहोरहून भारतात आले होते. हरियाणात ते स्थायिक झाले. वडील कट्टर संघवादी असल्यामुळे त्यांच्यावर घरातच संघाचे संस्कार झाले. असे असले, तरी त्यांनी झापडबंद विचार कधीच स्वीकारले नाहीत. त्यांना राजकारणात संस्कृत आणि राज्यशास्त्र या विषयातल्या पदवीचा आणि विधी शाखेचा उपयोग झाला. संस्कृतवरील प्रभुत्त्वामुळे त्यांच्या भाषणात ओजस्वीपणा आला. राजकीय संदर्भ पक्के होत गेले. त्या काळात सामाजिक बंधने झुगारून आपल्या विचाराशी विचार जुळणार्‍याशी विवाह करण्याचे धाडस त्यांनी दाखवले. त्यांचे पती स्वराज हे समाजवादी विचारांचे. त्यांच्यावर जयप्रकाश नारायण यांच्या विचारांचा प्रभाव. सुषमाजींवरही काही काळ जयप्रकाशजींच्या विचारांचा प्रभाव होता. सुषमाजींच्या वक्तृत्वाची मोहिनी जगाला होती. त्याची पायाभरणी सुषमाजींनी शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात झाली होती, हे अनेकांना माहीत नसेल. त्या काळच्या सर्व वक्तृत्त्व स्पर्धा सुषमाजी आणि त्यांच्या पतीने गाजवल्या होत्या, हे फार कमी लोकांना माहीत असेल.

धाडसी निर्णय आणि सडेतोड प्रत्युत्तरासाठी प्रसिद्ध असलेल्या सुषमाजींनी परराष्ट्रमंत्री असताना स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या काळात परराष्ट्र मंत्रालयाला मानवी चेहरा लाभला. साध्या ट्विटरवरून केलेल्या तक्रारींची दखल या खात्याच्या मंत्री घेतात, असे अधिकार्‍यांच्या लक्षात आले, तेव्हा त्यांनाही सक्रिय व्हावे लागले. इराकमध्ये अडकलेल्या 39 परिचारिकांना सुखरूप मायदेशी आणण्यामध्ये त्यांची मुत्सद्देगिरी दिसून आली. परराष्ट्रमंत्री म्हणून काम करताना विविध देशांसोबतचे द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. सौदी अरेबियामध्ये कागदपत्रांच्या अडचणींमुळे अडकलेल्या एका भारतीयाने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आणि त्याआधी तसे ट्विट केले. त्यानंतर काही मिनिटांमध्येच सुषमाजींनी रियाधमधील भारतीय दूतावास शक्य ती सर्व मदत करेल, असे सांगत त्या व्यक्तीला धीर दिला. येमेनमध्ये अडकलेल्या शेकडो भारतीयांना सहीसलामत परत आणण्यातही त्यांची मुत्सद्देगिरी दिसून आली होती. लीबियामध्येही त्यांनी अशाच पद्धतीने मदत केली होती. ट्विटरवर येणार्‍या प्रत्येक संदेशाला उत्तर देत कार्यवाही करण्याची त्यांची कार्यपद्धती या काळामध्ये खूप चर्चेत राहिली. 

पाकिस्तानच्या तुरुंगामध्ये तीन-चार वर्षे खितपत पडलेला हमीद अन्सारी भारतात परतल्यानंतर, त्याने स्वराज यांची भेट घेतली आणि त्यांचे आभार मानले. पाकिस्तानच्याच तुरुंगामध्ये असणार्‍या कुलभूषण जाधव यांच्या परिवाराला पदावर नसणार्‍या स्वराज यांचाच आधार वाटत होता. जाधव कुटुंबियांनी जुलै महिन्यातच स्वराज यांची भेट घेतली होती. सुषमा यांचे वक्तृत्व अनुभवणे हा एक समृद्ध करणारा अनुभव होता. याच वर्षी मार्चमध्ये अबुधाबीमध्ये झालेल्या इस्लामिक देशांच्या परिषदेत त्यांनी केलेले भाषण गाजले होते. पुरुषधार्जिण्या, धार्मिक अतिरेकासाठी ओळखल्या जाणार्‍या देशांच्या प्रतिनिधींच्या गराड्यात भारतीय वेशात आणि आभूषणांमध्ये स्वत:ला सादर करणार्‍या सुषमा स्वराज अगदी शोभून दिसल्या. ‘इस्लामच्या नावे राज्यशकट हाकणारा एखादा देश हिंसाचाराचा आधार घेत असेल, दहशतवादास सक्रिय मदत करत असेल, तर इस्लामी देशांच्या संघटनेने त्याची दखल घ्यायला हवी, हे स्वराज यांनी त्यावेळी निक्षून सांगितले. भारताचा लढा हा इस्लाम किंवा एका ठराविक धर्माविरोधात नाही, तर त्या धर्माचा आधार घेत हिंसेचे निर्घृण आणि निलाजरे समर्थन करणार्‍यांच्या, अश्रापांचे जीव घेणार्‍यांविरोधात तो आहे, हे त्यांचे म्हणणे अमान्य करणे मुस्लिम राष्ट्रांच्या परिषदेला अशक्य ठरले होते.

सप्टेंबर 2018 मध्ये संयुक्त राष्ट्रांमध्ये सुषमाजींनी केलेले भाषणही गाजले. ‘निर्सगाचा र्‍हास करून ज्या विकसित देशांनी स्वत:ची प्रगती साधली आहे, ते आता आपली जबाबदारी झटकू शकत नाहीत. मोठ्या देशांनी छोट्या देशांना मदत केली पाहिजे,’ असे स्वराज म्हणाल्या होत्या. मानवी तस्करीला बळी पडलेल्या अनेकांसाठी सुषमाजी परराष्ट्रमंत्री म्हणून तारणहार ठरल्या. परदेशी जाऊ इच्छिणार्‍यांसाठी परराष्ट्र मंत्रालयामार्फत मार्गदर्शन, कौशल्य शिक्षण यांची कवाडे स्वराज यांनी खुली केली. भारतीय महिलांशी विवाह करून नंतर त्यांना इथेच सोडून परदेशी जाणारे अनिवासी भारतीय वा नवविवाहित पत्नींना परदेशी नेऊन, त्यांचा छळ करून सोडून देणारे पुरुष यांच्या भारतातल्या मालमत्ता जप्त करण्यासाठी स्वराज यांनी झटून कायदा करवून घेतला. स्वराज यांच्या काळामध्ये पश्‍चिम आशिया आणि आफ्रिकेतल्या देशांबरोबर भारताचे संबंध चांगल्या पद्धतीने सुधारले. त्याचबरोबर इराणबरोबरच्या संबंधांमध्येही प्रगती झाली. अमेरिकेबरोबरची सामरिक भागीदारी वाढत गेली. अमेरिकेचे तत्कालीन परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांच्याबरोबर त्यांचे मित्रत्वाचे संबंध होते. चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांच्याबरोबर असलेल्या संबंधांमुळे दोन्ही देशांमधली परिस्थिती कायम नियंत्रणात राहिली. सुषमा स्वराज यांच्या मुत्सद्देगिरीचे यश म्हणजे अबुधाबीमध्ये काही महिन्यांपूर्वीच झालेल्या इस्लामिक देशांच्या परिषदेच्या उद्घाटनासाठी त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होतं. या व्यासपीठावरून बोलणार्‍या त्या पहिल्या भारतीय परराष्ट्र मंत्री ठरल्या आणि ही बाब नक्कीच गौरवास्पद होती.

लोकसभेत कलम 370 रद्द करणारे विधेयक मंजूर झाल्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करणारे ट्विट केले. ‘मैं अपने जीवन में इस दिन को देखने की प्रतीक्षा कर रही थी’ हे त्यांचे अखेरचे शब्द होते. हा दिवस पाहूनच जणू त्यांनी या जगाचा निरोप घेतला. उत्कृष्ट वक्त्या, प्रभावी संसदपटू, कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी असलेल्या सुषमाजी भाजपच्या पहिल्या फळीतल्या नेत्यांमध्ये अतिशय सक्रिय होत्या. पासपोर्ट गहाळ झाल्याने पत्नीशिवाय हनिमूनवर जावे लागलेल्या एका नवरोबाच्या मदतीला परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज धावून आल्या होत्या. बर्लिनमध्ये एका भारतीय तरुणीचा पासपोर्ट आणि पैसे हरवल्यानंतर तिने ट्विट करून सुषमा स्वराज यांच्याकडे मदत मागितली होती. परराष्ट्र मंत्रालयाला सामान्य माणसाच्या जवळ आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. तुम्ही मंगळवारही अडकलात तरी भारतीय दूतावास तुमच्या मदतीसाठी धावून येईल, अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले होते. पाकिस्तानमध्ये राहात असलेल्या कर्णबधीर आणि मूकबधीर गीतावर असलेले त्यांचे प्रेम कायम आठवणीत राहणारे आहे. मोदी यांच्या दुसर्‍या सत्तापर्वात स्वराज यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाची जबाबदारी एस. जयशंकर यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली होती. जयशकंर यांनीदेखील पदभार स्वीकारल्यानंतर स्वराज यांचा वारसा आपण पुढे नेणार असून, आपल्यासाठी ही अभिमानास्पद बाब असल्याचे म्हटले होते. अशा या रणरागिणीला शेवटचे अभिवादन करताना वाईट वाटत आहे.

अवश्य वाचा

एमसीएफ आता दोन वर्षांचा

पालेभाज्यांच्या दरात घसरण