भारतीय साहित्याच्या इतिहासात 12 नोव्हेंबर 1913 हा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला. याच दिवशी साहित्यातील सर्वोच्च असे नोबेल पारितोषिक त्यांच्या ‘गीतांजली’ या काव्यास मिळाले. गुलामगिरीत खितपत पडणार्‍या भारतीयांसाठी हा सुखद दिवस ज्यांनी उगवला, त्यांचे नाव विश्‍वकवी रवींद्रनाथ टागोर. पाचवीत असतानाच त्यांनी कमळाच्या फुलावर लिहिलेली सुंदर कविता पाहून शिक्षकांचा विश्‍वासच बसला नाही. तेव्हा छोट्या रवींद्रने हेडमास्तरांच्या टेबलावरच ‘सत्यनिष्ठा’ या विषयावर एक कविता रचली. हाच बालकवी पुढे  विश्‍वकवी म्हणून प्रसिद्ध झाला. वयाच्या  पाचव्या वर्षांपासून ते ऐंशीव्या वयापर्यंत  त्यांनी अद्वितीय अशी साहित्यनिर्मिती केली. त्यात गाणी, कविता, नाटके, कादंबर्‍या, निबंध, खंडकाव्ये, अध्यात्मिक  प्रवचने, प्रवास वर्णने, समीक्षा, प्रबंध आणि बरेच काही साहित्यात जे-जे आहे ते-ते रवींद्रनाथांकडे आहे.

रवींद्रनाथांचा जन्म 7 मे 1861 रोजी कोलकात्यात झाला. वडील देवेंद्रनाथ जमीनदार होते. रवींद्रनाथ ‘ओरियंटल सेमिनरी, नॉर्मल स्कूल’ अशा वेगवेगळ्या  शाळेत गेले. शाळेत त्यांचे मन कधीच रमले नाही. कारण, शाळेत सार्‍या वातावरणात इंग्रजी प्रार्थनेतून इंग्रजांची निष्ठा ठेवण्यावर आधारित होती. याचा परिणाम अनेक भारतीय विद्यार्थ्यांवर होत असे; तेसुद्धा पाश्‍चात्य, साहित्य, तत्त्वज्ञान, संगीत यावर प्रेम करीत. याला अपवाद रवींद्रनाथांचा. पाश्‍चात्य वातावरणात त्यांचे मन अजिबात रमायचे नाही. आणि, म्हणूनच निसर्ग हे एक मोठे विद्यापीठ आहे, असे मनोमन त्यांनी मानले. बालवयातच वडिलांबरोबर हिमालयाची यात्रा केल्यामुळे निसर्गाला जवळून पाहण्याची संधी त्यांना मिळाली. बॅरिस्टरच्या अभ्यासासाठी ते इंग्लंडला गेले. पण, बॅरिस्टरचा अभ्यास केला नाही. कलेत ते रमले. त्यांचे ‘साध्य संगीत’ नावाचे काव्य वाचून बंकिमचंद्रांनी त्यांचे हार घालून कौतुक केले. 

आजच्या नवीन पिढीला पाश्‍चिमात्यांचे असे आकर्षण आहे, तसे त्या काळातील पिढीलाही पाश्‍चात्य प्रेमाचा रोग जडला होता. आपल्याच लोकांना आपलीच भाषा, आपला पेव, आपले साहित्य हीन दर्जाचे वाटू लागले होते. यावर सडेतोड टीका कलकत्याच्या सावित्री ग्रंथालयात भरलेल्या एका सभेत रवींद्रनाथांनी केली. या ठिकाणी जमलेले बरेचसे भारतीय हे आंग्ल शिक्षित असून, इंग्रज सरकारचे नोकर असून, रावबहाद्दूर, रावसाहेब ज्ञानाने प्रतिष्ठित झाले होते. त्यांना रवींद्रनाथांचे स्वदेश प्रेम बिलकुल आवडले नाही. इंग्रजी भाषेचे तर तेव्हा इतके स्तोम माजले होते की, राष्ट्रीय सभेची अधिवेशने इंग्रजीतून चालत असत. तेव्हा बंगालमध्ये भरलेल्या बंगाल  काँग्रेसच्या अधिवेशनाथ बंगालीतूनच भाषणे आणि इतर कामकाज करायचे, असा ठराव रवींद्रनाथांनी मांडला. पण, गंमत अशी की, त्याला बंगालवासियांनीच विरोध केला. पण, तरीही इंग्रजीणार्‍यांनी त्याचा अनुवाद बंगालीत करायचा, असा ठराव त्यांनी मंजूर करून घेतला. त्या काळचे प्रतिष्ठित साहित्यिक उगाच सरकारचा आपल्यावर रोष नको म्हणून राजकारणापासून चार हात दूर राहात, पण रवींद्रनाथ याला अपवाद ठरले. टिळकांवर खटला भरला तेव्हा त्यांनी कोलकात्यात जहाल भाषण केले. ‘वंगभंग आंदोलना’त त्यांनी स्वदेशीचा प्रचार करून स्वदेशी वस्तूंचे दुकान सुरु करून स्वतः खादी वापरू लागले. जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ त्यांनी आपल्या ‘सर’ या पदवीचा त्याग केला. कोलकात्यात शिवजयंतीही सुरु केली. त्याचे परिणाम त्यांना तात्काळ मिळाले. कारण, त्यानंतर ते इंग्लंडला गेले असता  ब्रिटिशांचे हेर त्यांच्या मागे  होते. पुढे फ्रान्सला गेल्यावरही तोच अनुभव. अमेरिकेत तर त्यांना भाषणे करण्यासाठी नकार दिला. पण, म्हणून काही त्यांनी इंग्रजांच्या पुढे नमते घेतले नाही.

1937 मध्ये त्यांचा अमृतमहोत्सव मोठ्या धूमधडाक्यात भारतभर साजरा झाला. डी.लिट., ऑक्सफर्डची डॉक्टरेट असे अनेक मानसन्मान त्यांना मिळाले. अखेर 7 ऑगस्ट 1941 रोजी त्यांचे निधन झाले.

(सौजन्य ः सहज शिक्षण यू ट्यूब वाहिनी)

दिनांक 7 ऑगस्ट 2019 

आजचे इतिहासातील इतर दिनविशेष : 

1) 1782-  जर्मन रसायन शास्त्रज्ञ अँड्रियो सिगिसमंड मॅमाग्रोक यांचे निधन.

2) 1890- ‘मोदवृत्त’ या जहाल वृत्तपत्राचा पहिला अंक प्रसिद्ध.

3) 1947- ‘बेस्ट’ ही बससेवा मुंबई महापालिकेने सुरु केली.

4) 1948- उस्मानाबाद जिल्ह्यातील 62 खेड्यांनी निजामाची सत्ता झुगारून प्रतिसरकार स्थापून स्वातंत्र्य पुकारले.

5) 1976- व्हामकिंग 2 हे अंतराळयान मंगळाच्या कक्षेत आले.

अवश्य वाचा