लाडक्या बाप्पांच्या आगमनाची तयारी सगळीकडेच अगदी जोमाने सूरू झाली आहे. दरवर्षी आपण बाप्पांना वाजत गाजत घरी आणतो,  त्यांची भक्तीभावाने पूजा करतो आणि पुढच्या वर्षी लवकर या अशी विनंती करून पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांचे पाण्यात विसर्जन करून निरोप घेतो. गेल्या काही वर्षांपासून पर्यावरणप्रेमाच्या नावाखाली पर्यावरण प्रेमी आणि पुरोगामी मंडळींकडून गणेशमूर्तीचे विसर्जन वाहत्या पाण्यात न करता कृत्रिम हौदात करण्याचे तर काही ठिकाणी मूर्तीदान करण्याचे आवाहन केले जाते. गणेश मुर्तीचे विसर्जन वाहत्या पाण्यात का करावे यामागील शास्त्र ज्ञात नसल्यामुळे काही सुजाण मंडळीही या आवाहनाला प्रतिसाद देताना दिसतात. गणेश चतुर्थीच्या काळात भक्तांनी भक्तिभावाने केलेल्या पूजनामुळे श्रीच्या मूर्तीत श्री गणेशाचे चैतन्य मोठ्या प्रमाणात आलेले असते. अशी मूर्ती पाण्यात विसर्जित केल्यामूळे हे चैतन्य पाण्याद्वारे सर्वदूर पसरते आणि त्या भागातील सर्वांना त्याचा लाभ होतो. याउलट  हौदातील पाणी वाहते नसल्यामुळे हा लाभ आपल्याला होत नाही. शिवाय या गणेशमूर्ती पूर्णपणे पाण्यात विरघळण्याआधीच काढून घेऊन त्यांची अशास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावली जाते. काही ठिकाणी तर या मूर्ती खाणी बुजवण्यासाठी तर काही ठिकाणी त्या खाडीमध्ये फेकल्या जात असल्याचे व्हिडीओज दर वर्षी सोशल मीडियातून प्रसारित होतात. आपल्या श्रद्धास्थानाची होणारी घोर विटंबना पाहवत नाही, त्यामुळे गणेशमूर्तींचं विसर्जन वाहत्या पाण्यात किंवा नैसर्गिक स्रोतांतच करणे योग्य आहे.

अवश्य वाचा