थोड्याच दिवसांत श्री गणरायांचे आगमन होणार असल्याने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांची लगबग सुरु झाली आहे. उत्सवासाठी लोकवर्गणी गोळा करणे, सजावट करणे, दहा दिवसांच्या कार्यक्रमांची आखणी करणे, आगमन-विसर्जनाची सिद्धता करणे अशा या ना त्या अनेक गोष्टी मंडळांच्या नियोजनात आहेत. आपण केलेल्या सजावटीचे, कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीचे लोकांनी कौतुक करावे ही सुप्त भावनाही यामध्ये दडलेली असते. गणेशोत्सव जसा सार्वजानिक उत्सव आहे तशी त्याला अध्यात्मिक पार्श्वभूमीही आहे. गणरायाला भपकेबाज सजावटीची किंवा प्रचंड रोषणाईची मुळीच आवड नसते. त्याला हवा असतो तो भक्ताचा त्याच्याप्रती असलेला भाव. जो भक्त केवळ त्याची कृपा संपादन करण्यासाठी उत्सवकाळात निष्काम भावनेने जीवाचे रान करतो. श्री गणेश त्याच्यावर नक्कीच कृपा करतात.  श्रीगणेश ही ६४ कला आणि १४ विद्यांची देवता आहे. गणेशाच्या आगमनाच्या निमित्ताने आपल्यातील कलागुणांची वृद्धी करण्यासाठीही प्रयत्न करूया. लंबोदर जसा आपल्या भक्तांच्या चुका पोटात घेतो तशी क्षमाशीलता आपल्यामध्ये येण्यासाठी प्रयत्न करूया. श्री गणेश जसा सकळ विघ्ननाशक आहे, तसे जीवनमार्गात येणाऱ्या संकटांना धीरोदात्तपणे परतवून लावण्यासाठी आपल्यात क्षात्रवृत्ती आणण्याचा प्रयत्न करूया. या गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपल्यातील दुर्गुणांचा नाश करून गुणांची वृद्धी करण्याचा संकल्प करूया !

अवश्य वाचा