सांगली, दि. 14, 

दोन दिवसात सांगली शहर पुन्हा स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी यंत्रणा गतीमान केल्या असून त्यासाठी महानगरपालिकेला आवश्यक ती सर्व यंत्र सामुग्री, सर्व मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाईल, असे जिल्हाधिकारी  डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले.

आज  सकाळी त्यांनी, टिंबर एरीयातील अग्नीशामक दल, हिराबाग पंपींग स्टेशन, पै. ज्योतिराम दादा आखाडा येथील पंप हाऊस, सिध्दार्थनगर, गणपती पेठ, गवळी गल्ली आदि ठिकाणी भेट देवून महापालिकेतर्फे करण्यात येत असलेल्या पाणीपुरवठा व स्वच्छता कामाची पाहणी करून आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत महानगरपालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस होते.

या पाहणीमध्ये जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी शहर स्वच्छतेचे नियोजन काय आहे, सक्शन यंत्रणा काय आहे याबाबतची माहिती घेवून नाले, सेफ्टीक टँक यांची मोठ्या प्रमाणावर स्वच्छता करा, मेलेल्या जनावरांची विल्हेवाट शास्त्रीय पध्दतीने लावा, असे सांगून महानगरपालिकेला कोणत्या सामग्रीची आवश्यकता आहे, पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध आहे का याची माहिती घेतली. यावेळी त्यांनी संपूर्ण शहर लवकरात लवकर स्वच्छ करण्यासाठी सर्व टीम कामाला लावा, पंपींग स्टेशन मधील गाळ काढून लवकरात लवकर यंत्रणा सुरू करा. पाणीपुरवठा तत्काळ सुरू करण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लावा. काही मदत आवश्यक असल्यास सांगा, असे सांगून ज्या ठिकाणी पाणीपुरवठा सुरू नाही त्या ठिकाणी स्वच्छ पाणी टँकर्सद्वारे सढळहस्ते द्या. लोकांना कोणत्याही स्थितीत पिण्याच्या पाण्याची कमतरता भासणार नाही याची सर्वतोपरी दक्षता घ्या, असे सांगितले. सांगली पुन्हा पूर्वीप्रमाणेच स्वच्छ सुंदर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक ती सर्व मदत, यंत्र सामुग्री उपलब्ध करून देण्यात येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी दिला.

महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी मनुष्यबळ पुरेसे उपलब्ध आहे. जेटींग मशिनने गाळ काढण्यात येत आहे. स्वच्छतेसाठी मोठ्या प्रमाणावर डोझर सारख्या मशिनरीची आवश्यकता आहे. रोड स्वीपींग मशिनचीही आवश्यकता असल्याचे सांगितले. बकेट मशिन पनवेल महानगरपालिकेकडून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापनाकरीता महापालिकेव्यतिरीक्त ९६ वाहने बाहेरून आली असून यात बृहन्मुंबई महापालिकेकडून २४ व सांगलीतील खाजगी मक्तेदारांकडून उपलब्ध झालेल्या ४३ वाहनांचा समावेश आहे. यामध्ये सक्शन वाहन, फायर फायटर, जेटींग मशिन, वॉटर टँकर, डंपर, जेसीबी, बस, डोझर, ट्रॅक्टर ट्रॉली आदि वाहनांचा समावेश आहे.

अवश्य वाचा