पेझारी, दि. 13

अलिबाग तालुक्यातील आंबेपूर-पेझारी या ग्रामपंचायतीची ग्रामसभा आज 13 ऑगस्ट रोजी सकाळी 11-00 वाजता ना. ना. पाटील हायस्कूल पोयनाड येथील श्रीमती सुलभा पाटील सभागृहात संपन्न झाली. यावेळी नुकताच झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे कोल्हापूर-सांगली येथील जनतेचे अपरिमित नुकसान झालेल्या पुरग्रस्तांच्या मदतीसाठी आंबेपूर सरपंच सुमना पाटील, अलिबाग पंचायत समितीच्या सदस्या रचना थोरे-पाटील यांनी पुरग्रस्तांना आर्थिक व वस्तुरुपाने भरीव मदत करावी असे आवाहन केले.

आंबेपूर ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत प्रथम या पुरग्रस्तांतील मृत्यु पावलेल्या निष्पाप नागरीकांना उपस्थित नागरीकांच्या वतीने दुखवट्याचा ठराव घेण्यात आला व त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली तर नवनिर्वाचित आंबेपूरच्या सरपंच सुमना सवाई पाटील यांनी सरपंच पदाच्या कारकिर्दीत अल्पावधीत सुरु केलेल्या ग्रामपंचायत विभागांतील विकास कामांबाबत त्यांचा अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला.

आंबेपूरच्या या ग्रामसभेत ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्यामुळे आंबेपूरच्या काही समस्यांबाबत अनेक नागरीकांनी आपापल्या वॉर्डातील समस्या मांडून सरपंच सुमना पाटील यांना निदर्शनास आणून दिल्या असता आपण तात्काळ भेटी देऊन त्या त्वरीत सोडवू असे आश्‍वासन देऊन आंबेपूरच्या लोकसंख्येपेक्षा अनेक कंपन्यांमध्ये काम करणार्‍या कामगारांचा मोठा लोंढा भाडेतत्त्वावर आलेला असल्याने पाणी, कचरा तसेच इतर समस्यांना ग्रामपंचायतीला सामोरे जावे लागत असल्याची त्यांनी यावेळी खंत व्यक्त केली तरीदेखील तुम्हा नागरीकांच्या सहकार्याने त्याही समस्या आपण सोडवू असे मत व्यक्त केले.

आज झालेल्या ग्रामसभेत परिसरांतील लाईटच्या प्रश्‍नाबाबत, तसेच काही परिसरांतील पाणी प्रश्‍नाबाबत अनेक ग्रामस्थांनी आपले विचार व्यक्त करुन आपल्या भावना सभेपुढे मांडल्या असताना ग्रामसभेच्या संबंधित काही अधिकारी उपस्थित नसल्याबाबत संतापही व्यक्त केला व पुढील होणार्‍या ग्रामसभेसाठी सर्वांना उपस्थित राहण्याबाबत सूचित करण्यात आले.

पुरग्रस्तांना ग्रामस्थांकडून देण्यात येणारी मदत ही 16 ऑगस्टपर्यंत आंबेपूर ग्रामपंचायत कार्यालयात जमा करावी अशी चर्चा सर्वानुमते यावेळी ठरविण्यात आली.

आंबेपूर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक एन. के. ठाकूर यांनी ही ग्रामसभा शासनाच्या नियमानुसार आयोजित असल्याचे सांगून सर्व ग्रामस्थांचे सुरुवातीलाच स्वागत करुन शेवटी ग्रामस्थांचे आभार व्यक्त केले.

या ग्रामसभेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून अलिबाग पंचायत समिती सदस्या रचना निलेश थोरे-पाटील, पोयनाड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पद्मश्री अंधळकर, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीधर भुस्कुटे, उपसरपंच सौ. ममता आशिष पाटील, माजी सरपंच शैलेश पाटील, माजी उपसरपंच सुनिल राऊत, माजी सदस्य यशवंत पाटील, महेंद्र पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ज्येष्ठ नागरीक, मॉर्निंग वॉक ग्रुप सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अवश्य वाचा