रोहा 

अधिकच्या हव्यासापोटी आर्थिक फसवणूक होण्याचे प्रकार नविन नाहीत.यामध्ये बीजांकुर ग्रुप ऑफ कंपनीची भर झाली असून या कंपनीच्या संचालकांनी तसेच स्थानिक एजेंट यांनी पन्नास लाखाहून अधिक रकमेची फसवणूक केल्याची फिर्याद सिद्धेश उल्हास पालकर रा रातवड यांनी दाखल केली असून रोहा पोलीस ठाण्यात भादवि कलम ४२०,४०६,४०९,४६७,४६८,४७१,१२० ब,महाराष्ट्र भाडे नियंत्रण कायदा या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देशातील जनता यापूर्वी देखील विविध प्रकारच्या कंपन्यांच्या प्रलोभनांना बळी पडून भिकेकंगाल झाली आहे.बीजांकुर कंपनी चित्रपट निर्मिती, हॉस्पिटल उभारणी, शॉपिंग कॉम्प्लेक्स, बांधकाम क्षेत्रात गुंतवणूक करत असून वार्षिक १६% या दराने मासिक परतावा देण्याचे आश्वासन गुंतवणूकदाराना देण्यात आले होते. बँकांमार्फत मिळणारे ६ ते ७ टक्के व्याजापेक्षा हा परतावा आकर्षक वाटल्याने अनेकांनी या कंपनीत आपली जमापुंजी गुंतवली होती.पण कंपनीकडून परतावा मिळत नसल्याने हवालदिल झालेल्या गुंतवणूकदारांनी पोलिस ठाण्यात कंपनी संचालक सत्यवान उर्फ सत्तू कृष्णा केणी,व्ही आर दिरधर,मुख्य व्यवस्थापक संतोष रामचंद्र म्हात्रे रा उरण तसेच स्थानिक एजेंट अंतुष दामोदर भगत रा बोरघर,संदेश दत्ताराम खेरटकर रा लांढर तसेच अन्य तीन ते चार अज्ञात संचालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगड पोलिस निरीक्षक एम एम पाटील या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.

अवश्य वाचा