राष्ट्रीय सणांच्या दुसर्‍या दिवशी रस्त्यावर इतस्तत: पडलेले राष्ट्रध्वज पाहिल्यावर बालक्रांतीकारक शिरीषकुमारची प्रकर्षाने आठवण येते. महात्मा गांधीच्या १९४२च्या ‘चले जाव’ आंदोलनाअंतर्गत नंदुरबार येथे निघालेल्या प्रभातफेरीत सहभागी झालेला इयत्ता आठवीत शिकणारा हा लहानगा मुलगा इंग्रज अधिकार्‍याला ठणकावून सांगतो, ‘हिंमत असेल, तर माझ्यावर गोळी झाड’. निष्ठूर पोलीस अधिकार्‍याच्या ३ गोळ्यांनी गतप्राण झालेला शिरीषकुमार धारातीर्थी पडला, तरी त्याने हातातील राष्ट्रध्वज जमीनीवर पडू दिला नाही. कुठून आली एव्हढी देशभक्ती ? २६ जानेवारी किंवा १५ ऑगस्टनंतर अनेक ठिकाणी कागदी राष्ट्रध्वज फाटलेल्या अवस्थेत रस्त्यावर, केराच्या ढीगार्‍यात, गटारात पडलेले आढळतात. झेंडावंदनाच्या दिनी राष्ट्रध्वज फडकवतांना आपल्याला राष्ट्राचा नागरिक म्हणून अभिमान वाटतो; मात्र तोच राष्ट्रध्वज रस्त्यावर पडलेला, फाटलेला बघून आपल्याला काहीच कसे वाटत नाही ? राष्ट्रध्वज हा राष्ट्राचे प्रतीक आहे, तसाच तो राष्ट्रासाठी बलीदान दिलेल्या राष्ट्रपुरुषांच्या बलीदानाचेही प्रतीक आहे. आज राष्ट्रध्वजाची होणारी अवहेलना पाहून क्रांतीकारकांच्या आत्म्याला किती वेदना होत असतील !

अवश्य वाचा

मोबाईल हिसकावून चोरटे पसार

गाडीची काच फोडून ऐवज लंपास