अलिबाग 

गेल्या दहा पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात सुरु असलेली अतिवृष्टी, नद्यांचे पूर आणि उधाणामुळे जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले असताना त्याचा मोठा फटका शेतीलाही बसला आहे. जिल्ह्यातील 1 हजार 116 गावांना बसला असून 17 हजार 755 हेक्टर क्षेत्रावरील खरिप हंगामातील प्रमुख पीक भातासह आंबा व काजू या बागायती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील 1 हजार 116 बाधित गावांपैकी सर्वाधिक 171 गावे पेण तालुक्यात आहेत. तर सर्वाधिक 5 हजार 567 हेक्टर बाधित क्षेत्र अलिबाग तालुक्यात असल्याची माहिती जिल्हा कृषि अधीक्षक कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

अलिबाग तालुक्यात भात पिकाचे समुद्र संरक्षक बंधारे उधाणाच्या भरतीने फुटून खारे पाणी शेतात घुसल्याने तर आंब्याची झाडे उन्मळून पडल्याने हे नुकसान झाले आहे. पेण, मुरुड, खालापूर व र्कत या चार तालुक्यांत भात, आंबा व भाजीपाल्याचे अतिवृष्टी व पुराच्या पाण्याने मोठे नुकसान झाले आहे. पनवेल तालुक्यात भात, आंबा व भाजीपाला पाण्याच्या प्रवाहामुळे जमीन खरवडून जाणे आणि शेताचे बांध अतिवृष्टीने फुटल्यामुळे नुकसान झाले. तर उरण तालुक्यात भातशेती पाण्याच्या प्रवाहाने वाहून जावून बांध फुटून गाळ साचल्याने भातपिकाचे नुकसान होवून शेतजमिनीचे देखील मोठे नुकसान झाले आहे. माणगाव, तळा, रोहा, पाली, महाड, पोलादपूर, म्हसळा आणि श्रीवर्धन या आठ तालुक्यात अतिवृष्टी आणि नद्यांच्या पुरामुळे भातशेतीचे नुकसान झाले आहे.

कृषि विभागाने नैसर्गिक आपत्ती काळातील नुकसानीचा प्राथमिक अहवाल बुधवारी कृषि आयुक्तालयाला पाठविला आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम जिल्ह्यातील सर्व तालुक्यात सुरु आहे. नुकसान पंचनामे प्राप्त झाल्यावर नेमक्या नुकसानीचे चित्र स्पष्ट होवू शकणार आहे.

बॉक्स

रायगड जिल्ह्यात तालुका निहाय नुकासनग्रस्त शेतीचे क्षेत्र (कंसात गावे)ः अलिबाग (132)- 5567 हेक्टर, पेण (171)- 3441 हे., कर्जत (170)- 179 हे., पनवेल (154)- 346 हे., महाड (120)- 4700 हे., खालापूर (37)- 148.50 हे., उरण (10)- 376 हे., माणगाव (70)- 350 हे., तळा (61)- 263 हे., रोहा (43)- 479 हे., पाली (02)- 4.20 हे., पोलादपूर (62)- 1700 हे., म्हसळा (12)- 48 हे., श्रीवर्धन (01)- 1.50 हे. एकूण (1116)- 17755.20 हे.

 

अवश्य वाचा

म्हसळा येथे माघी गणेशोत्सव