सोलापूर

पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले तरी जिल्ह्यात 398 टँकर सुरूच आहेत. पुणे, सातारा, सांगली, मुंबई, कोल्हापूर आदी जिल्ह्यात पुराची स्थिती निर्माण झाली असली तरी सोलापूर जिल्ह्यात मात्र दुष्काळी परिस्थिती तशीच असून टँकरव्दारेच जिल्ह्याची तहान भागविली जात आहे. 

शासनाने मागील वर्षी दुष्काळाची स्थिती पाहून फेब्रुवारी महिन्यापासूनच टँकरची सुरूवात केली होती. तरी जून महिन्यापर्यंत टँकरची आवश्यकता भासेल, असे वाटले होते. परंतु जून आणि जुलै महिन्यात पुरेसा पाऊस झाला नसल्यामुळे टँकर सुरूच आहेत. तरी आणखी ऑगस्ट महिन्यातही टँकर सुरूच राहण्याची शक्यता आहे. संपूर्ण पावसाळा टँकरने पाणी पुरवठा केला जाणार की, काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.  

सध्या जिल्ह्यात 7 लाख 98 हजार 759 लोकसंख्येसाठी 398 टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे, तर 343 गावे व 1981 वाड्या-वस्त्या या टँकरवर अवलंबून आहेत. सर्वाधिक मंगळवेढा तालुक्यात 60 टँकर सुरू आहेत. शासनाने सुरू केलेल्या या टँकरमुळे जिल्ह्यातील नागरिकांना दुष्काळात आधार झाला असला तरी चांगला पाऊस होऊन टँकरची संख्या कधी कमी होणार? असा प्रश्‍न जिल्ह्यातील नागरिकांसह शासकीय यंत्रणेला पडला आहे. जिल्ह्यातील वरदायिनी असलेले उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली असली तरी जिल्ह्यात विहीर, बोअर, तळे, तलाव कोरडेच आहेत. तरी उर्वरीत ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पाऊस झाला नसल्यास उन्हाळ्यात याच्यापेक्षा भयानक पाण्याची परिस्थिती निर्माण होणार आहे.

अवश्य वाचा

कलिंगडाची गोडी महागली