बेळगाव 

देेशभरात सैन्यदलात 100 महिला पोलिस भरतीसाठी 1 ते 5 ऑगस्टपर्यंत मराठा लाईट इन्फंट्रीत शिवाजी स्टेडियमवर युवतींची भरती सुरू आहे. सोमवारी भरतीचा शेवटचा दिवस असून 2800 युवतींना मुलाखत पत्र पाठवले होते. त्यापैकी 1000 युवतींनी भरतीसाठी चार दिवसात हजेरी दर्शवली. त्यापैकी 200 युवती पात्र ठरल्या असून सोमवार ता. 5 रोजी त्यांची वैद्यकीय तपासणी होणार आहे. 27 ऑक्टोबर रोजी लेखी परीक्षेला संधी दिली जाईल. अशी महिती रविवारी मराठा लाईट इन्फंट्रीत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत कर्नल पी. दंगवाल यांनी दिली.

मराठा लाईट इन्फंट्री सेंटरमध्ये 1 ऑगस्ट ते 5 ऑगस्ट दरम्यान सैन्य दलात सुरु असलेल्या  महिला पोलिस भरतीत चार दिवसात 1000 युवतींनी हजेरी लावली. शारीरिक चाचणीनंतर 200 अंतीम युवतीची यादी तयार झाली आहे. त्या युवतींची सोमवारी  वैद्यकीय तपासणी होणार आहे. 

कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, आंध्रप्रदेश, तेलंगण राज्यासह अंदमान, निकोबार, लक्षदिप, पडुचेरी केंद्रशासीत प्रदेशातील मिळून 2800 युवतींना मुलाखत पत्र पाठवण्यात आले होते. मात्र केंद्रशासीत प्रदेशातील युवतींनी भरतीकडे पाठ फिरवली. रविवारी तामिळनाडू, तेलंगणा व आंध्रप्रदेशातील युवतींनी भरतीसाठी गर्दी केली होती. दररोज सकाळी सातपासून भरतीला प्रारंभ होत होता. संततधार पावसामुळे भरती प्रक्रियेत अडथळे येत होते. मात्र त्यावर मात करुन युवतींनी भरतीसाठी आवश्यक असलेल्या चाचण्या देण्यासाठी गर्दी केली होती. सहा ठिकाणी कागदपत्रे तपासण्यापासून शारीरीक चाचण्या घेण्यापर्यंत व्यवस्था केली होती.

दीड किलोमिटर धावण्यासाठी सात मिनिटाचा कालावधी, उंच उडी  तीन फुट उंच, लांब उडी दहा फुटाच्या पुढे, पुलअप 11, 152 सेंटी मीटर उंची, उंचीप्रमाणे वजन या चाचण्यात 200 युवतीनी बाजी मारली आहे. सोमवारी त्यांची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर 27 ऑक्टोबर रोजी त्यांना 100 गुणांची लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे.

 

अवश्य वाचा

कलिंगडाची गोडी महागली