बेळगाव 

सहा दिवसांपासून कोसळणारा वरुणराजा रविवारीही संततधार होता. त्यामुळे शहर परिसरातील पूरस्थिती कायम होती; तर अनेक ठिकाणी घरांची पडझड सुरू झाली असून काही ठिकाणी झाडेही कोसळली.

शनिवारी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. रविवारीही पहाटेपासूनच संततधार पाऊस होता. दिवसभरात दोन-तीन वेळा काही काळ पावसाने उसंत घेतली. पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचून होते.

रविवारी बाजारपेठेत गर्दी असते. पण, गेल्या काही दिवसांपासून कोसळणार्‍या पावसामुळे शहरातील गणपत गल्‍ली, मारुती गल्‍ली, रविवारपेठ, किर्लोस्कर रोड, खडेबाजार परिसरात गर्दी नव्हती. सोमवारी नागपंचमी असली तरी, बाजारपेठेत म्हणावी तशी खरेदी झाली नाही. त्यामुळे पावसाचा बाजारपेठेवरही परिणाम झाला.

चोर्ला मार्गावरून अवजड वाहतूक बंद

बेळगाव?पणजी महामार्गावरील कुसमळी पूल धोकादायक बनल्यामुळे खानापूर पोलिसांनी रविवारी सकाळपासूनच अवजड वाहतूक बंद केली. चोर्ला मार्गे गोव्याकडे जाणारी अवजड वाहतूक अन्य रस्त्यातून वळवली. पावसामुळे कुसमळी येथील पुलाला तडे गेले आहेत. त्यामुळे अपघात घडू नये, यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सूचनेनुसार आज सकाळी खानापूर पोलिसांनी या पुलावरून होणारी अवजड वाहतूक रोखून माघारी धाडली. दोन दिवसांत पुलाच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले. अचानक वाहतूक बंद करण्यात आल्यामुळे वाहनचालकांना खानापूर ते जांबोटी किंवा तिलारीमार्गे गोव्याकडे जावे लागले.

धामणे रोड रस्त्याच्या भाग वाहून गेला

पावसामुळे धामणे रोड येथील रस्त्याच्या कठडा वाहून गेला असून रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. वडगाव शिवारातून जोराने पाणी वाहात असल्यामुळे आणि येळ्ळूर येथील फुटूक तलाव फुटल्यामुळे पाण्याचा प्रवाह वाढला आहे. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही कडा वाहून जात आहेत. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे.  एपीएमसी सदस्य महेश जुवेकर, जयराज हलगेकर यांच्यासह इतर राजकीय नेत्यांनी रस्त्याची पाहणी केली.

कणबर्गीत मंदिरात पाणी

कणबर्गी येथे पहिल्यांदाच गावातील विठ्ठल मंदिरात पाणी शिरले. शिवाय सिद्धेश्‍वर मंदिरावरून धबधबा सुरू झाला. अनेक वर्षात पहिल्यांदाच असे चित्र पाहायला मिळाले असून  किसन सुंठकर यांच्यासह भाविकांनी विठ्ठल मंदिरातील पाणी बाहेर काढले.

 

अवश्य वाचा

कलिंगडाची गोडी महागली