बेळगांव शहर व उपनगरात चेन स्नॅचिंग करणाऱया एका चौकडीला खडेबाजार पोलिसांनी शुक्रवारी अटक केली आहे. त्यांनी 9 गुन्हे केल्याची कबुली दिली असून त्यांच्या जवळून 8 लाख 98 हजार 800 रुपये किमतीचे दागिने व 3 मोटारसायकल जप्त केल्या आहेत.

दीपक सुरेश अगसीमनी (वय 21), देवराज यल्लाप्पा पुजारी (वय 21), नागराज चिदानंद तळवार (वय 20), अस्लम मौलासाब शेरेगार (वय 20, सर्व रा. लक्ष्मीनगर, उद्यमबाग) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्या जवळून 184 ग्रॅम सोन्याचे दागिने, दोन पल्सर व एक हिरोहोंडा अशा तीन मोटारसायकली जप्त केल्या आहेत.

बेळगांव शहराचे पोलीस आयुक्त बी. एस. लोकेशकुमार यांनी शुक्रवारी रात्री एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. 11 मे 2019 रोजी विमला सीताराम शिंदे (रा. देशपांडे चाळ) यांच्या गळय़ातील 32 हजार रुपये किमतीची 12 ग्रॅमची चेन खेचली होती. संतोष-निर्मण थिएटर जवळील बोळात मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी हे कृत्य केले होते.

या प्रकरणाचा तपास करताना खडेबाजारचे पोलीस निरीक्षक धीरज शिंदे, उद्यमबागचे पोलीस निरीक्षक एस. सी. पाटील, शंकर शिंदे, यल्लाप्पा हत्तरवाट, शिवाप्पा, महांतेश हणगुंडी, के. के. सौदत्ती, सी. एस. हंचनाळ, जे. एफ. हादीमनी, अजित शिप्पुरे, एस. आय. गौडर आदींनी ही कारवाई केली आहे.

या चौकडीने खडेबाजार, टिळकवाडी पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात प्रत्येकी एक, उद्यमबाग पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात 4, माळमारुती पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात 2 व अंकलगी येथे 1 अशी एकूण 9 गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. शहर व उपनगरात त्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला होता. त्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे.

अवश्य वाचा

कलिंगडाची गोडी महागली