बेळगांव

पश्चिम महाराष्ट्रातील पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी वाढतच असून उपनद्यांनीही धोकादायक पातळी ओलांडली आहे. परिणामी चिकोडी उपविभागातील वेदगंगा, दूधगंगा, हिरण्यकेशी व कृष्णा नदीकाठच्या 69 गावांना महापुराचा धोका निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एस. बी. बोम्मनहळ्ळी व एसपी यांनी शनिवारी मांजरी, इंगळी, येडूरवाडीसह आठ गावांना भेटी देऊन पूरस्थितीची पाहणी केली.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी बोम्मनहळ्ळी म्हणाले, पूरस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अग्निशमन, जलद कृती दल, एनडीआरएफ आदी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. याशिवाय नदीकाठी 23 बोटींची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रसंगी सेनादलाचीही मदत घेण्यात येणार आहे. नदीकाठच्या ज्या गावांमध्ये पूरग्रस्तांचे स्थलांतर होत आहे. अशा पूरग्रस्तांसाठी 39 गावात निवारा केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. अशावेळी नागरिकांनी भयभीत न होता प्रशासकीय यंत्रणेस सहकार्य करावे, असे आवाहन केले.

पावसाच्या वाढलेल्या या जोरामुळे 2005 प्रमाणे महापूर येण्याची भीती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना चिकोडीचे प्रांताधिकारी रवींद्र करलिंगन्नावर म्हणाले, महापुराच्या नियंत्रणाविषयी प्रशासन सर्वतोपरी सज्ज असून नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने नदीकाठावरील शेतवाडीतून स्थलांतरीत व्हावे. सुरक्षिततेच्या दृष्टीने केलेली उपाययोजना म्हणजे महापूर आला असे म्हणता येणार नाही. 2005 ची परिस्थिती वेगळी होती. आताची परिस्थिती वेगळी आहे. 2005 मध्ये पाण्याच्या विसर्गावर अधिकाऱयांमध्ये योग्य त्या माहितीची देवाण-घेवाण न झाल्यानेच महापुराचा फटका बसला होता. आता मात्र पाण्याच्या विसर्गाबद्दल माहितीची देवाण-घेवाण होत असल्याने तसेच संभाव्य महापुरास तोंड देण्यास सर्वतोपरी तयारी करण्यात आल्याने नागरिकांनी भिती बाळगू नये व अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही त्यांनी सांगितले.

पाणलोट क्षेत्रात पाऊस कायम

चिकोडी उपविभागात शनिवारी दिवसभर पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. तथापि महाराष्ट्रातील पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण जैसे थे असल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. शनिवारी कोयना येथे 124 मि.मी., नवजा 159 मि. मी., महाबळेश्वर 215 मि.मी., वारणा 144 मि.मी., काळम्मावाडी 206 मि. मी., राधानगरी 204 मि.मी. तर पाटगाव येथे 152 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर चिकोडी तालुक्यातील चिकोडी येथे 14.9 मि.मी., अंकली 9.8 मि.मी., नागरमुन्नोळी 7.4 मि.मी., सदलगा 15.4 मि.मी., जोडट्टी 5.4 मि.मी. तर निपाणी तालुक्यात निपाणी एआरएस 42.2 मि.मी., निपाणी पीडब्ल्युडी 32 मि.मी., गळतगा 22 मि.मी. तर सौंदलगा 30.1 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

शेतशिवारात घुसले पाणी

चिकोडी तालुक्यातील कल्लोळ, येडूर, येडूरवाडी, चंदूर, मांजरी, इंगळी येथे कृष्णा नदीचे पाणी शेतशिवारात घुसल्याने ऊस वगळता इतर पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. तर निपाणी तालुक्यातील जत्राट, सिदनाळ, हुन्नरगी, कुन्नूर, कारदगा, भोज, कोगनोळी, सौंदलगा आदी गावातील शेतशिवारे वेदगंगा व दूधगंगा   नद्यांच्या वाढत्या प्रवाहामुळे पाण्याखाली गेली आहेत. सध्या कृष्णेत कल्लोळजवळ दूधगंगेतून 33088 तर राजापूर जलाशयातून 1 लाख 72 हजार 30 क्युसेक्स असे एकूण 2 लाख 5 हजार 118 क्युसेक्स पाणी येत आहे. यामुळे संथ वाहणाऱया कृष्णेने रौद्ररुप धारण केले आहे. आलमट्टी जलाशयात एकूण 2 लाख 22 हजार 113 क्युसेक्स पाणी येत आहे. तर 2 लाख 39 हजार 521 क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे बॅकवाटरची धास्ती कमी झाली आहे.

दरम्यान, शनिवारी जिल्हाधिकारी बोम्मनहळ्ळी, जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी, जिल्हा पंचायतीचे उपसचिव एस. बी. मुळ्ळोळी, चिकोडी ता. पं. चे कार्यनिर्वाहक अधिकारी के. एस. पाटील, आनंद बडकुंद्री यांच्यासह तालुका स्तरावरील विविध अधिकाऱयांनी चिकोडी तालुक्यातील येडूर, इंगळी, मांजरी, चंदूर या पूरग्रस्त गावांना भेटी देऊन पाहणी केली.

अवश्य वाचा

मोबाईल हिसकावून चोरटे पसार

गाडीची काच फोडून ऐवज लंपास