सातारा 

     दरवर्षी श्रावणी सोमवारी सातारा जिल्ह्यातील नागनाथवाडी (ललगुण)ता. खटाव येथील नागनाथ मंदीराच्या मुख्य गाभाऱ्यात होणाऱ्या सर्पदर्शन प्रथेला यावर्षी पासून पूर्ण विराम देण्याचा ऐतिहासीक निर्णय आज नागनाथवाडी, ललगुण येथील ग्रामस्थांनी घेतला.

      अंधश्रद्धा निर्मूलन समिती, पोलीस प्रशासन, यात्रा कमेटी व ग्रामस्थांची  बैठक आज नागनाथवाडी येथे पुसेगाव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विश्वजित घोडके यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला.

      गेली अनेक वर्षे नागनाथ मंदीरात श्रावणी सोमवारी भाविक, भक्तांची मोठी गर्दी होत असते. भाविकांच्या श्रध्देचा फायदा उठवत याठिकानी सर्प दर्शन घडवून आणण्याचा प्रकार सुरू होता, सर्पाची लहान पिल्ले मुख्य गाभाऱ्यात सोडून अंधश्रध्देला खतपाणी घातले जात होते. यातून भाविकांची लूटही केली जात होती. याबाबतच्या अनेक तक्रारी कोरेगाव अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे आल्या होत्या, कोरेगावचे सर्पमित्र योगेश धुमाळ व अनिसचे कोरेगाव  संघटक हेमंत जाधव यांनी चार वर्षापासून  प्रयत्न केला. गतवर्षी कोरेगाव उपविभागाच्या पोलीस अधिकारी प्रेरणा कट्टें यांनी  ही प्रथा बंद करण्याची सूचनाही दिली होती, तथापि ही प्रथा छुप्या मार्गाने सुरू ठेवून सर्प प्राण्यांची हेळसांड सुरूच होती. यावर्षी मात्र श्रावण उत्सव सुरू होण्यापूर्वीच अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पुसेगाव पोलीस ठाण्याला निवेदन देऊन ही प्रथा तातडीने बंद करण्याची मागणी केली, त्यावर पोलीस उपनिरीक्षक विश्वजित घोडके यांनी दोन्ही गावचे ग्रामस्थ, पदाधिकारी, देवस्थानचे ट्रस्टी, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सदस्य यांची एकत्र बैठक बोलावून सामोपचाराने ही प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या बैठकीस अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. हमीद दाभोळकर, प्रशांत पोतदार, भगवान रणदिवे, सी. आर. बर्गे, संतोष नलावडे, हेमंत जाधव, अशोक बर्गे यांनी उपस्थित राहून वन्यजीव कायद्याने सर्प जीवांचे प्रदर्शन करणे, त्यांचा अनिष्ट रूढींसाठी उपयोग करणे, सर्प  हाताळने हा गुन्हा असल्याचे निदर्शनास आणून दिले. 

     गेली शे-दीडशे वर्ष सुरू असलेली ही प्रथा कशी बंद करायची? अशी भूमिका काही ग्रामस्थांनी घेतली, कायद्याचे चौकटीत ही प्रथा बसत नसून प्रसंगी सर्प प्रदर्शन करणाऱ्यांवर आम्हाला गुन्हे दाखल करावे लागतील असा पावित्रा अंनिसचे डॉ. हमीद दाभोळकर व पोलीस अधिकारी श्री. घोडके यांनी घेतल्यानंतर अखेरीस पहिल्या दोन सोमवारी होणाऱ्या उत्सवानंतर आम्ही ही प्रथा यावर्षी पासूनच बंद करू हा निर्णय देवस्थान कमेटी व  ग्रामस्थांनी घेतला.त्याबद्दल सातारा जिल्ह्यातील पुरोगामी विचारांच्या संघटनांनी स्वागत केले आहे.

      या बैठकीस ग्रामस्थांच्या वतीने जनार्दन घाडगे, सरपंच शिवाजी फडतरे, देवस्थान कमेटीचे अध्यक्ष बबनराव पाटणकर, शिवाजी गुरव, प्रतापराव घाडगे, गजानन गुरव, दत्तात्रय गुरव, मधुकर तांबे, विजय घाडगे, सुधाकर घाडगे, नितीन घाडगे, हरिदास ननावरे, शिवाजी फडतरे, बबन फडतरे, संतोष घाडगे, विजय घाडगे यांच्यासह नागनाथवाडी, ललगुण येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

 

अवश्य वाचा

तळोजातील घराला आग