राष्ट्राच्या अस्मितेचे दिव्य प्रतीक म्हणजे राष्ट्रध्वज. राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राचे मानचिन्ह, राष्ट्राच्या ऐक्याची पवित्र खूण. आज अस्तित्वात असलेल्या तिरंगी ध्वजास 22 जुलै 1947 रोजी मान्यता मिळाली. तत्पूर्वी, त्याचा इतिहास असा...
वे काळापासून भगवा ध्वज हा हिंदुस्थानातील हिंदू धर्माचे प्रतीकच बनला होता. काळाच्या ओघात अनेक आक्रमणे हिंदुस्थानवर झाली आणि अखेरीस इंग्रजांनी बाजी मारली. त्यांचे आपण गुलाम झाल्यावर जाहीरपणे झेंडा फडकविण्याचा प्रश्‍नच नव्हता. 1885 साली स्थापन झालेली राष्ट्रीय सभाही 1920 सालापर्यंत अधिवेशनाच्या प्रसंगी इंग्रज युनियन जॅकच फडकवत असत. हे ऐकून आपल्याला आश्‍चर्य वाटेल. पण, ही शरमनाक बाब होती. तेव्हा भगिनी निवेदिता यांनी प्रथम ध्वजाबाबतीत राष्ट्रीय एकात्मता जागृत केली. 1905 साली त्यांनी वज्रांकीत ध्वज तयार केला. तो आपला पहिला राष्ट्रध्वज.
‘वंदे मातरम्’ हे शब्द स्वातंत्र्याचा महामंत्र बनले होते. त्याचा आधार घेऊन कृष्णकुमार मित्र यांनी एक तिरंगा झेंडा बनवला. हाच भारताचा पहिला तिरंगा ध्वज. 18 ऑगस्ट 1907 रोजी जर्मनीत भरलेल्या आंतरराष्ट्रीय समाजवाद्यांच्या अधिवेशनात मादाम कामा यांनी वरचा पट्टा हिरवा त्यावर हिंदुस्थानातल्या आठ प्रांतांचे प्रतीक म्हणून आठ कमळे, मधल्या केशरी रंगावर प्राणप्रिय ‘वंदे मातरम्’ ही अक्षरे कोरलेली होती. खालच्या लाल रंगाच्या पट्ट्याच्या डाव्या बाजूला सूर्यबिंब व उजव्या बाजूला चंद्रकोर असलेला तिरंगा ध्वज फडकावून त्यांनी खळबळ उडवून दिली होती.
गदर या क्रांतिकारी संघटनेने लाल कपड्यावर पिवळ्या रंगात हिंदुस्थानचा नकाशा तयार केला होता. त्यावर ‘वंदे मातरम्’, ‘सत श्री आकल’, ‘अल्ला हू अकबर’ ही वचने लिहिलेली होती. त्यानंतर टिळकांनी होमरूल लीग चळवळ सुरु केली. तेव्हा भारताचा ध्वज तिरंगा पांढरा, हिरवा व लाल या क्रमाने करण्यात आला. त्यात कोणतेही चित्र व अक्षरे नव्हती. पुढे त्यात निळ्या रंगात चरख्याचे चित्र समाविष्ट करण्यात आले.
1920 पासून गांधीपर्वाला सुरुवात झाली. सर्वधर्मियांचे समाधान करणारा ध्वजच राष्ट्रीय ध्वज होऊ शकतो, असा विचार गांधीजींनी मांडला. तेव्हा लाल हिंदूंचा, हिरवा मुसलमानांचा तर पांढरा सर्वधर्मियांचा आणि मध्यभागी चरखा असलेला ध्वज 1921च्या अहमदाबादच्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाच्या प्रसंगी फडकावून युनियन जॅक फडकविण्याची प्रथा कायमस्वरुपी बंद केली ती याच ध्वजाने. पण, हा ध्वज शिखांना पसंत नव्हता. कारण, त्यांचा केशरी रंग यात कोठेच नव्हता. तेव्हा पुढे ध्वजाच्या रंगाचा धर्माशी संबंध न जोडता केशरी, पंधरा व हिरवा आणि मध्ये चरखा असा नवा ध्वज काँग्रेसने तयार केला. तो  लाहोर अधिवेशनात 1929 रोजी फडकविला. पुढे 1946 पर्यंत हाच ध्वज आपल्या अस्मितेचे प्रतीक होता. याशिवाय वाद्यांचे चिन्ह असलेला तिरंगा सुभाषबाबूंनी बर्लिनमध्ये फडकावला. भगव्या ध्वजाची शिफारस डॉ. आंबेडकरांनी केली होती.
11 डिसेंबर 1946 रोजी भारताची घटना परिषद स्थापन झाली. या घटना परिषदेने स्वतंत्र व सार्वभौम भारताचा राष्ट्रध्वज कसा असावा यासाठी ध्वज समिती स्थापन केली. त्यात असलेल्या सरदार पटेल, मौ. आझाद, पं. नेहरु, आचार्य कालेलकर इत्यादी मान्यवरांनी नव्या ध्वजाची रुपरेखा आखली. या नव्या ध्वजात चरख्याऐवजी निळ्या रंगातील अशोकचक्राचे चिन्ह अंकित केले गेले. ध्वजाचा रंग व चक्राचा अर्थ पुढीलप्रमाणे :
केशरी रंग    :  ध्येय व त्याग या गुणांचे
        प्रतीक.  
पांढरा रंग      : सत्य व शांतता या
        गुणांचे प्रतीक.
हिरवा रंग     : श्रद्धा व औदार्य या
        गुणांचे प्रतीक.
अशोक चक्र  : गती व न्याय या गुणांचे
                प्रतीक.
अशा हा अशोकचक्रांकित तिरंगा ध्वजास ज्या दिवशी मान्यता दिली, तो ऐतिहासिक दिवस होता 22 जुलै 1947.  
(सौजन्य ः सहज शिक्षण यू ट्यूब वाहिनी)

 
दिनांक 22 जुलै 2019 

आजचे इतिहासातील दिनविशेष :
पायदिन (2217=पाय )
1)1295- संत सावता माळी यांचा समाधी दिन. 2)1793- अलेक्झांडर मॅकेंझी मेक्सिको पार करून पॅसिफिक तटावर पोहोचणारा पहिला युरोपिय ठरला. 3) 1795- प्रसिद्ध फ्रेंच गणिती गॅब्रील लॅमा यांचा जन्म. 4) 1812- सालामांकाची लढाई- आर्थर वेलस्ली, ड्यूक ऑफ वेलींग्टनने सालामांका, स्पेन येथे फ्रेंच सैन्याला हरवले. 5) 1887- गुस्ताव लुडविग हेटर्झ, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म. 6) 1916- सॅन फ्रान्सिस्कोमध्ये ध्वजसंचलनाच्या वेळी बॉम्बस्फोट; 10 ठार, 40 जखमी. 7) 1923- ख्यातनाम गायक मुकेश यांचा जन्म. 8) 1930- गणितज्ज्ञ डॉ. श्रीराम अभ्यंकर यांचा जन्म. 9) 1931- फर्ग्युसन कॉलजमध्ये गव्हर्नर हॉटसन यांच्यावर गोगटे यांनी गोळी झाडली. 10) 1933- वायली पोस्टने 7 दिवस 18 तास 45 मिनिटांत विमानातून सर्वप्रथम पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केले. 11) 1937- वसंत रांजणे, भारताचा कसोटी क्रिकेट खेळाडू याचा जन्म. 12) 1942- ज्यूंचे शिरकार- वॉर्सोतून ज्यूंना तडीपार करणे सुरु झाले. 13) 1947- तिरंगा ध्वजाची राष्ट्रध्वज म्हणून स्वीकृती. 14) 2003- अमेरिकन सैन्याचा 101 व्या हवाई तुकडीने इराकमध्ये सद्दाम हुसेनची मुले उदय हुसेन व कुसे हुसेन यांना ठार मारले. 15) 2009- 21व्या शतकातील सर्वात मोठे खग्रास ग्रहण. 16) 2014- चीनकडून पाकच्या आयएसआयची पाठराखण. ही संघटना अतिरेकी विरोधी असे चीनचे मत. 17) 2015- अखेर ग्रीक बँकेला युरोपियन मध्यवर्ती बँकेकडून 90 कोटी युरो. 18) 2016- मुंबईतील बहुचर्चित आदर्श इमारत पडण्यास सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती. 19) 2016- म्युनिचमधील एका शॉपिंग मॉलमध्ये गोळीबार केल्याने 12 जण ठार.

अवश्य वाचा