अलिबागमधील ज्येष्ठ निवृत्त सनदी अधिकारी कृष्णाजी रामचंद्र नाईक यांना वयाच्या 97व्या वर्षी देवाज्ञा झाली. मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झालेल्या त्यांच्या कन्या अनघा रामचंद्र चौगुले यांनी वडिलांना वाहिलेली श्रद्धांजली...

  10 जुलैला आमचे अण्णा गेले.  वृद्धापकाळाने एक पर्व संपले.  सामाजातील सर्वच घटक सांत्वनासाठी मोठ्या संख्येने येत आहेत. त्यांच्या कुटुंबाची चौकशी मोठ्या आस्थेने करतात. आमचे अण्णा वेगळे होते. म्हटले तर, समाजाच्या सध्याच्या चौकटीत न बसणारे, आयुष्यभर तत्त्वांशीच प्रामाणिक राहणारे, त्यात कधीही, कुठेही तडजोड न करणारे, टोकाचे प्रामाणिक, आयुष्यात कुणाचा एकही पैसा न बुडवणारे, कर्ज कधीही न घेणारे, सरकारी नोकरीत, त्यातही महसूल खात्यात असूनही पगाराव्यतिरिक्त वरच्या एकाही दमडीला कधीही ओशाळे न राहिलेले, नियमात बसेल ते काम कोणतीही अपेक्षा न करता विनासायास करणारे, पूर्ण प्रामाणिक, निवृत्त झाल्यावर झेपेल तेवढेच घर बांधणारे. असे वरिष्ठ पदावर राहूनही सत्वशील, कर्तव्यकठोर राहणारे अधिकारी सहसा नजरेत येत नाहीत. वयाची सत्याण्णव वर्षे एका निष्ठेने आयुष्य... वाटते तितके सोपे नसते. तीन आकडी पगारात आठ जणांचा संसार सांभाळणेही सोपे नसते. स्वभावामुळे मित्र, परिवार अगदीच तुरळक. त्यात शीघ्रकोपी स्वभाव, भ्रष्टाचारापासून पूर्ण मनाने चार हात लांब राहिल्यावर येणारा ताठरपणा अण्णांच्यातही होता. तरीही त्यांचे जीवलग असे काही मित्र होतेच.
ऑफिसमध्ये त्यांचा एक दरारा असे. त्यांच्या हाताखाली काम केलेले अनेक जण त्यांच्या प्रामाणिकपणाचे आणि कर्तव्यकठोरतेचे दाखले देत असतात. निवृत्तीनंतर चाळीस वर्षे जगणे सोपे नसते. त्यातही पूर्ण निरोगी राहणे, स्वयंपूर्ण राहणे फार जिद्दीचे असते. अण्णा हॅट घालून फिरताना अलिबाग अनुभवत असत. दिसण्याचे पूर्ण बंद होईपर्यंत चतुर्थीला सकाळची किल्ल्यातली आरती. एकादशीचे विठ्ठलदर्शन कधीही चुकले नाही. वेळेवर, पूर्ण शाकाहारी, नेमकेच खाणे, पूर्णत: निर्व्यसनी आणि सतत कार्यमग्न असणे, हेच त्यांच्या निरामय आयुष्याचे गमक होते. एक निरोगी सात्विक आयुष्य ते जगले. पण, हे जगणे खूप खडतर होते. वडील शेतकरी, सुतारकाम करणारे, घरातला मोठा परिवार, त्यांची संपूर्ण जबाबदारी, चौलला गुडघाभर पाणी तुडवत, वाड्या-वाड्यांतून रस्ता काढत रेवदंडा गाठायचे. सोबत शिकायला दत्ता खानविलकर, नाना धर्माधिकारींसारखी मंडळी. याच शाळेने अनेक मोठी माणसे घडवली, दगडी शाळेनेच अण्णांना फायनल केले. त्यांना अलिबागला यावे लागले त्यावेळी स्वातंत्र्यपूर्व काळात बैलगाडी आणि तरीशिवाय पर्याय नव्हता. अलिबागच्या ढक्षीकरांकडे चेंढर्‍यात राहून अभ्यास केला. गावातले पहिले मुंबई विद्यापीठाचे मॅट्रिक झाले. गरज म्हणून सरकारी नोकरीत राहून कठोर पण मेहनतीने सनदी अधिकारी झाले. त्यावेळी गॅझेटेड अधिकारी म्हणजे शान असायची. अण्णा सिंधुदुुर्ग, रत्नागिरी, रायगड, धुळे, जळगाव जिल्हे फिरले. फिरतीची नोकरी, त्यावेळी तहसीलदार असतानाही ते चालतच चार किलोमीटरवर ऑफिसला जायचे.
नोकरीच्या काळात त्यांनी मित्र जोडले, तेही सर्व आता काळाच्या पडद्याआड गेले. वेंगुर्लेकर, मंडणगडचे सभापती अण्णा गोसावी, केशवशेठ लेंडेे, अलिबागचे ग.चि. पाटील, जैन, कितीतरी पण प्रत्येक जण वचकूनच असायचा. थट्टा मस्करी करताना, पेपरातल्या बातमीवर चर्चा करताना अण्णा वेगळेच असायचे. व्यासंग होताच, पण पाठांतरही दांडगे होते. निवृत्तीनंतर तीर्थक्षेत्र फिरायची फार हौस. आईची तब्येत त्या मनाने नाजूक. केदारनाथला तिला खूप त्रास झाला. त्यावेळी चौधरी यात्रा कंपनीने हात झटकले, त्या अवस्थेत आईला ते घरी घेऊन आले. पुढे आई चार वर्षे आजारपणातच जगली. आता सोळा वर्षांनंतर अण्णाही गेले. सरकारी अधिकारी म्हणून कर्तव्य बजावताना सत्यनिष्ठेमुळे काही दुरावलेले जनाब अंतुलेंनाही ते नडले. कागदोपत्री पूर्ण सावधानता बाळगायचे त्यांचे तत्त्व असायचे. अनेक आठवणी त्यांनी लिहून ठेवल्यात. आजच्या सनदी अधिकारी यांच्यासाठी तो वस्तुपाठच ठरेल. घरात कधीही थेट वस्तू आली नाही. साधी भाजीही कधीही कुणाकडून स्वीकारली नाही. कदाचित, त्यामुळेच आज यशाची उत्तमोत्तम शिखरे गाठणारी मुले त्यांना घडवता आली.  मुलांनीही आता आपापल्या क्षेत्रात स्वत:चा ठसा उमटवला आहे. गेली दहा दिवस भेटायला, सांत्वन करायला येणारे पाहिले, की अण्णांनी लावलेले हे सत्शीलपणा आणि अखंड उद्योगीपणाचे रोपटे बहरायला लागलेय, याची खात्री पटतेय. समाजातील असंख्य घटक, राजकारणी, पक्षकार, गरीब, श्रीमंत, उच्च पदस्थ, शिक्षण क्षेत्र, बँक क्षेत्र यातील सर्वच लहानथोर यांची गर्दी पाहून मन कृतकृत्य होते, अभिमानाने भरुन येते.
अण्णांनी मुलांवर नकळत केलेले संस्कार आणि मुलांनी त्या आदर्शाचे केलेेले सोने पाहून मन गहीवरुन येते. तत्त्वांशी तडजोड केली असती तर कदाचित प्रदीप आज मोठा सर्जन असता, विलास चित्रकार असता, आम्ही सर्वजण कुठचे कुठे असतो. पण, आज आहोत तसे जमिनीवर नसतो. आज आम्ही सहाही भावंडे स्वत:च्या मेहनतीने समाजात आपापले स्थान तयार करुन आहोत. त्यामागे अण्णांचे तत्त्वशील, कठोर वागणे आहे. खोतीची शेतीवाडी सांभाळून, राहाटाचे शिंपणे करुन अण्णांनी शिक्षण घेतले. शाळेतून आल्यावर दत्ताच्या डोंगरावर बैल चरायला न्यायचे ते. आम्ही बहिणीही त्याच मार्गाने बकुळीच्या माळा ओवत पाठांतर करायचो. अण्णांनी सरकारी सुविधा, सरकारी निवास कधीही वापरला नाही. त्यांना कापडी पिशवी घेऊन भाजी खरेदी करताना कधीही डेप्युटी कलेक्टर असल्याचे वैषम्य वाटले नाही. पदाचा वापर करुन देवळात रांग मोडून दर्शन घ्यावे असे वाटले नाही. तहसीलदाराची पोरे डोंगरात करवंदे गोळा करायला जातात. रस्त्यावर विटीदांडू खेळतात, याचा राग आला नाही. आणि पहिला नंबर काढला म्हणून पाठ थोपटून काढावी वाटली नाही. मुलांना राष्ट्रीय पारितोषिके  मिळाली म्हणून किंवा कुणी नगरसेवक झाला, कुणी जिल्हा सरकारी वकील झाला म्हणून मिरवावेसे वाटले नाही. मुलांना त्यांनी नि:शब्दपणे फक्त आपल्या आचरणातून सुप्तपणे ऊर्जा दिली, प्रेेरणा दिली. तीच शक्ती आशीर्वाद म्हणून आमच्या मागे कायम राहील. अण्णांचा वारसा सध्याचे त्यांना आदर्श मानणारे सनदी अधिकारी यांनी जपणे महत्त्वाचे ंआहे. कोणत्याही दबावाखाली न येता पदाशी प्रामाणिक राहून कर्तव्य पार पाडणे आणि निवृत्तीनंतर अलिप्तपणे निरामय आयुष्य जगणे, हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल.

 
 
 

अवश्य वाचा