श्रीमंती, गुणसंपदा किंवा कौशल्ये या गोष्टी नशिबात असेल तर मिळतात, हा एक गैरसमज आहे. हे सत्य समजायला मलाही तब्बल दोन तपे म्हणजे 24 वर्षे लागली. खरे तर, माझ्याकडे वाखाणण्याजोगे कोणतेही गुण नव्हते. अभ्यासात मी सर्वसाधारण होतो. माझी महत्त्वाकांक्षा सेल्समनची नोकरी करण्याची होती. पण, वाटचालीत मला प्रयत्नशीलतेचा मंत्र मिळाला आणि त्याने माझे आयुष्य पार बदलवून टाकले. 

 

काही महिन्यांपूर्वी मुंबईतील माझ्या शाळेतर्फे माझा सत्कार करण्यात आला. सांताक्रूझमधील पाठक टेक्निकल हायस्कूलमध्ये मी इयत्ता आठवी ते दहावी ही तीन वर्षे शिकलो. हा साधारणपणे 30-35 वर्षांपूर्वीचा काळ. त्यावेळी ती एक लहानशी शाळा होती आणि केवळ 20 शिक्षक व 500 मुले होती. आज माझी शाळा एवढी मोठी झाली आहे, की तेथे 180 शिक्षक असून, 4500 विद्यार्थी शिक्षण घेतात. माझा सत्कार समारंभ शानदार झाला. माझ्या काळचे जुने शिक्षकही त्यासाठी आवर्जून उपस्थित होते. प्रत्येकाने मला आशीर्वाद देऊन माझ्या यशस्वी वाटचालीबद्दल कौतुक केले. सत्कार समारंभात निवेदक माझा परिचय वाचून दाखवत असताना, मला शाळेतील जुने दिवस आणि प्रसंग आठवत होते.
मी या शाळेत येण्यास कारणीभूत ठरली ती माझी आई. इयत्ता पाचवी ते सातवीतील माझी शैक्षणिक प्रगती फारशी आशादायी नव्हती. प्रगती पुस्तकातील दरवर्षी वरच्या वर्गात घातला हा शेरा वाचायला मिळाल्याने वडिलांनी माझ्या अभ्यासाबाबत चौकशी करायचे सोडून दिले होते. आईला मात्र माझ्या भवितव्याबाबत काळजी वाटत असे. मी टेक्निकल साईडला गेलो तर निदान फिटर, इलेक्ट्रिशियन अशी नोकरी करु शकेन, या आशेने तिने माझे नाव पाठक हायस्कूलमध्ये दाखल केले होते. पण, या शाळेतही मी तळाच्या विद्यार्थ्यांतच राहिलो आणि त्याचे कारण मला अभ्यासाची मुळीच आवड नव्हती. मैदानावर खेळायला आवडत असले तरी मी कोणत्याही क्रीडास्पर्धेत भाग घेतला नाही. वक्तृत्व, कथाकथन वगैरे गोष्टी माझ्यापासून फारच दूर होत्या. कारण, मला वर्गात इतरांपुढे बोलायची भीती वाटायची. शिरखेडसारख्या वर्‍हाडातील खेडेगावातून इयत्ता पाचवीला मुंबईत आल्यावर शाळेतील मुले माझ्या ग्रामीण उच्चारांना हसायची. त्यामुळे मी घाबरुन गप्प बसणे पसंत करायचो. हा संकोची स्वभाव पुढे तरुण वयातही गेला नव्हता.
मी दरवर्षी काठावर पास व्हायचो. इतर विषयांत उत्तीर्ण होण्याइतके मार्क मिळायचे, पण गणित दरखेपेस माझी दांडी उडवायचे. एकेवर्षी मला गणितात अवघे 2 गुण मिळाले होते. त्याबद्दल वर्गात एक उपहासात्मक कौतुक समारंभ आयोजित करण्यात आला. वर्गशिक्षकांपासून ते विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांनी त्याचा आनंद लुटला. अवघे 2 गुण मिळाल्याबद्दल माझा जास्वंदीच्या फुलांचा गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. मी मनातून खजिल झालो होतो, पण करणार काय. दोष माझाच होता. मला गणिताची भयंकर धास्ती बसली होती. कितीही शिकवले तरी माझ्या लक्षात राहायचे नाही. बीजगणित, भूमिती, प्रमेये, सिद्धता, एकसामायिक समीकरणे या सगळ्या गोष्टींबाबत मला तिरस्कार निर्माण झाला होता. त्यामुळे इयत्ता दहावीत मी एक-दोनदा नव्हे तर, चक्क पाचवेळा गणितात नापास झालो. अखेर देवाला किंवा परीक्षकाला दया आली असावी आणि सहाव्या प्रयत्नात मी एकदाचा काठावर पास होऊन फेर्‍यातून सुटलो.
कॉलेजला मी वाणिज्य शाखा निवडली. त्याचवेळी एक चमत्कार झाला. इतके दिवस मला छळणारे गणित महाराज चक्क माझे मित्र झाले. वाणिज्य शाखेचे गणित खूप सोपे होते. पुढे मी अभ्यासाची धास्ती बाळगणे सोडून दिले. कॉलेज संपवून उरलेल्या वेळात मी फिनेल विकायला उपनगरांत दारोदार फिरायचो. त्यातून एक गोष्ट लक्षात आली, की मेहनतीनेही माणूस अनुभवी बनू शकतो. एखादा विद्यार्थी शालेय अभ्यासात कच्चा असला तरी तो आयुष्यभर तसाच राहील असे नव्हे आणि पुस्तकी ज्ञान म्हणजे व्यवहारज्ञान नव्हे. मी नंतरच्या आयुष्यात कष्टाला खूप महत्त्व दिले. ज्याची भीती वाटायची त्या गोष्टी मुद्दाम करुन बघायला लागलो.
शाळेत मी मुखदुर्बळ होतो आणि पुढे व्यवसायात उतरल्यावरही मला जाहीर दोन शब्द बोलायची भीती वाटायची. दुबईतील भारतीयांच्या एका संमेलनात मला आयोजकांनी दोन शब्द बोलायला सांगितल्यावर मी चाचरु लागलो. पण, एकदा भाषणाला उभा राहिल्यावर अगदी सोपे बोलायचे ठरवले आणि चमत्कार म्हणजे शब्द आपोआप सुचत गेले. मी बोलत गेलो आणि श्रोते ऐकत गेले. माझ्यातील न्यूनगंड तेथेच गळून पडला. त्यानंतर मी आजपर्यंत शेकडो भाषणे, मुलाखती दिल्या, पण मला कधीही बावरल्यासारखे होत नाही. प्रयत्न केला तर काहीही अशक्य नसते.
मित्रांनोऽ या प्रयत्नांच्या जोरावरच मी माझ्यात पूर्वी नसलेली गुणसंपदा प्राप्त केली आहे. जो धनंजय दातार गणितात पाचवेळा नापास झाला होता, त्यानेच अमेरिकी विद्यापीठातून बिझनेस मॅनेजमेंटची डॉक्टरेट अव्वल गुणांनी उत्तीर्ण केली. साध्या बेरजा-वजाबाक्यांसाठी पुन्हा पुन्हा उत्तर तपासून बघणार्‍या मुलाने पुढच्या आयुष्यात कोट्यवधींचे हिशेब लीलया केले. दुकानात झाडू-पोछापासून कारकीर्दीची सुरुवात करणार्‍याला एक दिवस दुबईचा मसालाकिंग बनण्याचे भाग्य लाभले. या सगळ्यामागे माझे सातत्याने केलेले प्रयत्नच कारणीभूत होते. प्रयत्नांनी काय होत नाही? ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडता तेलही गळे’, असा सुविचार आहे. ‘यत्न तो देव जाणावा। यत्नेविण दरिद्रता’, असे समर्थ रामदास म्हणून गेले त्यात काहीही खोटे नाही.
एक व्यक्ती जे काम करु शकते, ते दुसराही करु शकतो. गरज अखंड प्रयत्नांची, जिद्दीची आणि प्रामाणिकपणाची असते.

अवश्य वाचा

म्हसळा येथे माघी गणेशोत्सव