हिंदुस्थानात गल्लीपासून दिल्लीत राहणार्‍या, सहा वर्षांच्या बालकापासून ते 60 वर्षांच्या वृद्धापर्यंत टायटॅनिकची कथा माहीत नाही, असे अमानुष सापडणे कठीणच. 1942च्या सुमारास बुडालेल्या बोटीवर अनेक चित्रपट निघाले. अजूनही तिच्या अवशेषांचे संशोधन चालू आहे. आणि आपण भारतीय त्यावर पोटतिडकीने चर्चा करतो. यात गैर काही नाही, ती एक दुःखद घटनाच होती. पण, 1947 साली रामदास बोट बुडाली, टायटॅनिकहून जास्त प्राणहानी झाली. ही घटना किती भारतीयांना माहिती आहे? ही घटना भारताला स्वातंत्र्य मिळण्याअगोदर अगदी एक महिनाच घडली होती. त्या दुर्दैवी लोकांना स्वातंत्र्याची पहाट पाहता आली नाही. तो दिवस होता, 17 जुलै 1947.

त्या वेळची मुंबई ही मराठी मुंबई होती. संपूर्ण कोकणचे मायपोट मुंबई. त्यामुळे सणासुदीच्या आणि सुट्टीच्या दिवशी कोकणवासी आपल्या गावी जायचे. त्या वेळी कोकणात जाण्यासाठी आजच्यासारख्या सोयी नव्हत्या. तसेच मोटारीपेक्षा बोटीचा प्रवास स्वस्त आणि मस्त. तो दिवस होता, 17 जुलै 1947 आषाढी अमावस्या असलेल्या या दिवशी बाँबे स्टिम नेव्हीगेशन कंपनीची ‘एस.एम. रामदास’ ही बोट मुंबईहून रेवस येथे जाण्यास सज्ज झाली. आणखी काही कंपन्यांच्या बोटी रेवसला जाणार्‍या होत्या. या कंपन्या एक-दोन आणे दर कमी करून अनधिकृतपणे प्रवासी स्वतःकडे वळवत. त्यामुळे क्षमतेपेक्षा कितीतरी जास्त माणसे ‘रामदास’ बोटीचा कप्तान सुलेमान याने बसवली. ही संख्या 800च्या आसपास होती. 200-300 लोकांना जागा न मिळाल्यामुळे ते ‘रामदास’मध्ये न बसता मोटारीने निघून गेले. ते सुदैवी ठरले.

आणि बरोबर 8 वाजून 5 मिनिटांनी ‘रामदास’ बोटीने रेवसला जाण्यासाठी मुंबईसह कर्णाक बंदर सोडले. मुंबई ते रेवस हे सागरी अंतर फक्त 9 मैलांचे. बोट 15 ते 20 कि.मी.च्या वेगाने चालली होती. त्या वेळी भरती जोरात नव्हती. बोट मुंबईपासून चार-पाच मैल गेली असेल तोच वादळाने जोर धरला. पंचवीस ते तीस फूट उंच उडणार्‍या उसळणार्‍या लाटा म्हणजे प्रत्यक्ष मृत्यूच! बोट खाडीत शिरण्यापूर्वीच वादळी वारे वाहू लागले. सागरी लाटा चारही बाजूंनी तिच्याभोवती तांडव करू लागल्या. बोट हेलकावे खाऊ लागली. लोक हे भयानक दृश्य पाहून घाबरले. मनोधैर्य खचल्यामुळे इकडेतिकडे पळू लागले. उसळत्या लाटा बोटीच्या ताडपत्रीचे पडदे फाडून बोटीत घुसायला लागल्या. तळमजल्यावरचे प्रवासी वरच्या मजल्यावर आले. समुद्राचे हे भीषण रूप पाहून कप्तान घाबरला. काय करावे या विचारात तो होता. समोर काशाचा भला मोठा खडक दिसत होता. बोट वळविण्याचा त्याने जीवापाड प्रयत्न केला होता. पण, काळ आणि वेळ दोन्ही एकदम आली असल्याने समोर खडक दिसत असूनही बोट खडकावर जाऊन आपटली आणि फुटली. मग काही क्षणांतच सागराने तिला आपल्या पोटात घेतले. 

बोट बुडत असताना हाहाकार उडाला. जो-तो आपला जीव वाचविण्याचा प्रयत्न करत होता. जे पट्टीचे पोहणारे होते, ते फळीचा आधार घेऊन, तासन्तास सागराशी झुंज देऊन किनार्‍याला आले. बहुतेकांना जलसमाधी मिळाली, फार तर 50 लोक वाचले. तो काळ फोन, वायरलेस इत्यादी सुविधांच्या अभावाचा! अलिबाग ऑफिसमध्ये त्यातून वाचून आलेला पहिला माणूस हाही दुर्दैवी घटना सांगणारा संपर्क माध्यम ठरला. त्यांनतर चौकशी झाली आणि कप्तानाचा परवाना रद्द झाला. या घटनेनंतर बोटीवर वायरलेस आणि अन्य उपकरणे बसवणे शासनाने सक्तीचे केले. तसेच नारळी पौर्णिमेपर्यंत समुद्रात बोटींची वाहतूक व मच्छिमारी करायची नाही, असा शासनाने कायदा केला.

त्या वेळेस सहा आण्याचे तिकीट काढून तो ‘रामदास’ बोटीत बसला, त्याचे वय होते अवघे बारा वर्षे. त्याचे नाव बारकू. बोट कलंडल्यावर बारक्या समुद्रात फेकला गेला. तब्बल बारा तास पोहून बारक्याने किनारा गाठला आणि रामदास बोट बुडाल्याची माहिती त्याने गोर्‍या अधिकार्‍याला दिला. अलिबाग, कोळीवाड्यात राहणारा बारक्या बारकुशेठ म्हणून ओळखले जायचे. त्यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधल्यावर त्यांच्या आठवणी 58 वर्षे मागे गेल्या. बारकूशेठ मुकादम यांचे नुकतेच निधन झाले आहे. परंतु, त्यावेळी सांगितलेल्या आठवणींनी आजही अंगावर काटा येतो. मन सुन्न होते.

ते म्हणाले की, बोट कलंडल्यानंतर ती बुडू लागली. मी पाण्यात फेकलो गेलो. गटांगळ्या खात होतो. 25-30 फूट उंचीच्या त्या भयानक लाटांच्या तडाख्यातून आपण आता वाचू शकत नाही, असे वाटत असताना माझ्या सपाट्यात एक लाईफ जॅकेट सापडले ते मी घट्ट पकडले. उरणच्या किनार्‍यावर मी पोहोचणार तोच ओहोटी सुरु झाली. आणि पुन्हा समुद्रात फेकलो गेलो. समुद्राच्या लाटा माझे नशीब ठरवणार होत्या. त्यामुळे त्या नेतील तिकडे मी जात होतो. सायंकाळी सातच्या सुमारास मी गेट वे ऑफ इंडियाच्या किनार्‍याला कधी आलो ते माझे मलाच समजले नाही. ही आठवण सांगताना त्यांचे डोळे पाणावले होते. त्यानंतर गोरे साहेब आले. मी त्यांना बोट कशी बुडाली याची माहिती दिली. 

(सौजन्य ः सहज शिक्षण यू ट्यूब वाहिनी)

 

दिनांक 17 जुलै 2019

आजचे इतिहासातील दिनविशेष : 

इतर दिनविशेष :

1)1698 - फ्रेंच गणिती, खगोलतज्ज्ञ पेरी लुई मॉपर्टिस यांचा जन्म.

2) 1802 - मराठी भाषेतील पहिला छापील मजकूर मोदी लिपीत. देवी रोगावरील लस टोचून घेण्याविषयीची जाहिरात.

3) 1827 - ब्रिटिश संशोधक सर फेडरिक ऑगस्टस अँबेस  यांचा जन्म.

4) 1854 - पुणे येथे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगची स्थापना.

5) 1860 - ‘प्रकाश मापकाचे’ जनक जर्मन शास्त्रज्ञ ऑटो आर. ल्युअर यांचा जन्म.

6) 1912 - फ्रेंच गणिती झूल अँरे पॉईन्कारे यांचे निधन.

7) 1917 - इंगलंडचा राजा जॉर्ज पाचव्याने फतवा काढून जाहीर केले की, त्याच्या वंशातील पुरुष मंडळी विंडसर हे आडनाव लावतील.

8) 1947 - मुंबईहून रेवसला निघालेल्या ‘रामदास’ बोटीला जलसमाधी

9) 1973 -  अफगाणिस्तान गणराज्य झाले.

10) 1975 - अमेरिकेचे अपोलो व रशियाचे सोयूझ ही दोन अंतराळ याने एकमेकांस जोडली गेली.

11) 1976- कॅनडातील माँट्रिआल शहरात एकविसावे ऑलिम्पिक सामने सुरु.

12) 1992- जुन्या पिढीतील नाट्य-चित्र अभिनेत्री शांता हुबळीकर यांचे निधन.

13) 1993 - तेलगू भाषांतील प्रतिष्ठेची ‘तेलगूथल्ली’ पुरस्कार तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांना प्रदान.

14) 2000 - अभिनेत्री वैजयंतीमाला बाली यांना ‘भरतनाट्यम शिखरमणी’ पुरस्कार जाहीर.

15) 2012 - समाजवादी विचारवंत आणि स्त्रियांच्या विविध प्रश्‍नांना वाचा फोडणार्‍या, मृणालताई गोरे त्याचे निधन.

16) 2014 - 13/7 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटासाठी हवालामार्फत पैशाची रसद पुरवणारा दहशतवादी                                         अब्दुल मतीन दामता फकी ऊर्फ फरुकला गोव्यातून एटीएसने ताब्यात घेतले.

17) 2015 - आर्थिक संकटातून ग्रीसला बाहेर काढण्याच्या योजनेस जर्मन पार्लमेंटची मंजुरी.

18) 2016- बहारिनमधील शिया-सुन्नी यांच्यातील संघर्ष उसाचे न्यायालयात दाखल.

19) 2016- राज्यसभेपाठोपाठ लोकसभाही पेपरलेस. 

अवश्य वाचा

हृतिक रोशनने घेतले दर्शन.

शिवभक्तांची रांग.