पंढरपूर

     महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा आषाढी वारी सोहळा नुकताच संपन्न झाला. यासाठी दहा लाखांवर अधिक भाविकांनी विठ्ठलाचे व रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. या आषाढी वारी काळात 3जुलै ते 17 जुलै दरम्यान श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीस विविध मार्गाने चार कोटी 40 लाख 37 हजार 786 रुपये उत्पन्न प्राप्त झाले आहे.

      गतवर्षीच्या तुलनेत 1 कोटी 50 लाख रुपयांची वाढ झाली आहे. तसेच यावर्षी आषाढी यात्रा कालावधीत सुमारे सात लाख 28 हजार भाविकांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. आषाढी यात्रा काळात भाविकांनी श्री विठ्ठलाच्या चरणी 39 लाख 63 हजार 424 रुपयांचे दान तर श्री रुक्मिणीच्या चरणी 7 लाख 72 हजार 180 रुपयाचे दान अर्पण केली आहे. देणगीतून 1 कोटी 84 लाख 54 हजार 91 रुपये, बुंदी व राजगिरा लाडू प्रसादाच्या विक्रीतून 72 लाख 46 हजार 210 रुपये, नव्याने बांधण्यात आलेल्या श्रीविठ्ठल-रुक्मिणी भक्तनिवासाच्या माध्यमातून 18 लाख 91 हजार, वेदांत व व्हिडिओकॉन भक्तनिवास 3 लाख 50 हजार 400 रुपये उत्पन्न मिळाले आहे. सन 2018 मध्ये आषाढी वारी कालावधीत हे दान 2 कोटी 90 लाख रुपये होते. आषाढी यात्रा काळात मंदिर समिती व प्रशासनाने वारकऱ्यांच्या सोयीसाठी अनेक उपाय योजना केल्या होत्या यामध्ये 65 एकर परिसरात जवळपास 3 लाख वारकरी भाविकांची राहण्याची सोय करण्यात आली होती. नदीपात्रामध्ये जवळपास 70 टक्के भाग रिकामा ठेवण्यात आला होता. त्यामुळे वारकरी स्नानानंतर वाळवंटामध्ये भ्रमण करण्याचा व नौकाविहाराचा आनंद घेत होते. आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत एस डी आर एफचे जवान नदीपात्रात तैनात करण्यात आले होते. दर्शन रांगेत भाविकांच्या पायाला त्रास होऊ नये म्हणून ग्रीन कार्पेट मेटिंग टाकण्यात आले होते, तसेच दर्शनाला दहा ते बारा तास वेळ लागत असल्याने दर्शन रांगेत बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

      आजारी भाविकांसाठी भारत सेवा आश्रम, वैष्णव चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांच्या तर्फे मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून घेण्यात आल्या होत्या तसेच रेड क्रॉस सोसायटी हरित वारी परिवाराचे सहकार्य यासाठी मंदिर समितीला लाभले. यावर्षी मंदिर व मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. देणगी जमा करणे, पाणी वाटप करणे, वैद्यकीय सेवा पुरवणे, स्वच्छता करणे व इतर अनुषंगिक कामासाठी विविध स्वयंसेवी संस्थांचे 3 हजार स्वयंसेवकांनी यात्राकाळात सेवा बजावली तसेच वाळवंट परिसर व चंद्रभागा नदी पात्रात भाविकांच्या संरक्षणासाठी व आपत्कालीन व्यवस्थेसाठी 35 जीवरक्षक नेमण्यात आले होते, महिला भाविकांसाठी नदीपात्रात चेंजिंग रुम्स उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या, गत वर्षी प्रमाणे या वर्षी दर्शना रांगेमध्ये चहापाणी फराळ व अनुदानाचे वाटप मंदिर समितीमार्फत करण्यात आले आसल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी दिली.

     याबाबत सर्व सेवर भावी कर्मचारी अधिकारी व पालखी प्रमुख व विश्वस्तांचे मंदिर समितीकडून आभार मानण्यात आले.

अवश्य वाचा