उरण

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सत्ताधारी भाजपा-शिवसेना  युतीने आगामी विधानसभा निवडणुका एकत्रपणे लढवण्याचा निर्धार केला आहे. राजकीय वातावरण शांत वाटत असले तरी युतीमध्ये धुसफूस सुरू आहे. शिवसेनेचे विद्यमान आमदार असलेल्या उरणच्या जागेवर भाजपाने दावा करीत असल्याने युतीला ग्रहण लागण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीचा बिगुल आगामी काळात वाजणार असल्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना, मनसे व नव्यानेच लोकसभेच्या मैदानात उतरलेल्या वंचीत बहुजन आघाडीने निवडणूक लढविण्यासाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. सत्ताधारी भाजपा-शिवसेनेत इच्छुकांची गर्दी वाढली आहे. त्यातच काही ठिकाणी शिवसेनेच्या जागांवर भाजपाने डोळा ठेवला असल्याने पेच निर्माण होण्याचा संभव आहे.      
उरण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार मनोहर भोईर आमदार म्हणून निवडून आले आहेत. मात्र त्यावेळी स्वबळावर शिवसेनेने बाजी मारली होती. आगामी विधानसभा निवडणुका भाजपा-शिवसेना युतीने निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. मात्र या मतदारसंघातुन भाजपाचे नेते व मागील निवडणुकीत पराभूत झालेले महेश बालदी यांनी कोणत्याही परिस्थितीत आपण उरण विधानसभा निवडणूक लढवून जिंकणारच असे ठासून प्रमुख पदाधिकार्‍यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना सांगितले. त्यासाठी व्हाट्सएप व फेसबुकच्या माध्यमातून प्रचारास सुरुवातही केली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे आमदार मनोहर भोईर यांनीही व्हाट्सएप व फेसबुकच्या माध्यमातून आपणच पुन्हा निवडून येणारच असे सांगितले जात आहेत. भाजपा व शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकर्‍यांनी उरणच्या विकासाला चेहरा नवा हवा, शेठचा विजय कोणीच रोखू शकत नाही. अशा प्रकारच्या अनेक जाहीरात भाजपा-शिवसेनेच्या दोन इच्छुक विधानसभा उमेदवारांचे  व्हाट्सएप व फेसबुकच्या माध्यमातून समर्थक व्हायरल करीत आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व इतर अशी आघाडी बांधत युतीला पराभूत करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. भाजपा-शिवसेनेत तू तू मै मै सुरू झाले असून अंतर्गत कलह वाढला असल्याचे बोलले जात आहे. या ना त्या कारणाने नेत्यांच्या मनातील खदखद बाहेर पडू लागली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत युती होणार की नाही याबाबत कार्यकर्ते उलट-सुलट चर्चा करताना दिसत आहेत. त्याच धर्तीवर उरण विधानसभा मतदारसंघातील असंतोषला तोंड फुटू लागत भाजपाने प्रथमच उरण विधानसभा निवडणूक लढवित जिंकणारच असे इच्छुक उमेदवार महेश बालदी असतील तर शिवसेनेनेही विद्यमान आमदार मनोहर भोईर हे पुन्हा निवडून येतील असे समर्थक सांगतात. परंतु युती होणार की नाही? तसेच उमेदवार कोण असतील. याचा फैसला होऊन ते अधिकृत उमेदवारी करतील तेच खरे उमेदवार तोपर्यंत तुम्हांआम्हां सर्वांना वाट पहावी लागणार आहे.

अवश्य वाचा