रोहा 

      शेतकरी कामगार पक्षाचा ७२ वा वर्धापनदिन कार्यक्रम यावर्षी २ ऑगस्ट रोजी रोहा येथील मेहेंदळे हायस्कूलच्या भव्य प्रांगणात संपन्न होणार आहे.या वर्धापनदिन कार्यक्रमाच्या नियोजनासाठी तालुका चिटणीस राजेश सानप,जिल्हा चिटणीस मंडळ सदस्य गणेश मढवी,अनंता वाघ,कार्यालयीन चिटणीस जितेंद्र जोशी,जिल्हा महिला आघाडी सदस्या कांचन माळी यांच्या नेतृत्वाखाली जोरदार तयारी सुरू असल्याचे दिसून येत आहे.

       या कार्यक्रमासाठी सुमारे ४० हजार चौरस फुटांचा भव्य असा मंडप टाकण्यात येणार आहे.वर्धापनदिन कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील सुमारे १२ ते १५ हजार कार्यकर्ते उपस्थित राहतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तालुका पुरोगामी युवक संघटनेचे अध्यक्ष जीवन देशमुख, उपाध्यक्ष नंदेश यादव,तालुका महिला आघाडी चिटणीस विनया चौलकर यांनी विभागवार कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन नियोजन सुरू केले असून जिल्हा चिटणीस मंडळ सदस्य विठ्ठल मोरे,जिल्हा कामगार आघाडी सदस्य सुहास खरिवले, बाजारसमिती संचालक गोपीनाथ गंभे यांची टीम त्यांना नियोजनात मार्गदर्शन करत आहे.१९९० साली मेहेंदळे हायस्कूलच्या मैदानावर शेकाप वर्धापनदिन साजरा झाला होता.त्या नंतर २००४ साली नागोठणे येथील सुप्रसिद्ध दर्ग्याच्या समोरील मैदानात शेकाप वर्धापनदिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.शेकाप आ धैर्यशील पाटील व आ पंडित पाटील यांच्या विधानसभा मतदारसंघात रोहा तालुक्यातील बहुसंख्य भाग येत असल्याने या वर्धापनदिन कार्यक्रमाला विशेष महत्व आहे.पंधरा वर्षानंतर रोहा तालुक्याला वर्धापनदिन कार्यक्रम आयोजन करण्याची संधी मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अतिशय उत्साहाचे वातावरण आहे.

      पक्षाचे सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तालुका व जिल्हा पातळीवरील पक्ष संघटनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते या कार्यक्रमाच्या आयोजनात आपला खारीचा वाटा उचलत आहेत.वर्धापनदिन कार्यक्रमाच्या निमित्ताने शेतकरी कामगार पक्षाकडून आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभच रोह्यातून होणार आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

 

अवश्य वाचा