खेड 

      मुंबई गोवा महामार्गाला लागलेले ग्रहण सुटण्याचे नाव नाही. पावसाचा जोर ओसरल्याने जगबुडी आणि वाशिष्ठी पुलांचा प्रश्न निकाली निघाला असताना आता दरडींचा प्रश्न सतावू लागला आहे. खेड चिपळूण मार्गावरील परशुराम घाटात गेले तीन दिवस सतत दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्याने महामार्गावरील वाहतूक वारंवार ठप्प होऊ लागली आहे. सध्या घाटात एकेरी वाहतूक सुरु असली तरी कधीही दरड कोसळण्याची भीती असल्याने प्रवाशी व चालकांचा जीव टांगणीला लागला आहे.

       मुंबई गोवा माहामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. ऊन पावसात या मार्गावर सतत वाहनांची येजा सुरु असते. मात्र अलीकडे या मार्गावरील वाहतुकीला वारंवार अडथळे येऊ लागले आहेत. चौपदरीकरणाचे काम सुरू झाल्यापासून या अडथळ्यांमध्ये वाढ झाली आहे.चौपदरीकरणाच्या कामादरम्यान महामार्गावर निर्माण केले गेले मानव निर्मित अडथळे वाहतुकीचा खेळखंडोबा करत आहेत. आता तर निसर्गानेही यात भर घातली आहे. गेल्या कित्येक वर्ष्यात जगबुडी आणि वाशिष्टी नदी पूल चार वेळा वाहुकीला बंद झाल्याचे ऐकिवात नाही. मात्र या वर्षी तब्बल चार वेळ दोन्ही पूल वाहतुकीला बंद करावे लागले आहेत. हे असं का घडलं याचा विचार होणे आवश्यक आहे.

       मंगळवार दिनांक १६ रोजी सायंकाळी पाच वाजता परशुराम घाटात दरड कोसळली आणि हा महामार्ग सुमारे चार तास ठप्प झाला. यानंतर शर्थीचे प्रयत्न करून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली . वाहतूक सुरु झाल्यावर महामार्गावर लटकलेल्या प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला मात्र, बुधवारी सार्वजानिक बांधकाम विभागाचे कर्मचारी काम करत असतानाच पुन्हा दरडीची माती आणि दगड रस्त्यावर कोसळू लागल्याने काम करण्याऱ्या कर्मचाऱ्यांच्या पोटात भीतीचा गोळा येऊ लागला. माती आणि दगड रस्त्यावर येण्याची प्रक्रिया सुरूच राहिल्याने एकेरी वाहतुकीतून गाडी हकणेही धोकादायक बनले. सद्यःस्थितीत घाटातून एकेरी वाहतूक सुरू आहे. मात्र कधी दरड खाली येईल आणि होत्याचे नव्हते होईल हे सांगता येत नसल्याने वाहन चालक आणि प्रवाश्याना जीव मुठीत धरून परशुराम घाट पार करावा लागतो आहे. घाटातील वाहतूक धोकादायहक झाल्याने त्याचा फटका शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थी व लोटे एमआयडीसीतील कर्मचाऱ्यांना बसत आहे. घाटात होत असलेल्या वाहतुकीच्या कोंडीमुळे शाळा, महाविद्यालये किंवा कर्मचाऱ्यांना वेळेत पोहचता येत नाही.

       मंगळवारी दरड कोसळण्याच्या घटनेला आता ४४ तास उलटले, तरी दरड काढण्याचे काम सुरूच आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत आहे. अतिवृष्टीमुळे मुंबई-गोवा महामार्गाची वाहतूक अनेकदा ठप्प झाली आहे. परशुराम घाटात सलग सहा वेळा दरड कोसळली आहे. मात्र, मंगळवारी कोसळलेली दरड महाकाय असल्याने एक जेसीबी, पोकलेन व डंपरच्या माध्यमातून दरड काढण्याचे काम सुरुच आहे.

      लोटे औद्योगिक वसाहतीमधील बहुतांश कामगार व अधिकारी चिपळुणात राहतात. तीन शिफ्टमध्ये चालणारी ही औद्योगिक वसाहत असल्याने त्यांची ने-आण करण्यासाठी चिपळूण येथूनच बससेवेची व्यवस्था आहे. मात्रघाटात होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे एमआयडीसीच्या वेळेचे नियोजन कोलमडले आहे. तसेच परशुराम येथे एसपीएम इंग्लिश स्कूल आहे. या शाळेला बुधवारी सुट्टी जाहीर करण्यात आली. मंगळवारी सायंकाळी शाळा सुटल्यानंतर एसपीएमचे विद्यार्थी रात्री 8 वाजेपर्यंत घाटात अडकून होते. त्याच पद्धतीने एमआयडीसीतील कर्मचारी व अधिका ऱ्यांचा खोळंबा झाला होता. त्यामुळे घाटात मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

      परशुराम घाट वाहतुकीस बंद झाल्यास या मार्गाला पर्यायी मार्ग म्हणून खेड तालुक्यातील खोपी फाट्यातून गुणदे मार्गे शेल्डी, चिरणी व त्यानंतर कळंबस्ते मार्गे वाहने चिपळुणात येऊ शकतात. अवजड वाहने वगळून छोटी व एसटीसाठी हा मार्ग सोयीचा आहे. त्यामुळे या मार्गावरुन प्रवास करणे शक्य होणार आहे. दुसरा छोट्या गाड्यांसाठी पर्याय म्हणून पीरलोटेमधून डाव्या बाजूला चिरणीकडे जाणाऱ्या रस्त्याकडे कळंबस्ते मार्गे चिपळुणात येत असतात. मात्र, हा मार्ग अरुंद असल्याने केवळ छोट्या गाड्यांसाठीच सोयीचा ठरतो.

 

अवश्य वाचा