पनवेल

         शेकापचे ज्येष्ठ नेते माजी आमदार विवेक पाटील यांच्या यकृताचे प्रत्यारोपण झाल्याने ते मध्यंतरी सक्रीय नव्हते. आजारपणातून काही प्रमाणात सावरल्यानंतर ते गेल्या काही दिवसांपासून दररोज जनसामान्यांना दोन तास काचेच्या भिंतीआडून ते भेटत आहेतच. मात्र लवकरच ते जनतेत दिसणार आहेत. २ ऑगस्टच्या शेकापच्या वर्धापन दिनाला माजी आमदार पाटील हजेरी लावणार आहेत. त्या ठिकाणी ते कार्यकर्त्यांना संबोधतील, अशी माहिती मिळाली आहे. त्यामुळे शेकापमध्ये उत्साह संचारला आहे.

      माजी आमदार विवेक पाटील यांची पनवेल,उरणच्या राजकारणावर पकड आहे. त्यांनी या भागाचे विधानसभेत नेतृत्व केले आहे. त्याचबरोबर दांडगा जनसंपर्क असलेला नेता म्हणून पाटील यांची ओळख आहे. अनेक निवडणुकांचा दांडगा अनुभव त्याचबरोबर सभा जिंकण्याचे कौशल्य, विरोधकांवर हल्लाबोल करण्याचा हातखंडा, धुरंधर राजकारणी यासारख्या अनेक जमेच्या बाजु त्यांच्याकडे आहेत. अनेक स्थित्यंतरे आले; पण पनवेल, उरणमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा प्रभाव  कायम ठेवण्याच्या दृष्टीकोनातून माजी आमदार विवेक पाटील यांनी प्रयत्न केले. पक्षाच्या कार्यकर्त्यांना बळ दिले. त्यामुळे आजही लाल बावटयाला मानणारे लोक गावागावांध्ये दिसतात. लढणे, संघर्ष आणि लोकहितासाठी चळवळ करण्याचे बाळकडू लोकनेते दि. बां. पाटील, दत्तूशेठ पाटील यांच्यानंतर माजी आमदार विवेक पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिले. प्रतिकूल परिस्थितीतही न खचता आव्हानाला आव्हान करुन सामोरे जाण्याची शिकवण त्यांनी आपल्या कामातून सर्वांना दिली. गेल्या काही महिन्यांपासून त्यांना आजारपणामुळे राजकारण आणि समाजकारणापासून काही प्रमाणात दूर राहावं लागले. लोकसभेची निवडणुकीचा प्रचार त्यांच्या गैरहजेरीत झाला. तरीसुद्धा त्यांनी निवडणुकीच्या अगोदर प्रकृती ठीक नसतानाही आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत ङ्गडके नाट्यगृहात कार्यकर्त्यांशी संवाद साधला, त्यांना लढण्याचे बळ दिले. दुर्दैवाने मावळ लोकसभा मतदारसंघात आघाडीच्याउमेदवाराला विजय मिळाला नाही. यामुळे काही प्रमाणात कार्यकर्ते नाउमेद झाले आहेत. परंतु शेकाप नेते माजी आमदार विवेक पाटील पुन्हा सक्रिय झाले काही दिवसापूर्वी त्यांनी कार्यकर्त्यांची भेट देण्यास सुरुवात केली. खबरदारी म्हणून त्यांना थेट भेटण्यास डॉक्टरांनी मनाई केली होती. काही दिवस काळजी घ्यायची असल्याने कर्नाळा स्पोर्टस अकॅडमीमध्ये खास केबिनची व्यवस्था करण्यात आली आहे. मध्ये काच बसविण्यात आली असून दोन्ही बाजूने माईक आणि स्पीकर ठेवण्यात आले आहेत. या माध्यमातून संवाद साधला जात आहे. मात्र आता शेकाप नेते विवेक पाटील आजारातून बरे झाले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत ते सार्वजनिक जीवनात वावरू शकणार आहेत. २ ऑगस्ट रोजी शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिन रोहा येथे साजरा होणार आहे. यानिमित्ताने माजी आमदार विवेक पाटील व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत.

               माजी आमदार विवेक पाटील यांच्या राजकिय व सामाजिक क्षेत्रातील थेट पुर्नागमन होणार आहेत. ते पूर्वीप्रमाणे सर्व सार्वजनिक, तसेच पक्षाच्या कार्यक्रमाला हजेरी लावू शकणार आहेत. त्याचबरोबर मार्गदर्शनसुध्दा करणार आहेत. यामुळे पनवेल उरणमध्ये शेकापला पुन्हा बळ मिळणार आहे. माजी आमदार विवेक पाटील यांनी आजाराला चारीमुंड्या चित करीत जीवनातील मोठी लढाई जिंकली आहे. २०१४ साली त्यांचा उरणमध्ये अतिशय कमी मताने पराभव झाला होता. ते पुन्हा या ठिकाणाहून निवडणुक लढवणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात महायुतीला जास्त मताधिक्य मिळाले नाही. त्यामुळे माजी आमदार पाटील यांना निवडणूक सोपी जाणार आहे. त्याचबरोबर त्यांच्यासोबत जनतेची सहानुभूतीसुध्दा असणार आहे.

अवश्य वाचा