सातारा 

सातारा तालुक्यातील काशीळ येथील सेवानिवृत्त महसूल अधिकारी यांचे बंद घर फोडून चोरट्यांनी सुमारे 4 लाखांची रोकड व 21 तोळे सोन्यावर डल्ला मारला. सुमारे 11 लाखांचा ऐवज लुटल्याने परिसरात घबराट पसरली आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी उघडकीस आली. दरम्यान, घटनास्थळी ठसेतज्ज्ञ व श्वान पथकास पाचारण करूनही चोरट्यांचा माग लागला नाही.  

याबाबत घटनास्थळावरून व बोरगाव पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, गुलाबमहंमद भालदार हे सेवानिवृत्त मंडल अधिकारी असून येथील हायस्कूलसमोर त्यांचा बंगला आहे. ते पत्नी रविजासह येथे वास्तव्य करतात. त्यांची दोन मुले रशीद व सुलतान हे नोकरीनिमित्त मुंबई व पाचगणी येथे राहतात. शुक्रवार, दि. 12 रोजी रात्री गुलाबमहंमद भालदार हे पत्नीसह मुलगा रशीद याला भेटायला मुंबई येथे गेले होते. बुधवारी त्यांच्या घरी वीज मीटरचे रीडिंग घेण्यासाठी कर्मचारी गेला होता, त्यावेळी त्याला भालदार यांच्या घराचा दरवाजा तुटलेला दिसल्याने त्याने शेजार्‍यांना हा प्रकार सांगितला. शेजार्‍यांनी त्याची माहिती मुंबईस्थित भालदार कुटुंब व पाचगणी येथील मुलास दिल्यावर सायंकाळी सर्वजण काशीळ येथे पोहोचले. त्यांनी घरात प्रवेश केल्यावर त्यांना बेडरूममधील असलेली दोन्ही लोखंडी कपाटे उघडलेली व तिजोरी फोडलेली आढळली.

तिजोरीत असलेले 21 तोळ्यांचे सोने व चांदीचे दागिने तसेच रोख 4 लाख रुपये असा सुमारे 11 लाख रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.  सोन्याचे दोन गंठण, दोन राणी हार, कानातील सोन्याच्या रिंगा, सोन्याची साखळी, अंगठ्या, चांदीच्या पट्ट्या चोरट्यांनी चोरून नेल्या. 12 ते 17 जुलै दरम्यान ही घडली आहे. या घटनेने कुटुंबिय हादरुन गेले. त्यांनी तातडीने याबाबतची माहिती रात्री उशिरा बोरगाव पोलिसांना दिली. गुरुवारी सकाळी बोरगाव पोलिसांनी घटनास्थळी ठसेतज्ञ व श्वान पथकास पाचारण केले होते. 

उपविभागीय पोलीस अधिकारी समीर शेख, बोरगाव पोलीस ठाण्याचे सपोनि चंद्रकांत माळी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजय कुंभार, उपनिरीक्षक प्रकाश राठोड,  सहाय्यक फौजदार जोतिराम बर्गे, हवालदार तानाजी माने, राम गुरव, संतोष पवार, मोबिन मुलाणी, मयूर देशमुख, विजय सावंत, स्वप्नील माने, राजू शिखरे, किरण निकम, विजय साळुंखे, चालक धनंजय जाधव यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. या घरफोडीची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक प्रकाश राठोड करत आहेत.

या घटनेने काशीळसह परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून चोरट्यांच्या तपासकामी बोरगाव पोलिसांनी तपासाची चक्रे गतीमान केली आहेत.

अवश्य वाचा

तळोजातील घराला आग