जगात कदाचित अशी घटना घडलीच नसेल, अशी महाराष्ट्रातील पुण्यात घडली. ती घटना अशी की, पुण्याजवळील पानशेत येथे एक मोठे धरण बांधून पूर्ण होते न होते तोच एका आठवड्यात ते फुटते काय! आणि संपूर्ण पुण्यात हाहाःकार उडतो काय! हजारो लोकांचा त्यात नाहक बळी जातो काय! हे सारेच अजब वाटते आहे. पानशेत प्रकरण म्हणजे राज्यकर्त्यांचा नादानपणा आणि त्याला अधिकारी वर्गाच्या हलगर्जीपणाची मिळालेली जोड.

इ.स. 1957 साली पुण्याजवळील पानशेत या गावी धरण बांधण्याची कल्पना सरकारची. परंतु, धरण पाच वर्षांत बांधण्याचा अट्टाहास, कारण 1962च्या निवडणुकीत शेतकर्‍याची मते मिळावी, ही यशवंतराव चव्हाणांची खेळी. यशवंतराव चव्हाण व त्यांचे सेक्रेटरी स.गो. बर्वे यांनी धरण पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या अंगावर घेतली. त्यासाठी तज्ज्ञ इंजिनिअर्सची नेमणूक करण्यात आली. धरण मातीनेच बांधावे हे निश्‍चित करण्यात आले. कारण, खर्चही कमी आणि दर्जाही चांगला, हा त्यामागचा उद्देश. तथापि, धरणाचे बांधकाम करताना केलेली तांत्रिक चूक म्हणजे धरणाचे पाणी आतून बाहेर सोडण्याचा मार्ग एकच. तसेच समाजकार्यात राजकारण आडवे आल्याने नको त्या घटना घडत गेल्या. धरण लवकरात लवकर पूर्ण करण्याचा राज्यकर्त्यांनचा आदेश, त्यातच मुख्य इंजिनिअर मायदेव यांच्यावर दडपण आणून प्रसंगी बढतीची लालूच दाखवून धरणाचे बांधकाम एक वर्ष अगोदरच म्हणजे 1961मध्येच पूर्ण करून घेतले आणि येथूनच एका भीषण नात्याला सुरुवात झाली.

5 जुलै 1961ला धरणाचे बांधकाम पूर्ण झाले. त्याच दिवशी सत्यनारायणाची पूजा आयोजित करण्यात आली होती. पाऊस धो-धो कोसळत असल्यामुळे रात्रीचा गायनाचा मनोरंजनाचा कार्यक्रमही रद्द करण्यात आला. पुढे आठवडाभर मुसळधार पाऊस झाला. परिणामी, पाण्याची पातळी वाढली. तथापि, पानशेतला धोका नाही, अशा बातम्यांनी अधिकारी वर्ग देत असल्याने लोक गाफील राहिले. लोकांबरोबरच अधिकारी वर्गही गाफील होता. कमिशनर मोहितेंसह इतरही जबाबदार कोणीही अधिकारी त्या ठिकाणी नव्हते. 11 जुलैला मात्र धरणावर असणार्‍या अधिकार्‍यांचे धाबे दणाणले. धरणाचा काही भाग जेव्हा खचू लागला, तेव्हा लष्कराला पाचारण करण्यात आले. ऑपरेशन ‘बगल भगत’ असे एक विचित्र नाव या मोहिमेला देण्यात आले. भर पाण्यात प्रचंड पावसात लष्कराचे 200 जवान आपला जीव धोक्यात घालून खचलेल्या धरणाच्या जागी मातीच्या गोण्या टाकून भरत होते. तथापि, पाण्याची पातळी इतकी वाढली की, जवानांचा जीव धोक्यात आल्याने ‘बगल भगत मोहीम’ थांबवावी लागली. इतके होऊनही लोकांना कोणतीच धोक्याची कल्पना देण्यात आली नव्हती.

12 जुलैच्या ‘दै. सकाळ’मध्ये पानशेत धरणाचा धोका टाळला, अशी हेडलाईन देण्यात आली. परिणामी, लोक निर्धास्त होते. आपल्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे पुणेकर मुठा नदीला पूर आला आहे म्हणून हातात गरमागरम कणसे, भेळ खात गम्मत पाहात उभे होते. दुपारी 12 वाजेपर्यंत लोकांना धरण फुटल्याची कल्पना नव्हती. पाण्याच्या लोंढ्याने संभाजी पूल गिळला. ओंकारेश्‍वरालाही जलसमाधी मिळाली. तरीही लोक बेसावध होते.

पोलिसांना सूचना मिळाल्यावर मात्र शाळा, कॉलेजला ताबडतोब सुट्टी जाहीर केली. पानशेत धरणाचे माती व गाळाचे पाणी खडकवसल्याच्या दगडी धरणाचा 300 फूट लांब व 100 फूट उंच भरलेला प्रचंड महाकाय बांध फुटून त्याचे पाच तुकडे झाले. (ते आजही तेथे आहेत.) दुपारच्या सुमारास पुराचा तडाखा पुणे शहराला बसला. दुपारी 12 वाजता पाणी लकडी पुलावरून गेले. घरे, देवळे, इमारती, पाण्याखाली बुडाल्या. गम्मत म्हणणे, ज्या दै. सकाळने पानशेतला धोका नाही, अशी बातमी दिली होती, त्यांचे पेपर त्यांच्याच कार्यालयात पाण्यावर तरंगत होते. सारे पुणे जलमय झाले. 

पुढे या घटनेची चौकशी झाली. मेजर ठोसर जनतेच्या वतीने लढले व पूरग्रस्तांना भरपाई मिळाली. पण..?

दिनांक 12 जुलै 2019 

आजचे इतिहासातील दिनविशेष : 

इतर दिनविशेष : 1) 1674- ईस्ट इंडिया कंपनी आणि छत्रपती शिवराय यांच्यात मैत्रीचा करार. 2) 1817- निसर्गप्रेमी अमेरिकन साहित्यिक हेन्री डेव्हिड यांचा जन्म. 3) 1854- छायाचित्रीकरणासाठी वापरल्या जाणार्‍या फिल्मचे संशोधक जॉर्ज इस्टमन यांचा जन्म. 4) 1864- इतिहासकार वि.का. राजवाडे यांचा जन्म. 5) 1888-  दलितांचे कैवारी काकासाहेब बरवे यांचा जन्म. 6) 1892- अमेरिकन संशोधक सायरस वेस्ट फिल्ड यांचे निधन. त्यांचा युरोप आणि अमेरिका तारयंत्राने जोडण्यात सिंहाचा मोठा वाटा. 7) 1913- कादंबरीकार मनोहर माळगावकर यांचा जन्म. 8) 1961- पुण्याजवळील पानशेत धरण फुटले. 9) 1982- ‘राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक’ (नाबार्ड) स्थापना. 10) 1984- शेकापचे नेते उद्धवराव पाटील यांचे निधन. 11) 1994- पटकथा लेखक आणि बोंबे पब्लिसिटी सर्व्हिसचे संचालक वसंत साठे यांचे निधन. 11) 1995- दिलीपकुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर. 12) 1999- खगोलशास्त्रज्ञ डॉ. रमतोष सरकार यांचे निधन. 13) 1999- ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांना प्रदान. 14) 2003- पर्यावरण शास्त्रज्ञ प्रा. माधव गाडगीळ यांना ‘व्होल्व्हो एन्व्हायरमेंट’ पारितोषिक जाहीर. 15) 2014- राष्ट्रीय अन्न प्रक्रिया अभियानांतर्गत महाराष्ट्राला 13 कोटींच्या तरतुदीची घोषणा कृषी व अन्नप्रक्रिया राज्यमंत्री डॉ. संजीवकुमार बालियान यांनी लोकसभेत केली. 16) 2015- अफगाणिस्तानात अमेरिकेच्या तळावर झालेल्या हल्ल्यात 25 जण मृत्युमुखी. 17) 2016- सुदानमध्ये वांशिक संघर्षात शेकडोंचे बळी, बंडखोर नेता व सुदानचे उपाध्यक्ष यांनी युद्धबंदी जाहीर केला. 18) 2016- इटलीत रेल्वेच्या विचित्र अपघातात 50 ठार, शेकडो जखमी.

अवश्य वाचा