आषाढी एकादशी हा महाराष्ट्रासाठीच नव्हे, तर जगातल्या अनेक भाविकांसाठी महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी वारकर्‍यांचा जत्था पंढरीत येऊन थकडतो आणि वारी संपन्न होते. मोठ्या श्रद्धेने हजारो वारकरी वारीसाठी घराबाहेर पडलेले असतात. विठ्ठलाचे रुप डोळा भरुन पाहण्यासाठी वाटेतल्या प्रत्येक अडचणीवर ते हसत-हसत मात करत असतात. अशा प्रकारे दरमजल करत ते पंढरीत येतात तेव्हा प्रचंड मोठा भक्तीसागर उसळून येतो. विठ्ठलचरणी असणारी अपार श्रद्धा हाच पंढरपुरी दाखल होणार्‍या प्रत्येक वारकर्‍याच्या पायी प्रवासाचा पाया आहे. गीतेसारखा संस्कृत ग्रंथ ज्यांनी मराठीत आणला आणि त्यातले ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचवले त्या ज्ञानाचा, आत्मचिंतनाचा एक छोटा भाग होण्याची आणि हे ज्ञान अनुभवण्याची संधी मिळावी म्हणून लोक वारीत सहभागी होतात. माऊलीच्या विवेचनात दिसणारा तो श्रद्धाभाव इथे सगुणरुपात पाहायला मिळतो. या विचारांमध्ये एकात्मता असते. त्यामुळेच समाज कोणताही भेदाभेद न पाळता एकत्र येतो आणि वारीमध्ये एकात्मिकतेचे दर्शन घडवतो. यातूनच आपल्याला ग्रंथांमध्ये वाचलेल्या अक्षरांची जिवंत माणसांच्या भावनांमध्ये पडलेली प्रतिबिंब पाहायला मिळतात. इथे त्या अक्षरांमधल्या विचारांची अनुभूती मिळते. 

प्रत्येकालाच ग्रंथ, पुस्तक, पोथ्या, पुराणे हे सगळे वाचणे शक्य होते असे नाही. सगळेच संपूर्णपणे आध्यात्मिक अंगाने जगण्यास सक्षम नसतात. मात्र, त्या तत्त्वज्ञानाचा विचार लोकांच्या मनात सहज रुजावा या दृष्टीने वारी महत्त्वाची आहे आणि फार मोठा आनंद देणारी आहे, असे वाटते. भले मोठे अंतर पायी चालत येणार्‍या प्रत्येकाचा शीण पंढरी जवळ आल्यानंतर निघून जातो. पंढरीच्या परिसरातल्या मातीचा सुगंध आला, तिचा पदस्पर्श झाला, चंद्रभागेचे स्नान झाले की प्रत्येकजण शारीरिक श्रम विसरतो आणि पांडुरंगमय होऊन जातो. खांद्यावर नाचवत आणलेली पताका चंद्रभागेत बुडवून काढली आणि नदीत बुडी मारुन अथवा पाय धुऊन विठ्ठलाच्या मंदिर कळसाचे दर्शन घेतले की, प्रत्येकाच्या मनात श्रद्धाभाव उचंबळून येतो आणि आपल्या वृत्ती पावन झाल्याचा साक्षात्कार घडतो. त्यावेळी त्यांच्या आनंदाला पारावार राहात नाही. पंढरी दृष्टिक्षेपात आल्यानंतरच वारकर्‍यांच्या आनंदाला भरतं यायला सुरुवात होते. संत तुकारामांच्या एका अभंगातल्या शेवटच्या चरणात म्हटल्याप्रमाणे ‘तुका म्हणे धावा, आहे पंढरी विसावा’ या भावाला अनुसरुन हजारो वारकरी पंढरीकडे धाव घेतात. त्यालाच धावा असे म्हणतात. यावेळी प्रत्येक दिंडी उतारावरुन धावत येते. अन्य संतांच्या पालख्यांप्रमाणे माऊलींची पालखीदेखील धावत आणली जाते आणि नंतर विसाव्यावर ठेवली जाते. तिथे भारुडे सादर होतात. ती आनंद व्यक्त करणारी असली तरी मनोरंजनाबरोबर त्यात अध्यात्माचा सुंदरसा पायादेखील असतो. लोकांच्या मनाला आकर्षित करतील असे रंगीबेरंगी कपडे घालून, चेहरा रंगवून ही भारुडे सादर होतात. 

धाव्याच्या आधी गोल रिंगणे पार पडतात. रिंगणात माऊलींच्या अश्‍वाने घेतलेला वेग वारकर्‍यांच्या मनात जोश निर्माण करतो आणि त्याच उत्साहात वारकरी मृदुंगाच्या, टाळाच्या तालावर नाचत ‘रामकृष्ण हरी’चा जप करत खेळांमध्ये रंग भरतात. महिला झिम्मा-फुगडी घालतात तर पुरुषवर्ग खो-खो, कबड्डी, लगोर यासारखे खेळ खेळतात. त्याचप्रमाणे एकमेकांना चिडवत, धावत ओलांडून जायचे असे खेळही खेळले जातात. धावताना समोरच्याला चिडवण्यासाठी वाकुल्या दाखवण्याचे प्रकारही असतात. त्याचबरोबर दहीहंडी फोडताना मानवी मनोरे रचतात त्या प्रकारे दिंडीत एकमेकांच्या खांद्यावर उभं राहून मनोरा रचला जातो. या मनोर्‍यातला सर्वात वरचा वारकरी गळ्यात अडकलेला पखवाज वाजवतो. कधी-कधी हा वारकरी खांद्यावरची पताका अथवा ध्वज फिरवतो. वारकरी ‘उडी’ खेळतात. यात विविध प्रकारे टाळ वाजवले जातात. लोळून टाळ वाजवणे, पालथे पडून टाळ वाजवणे, उताणे पडून एकमेकांच्या शरीराचा भार पेलून टाळ वाजवून हा खेळ आनंदाने खेळला जातो. हा खेळ खेळताना माऊलीच्या पालखीभोवती टाळकर्‍यांचे सुंदर पुष्प तयार होते. टाळांचा हा गजर इतका मोठा असतो की पंचक्रोशीतल्या गावांमध्येही सहज ऐकू येतो.

आषाढी एकादशी ही समस्त भारतवर्षातली सर्वश्रेष्ठ एकादशी आहे. याला देवशयनी एकादशी असेही म्हणतात. हे एक व्रत आहे. वारकरी संप्रदायाने याला वेगळा संदर्भ दिला आहे. राजा आणि रंक यांनी एकत्र येऊन साजरा करावा, असा हा मंगलमय सोहळा त्यांनी यानिमित्ताने साजरा केला आहे. इथे आपल्या भक्तासाठी साक्षात पांडुरंग आले आहेत आणि त्याने फेकलेल्या एका विटेवर उभे राहिलेले आहेत. ही अशी देवता आहे ज्याच्या पायी भाविक मस्तक टेकवू शकतात, मूर्तीला स्पर्श करु शकतात. म्हणजेच केवळ दृष्टीने नव्हे, तर स्पर्शानेही इथे आपण देवाचे दर्शन घेऊ शकतो. देव प्रत्येकाला ममतेने जवळ घेतो. भक्तांची भेट घेताना तो कोणताही आडोसा ठेवत नाही, आडपडदा ठेवत नाही. अगदी सामान्यातला सामान्यही त्याच्या पायाशी जाऊन श्रद्धापूर्वक नमन करु शकतो. असा स्नेहभाव असल्यामुळेच आषाढी एकादशी हा पंढरीतला भक्तीचा महाकुंभ ठरतो. नाम घेता वाट चाले, यज्ञ पावला पाऊली ही इथपर्यंत येणार्‍या प्रत्येक वारकर्‍याची मनोभूमिका असते. पूर्वी इच्छित कामना पूर्ण व्हावी यासाठी यज्ञयाग केले जायचे. परंतु, आता ही यज्ञसंस्कृती शिल्लक राहिलेली नाही. 

दर वर्षी आषाढी एकादशीला पंढरी भक्तांनी फुलून येते. या गर्दीत तरुणाईचा सहभाग लक्षणीयरित्या वाढत आहे. देशातलेच नव्हे तर पाश्‍चात्य देशातले लोकही आता या उत्सवाच्या निमित्ताने गर्दी करतात. लहान-थोर, स्त्री-पुरुष असा कोणताही भेद न पाळता सगळे गुण्यागोविंदाने नामजपात रममाण झालेले पाहून आश्‍चर्यचकित होतात आणि एक हृद्य सोहळ्याचा आनंद घेऊन अंतर्यामी संतोष पावतात. वारीतली शिस्त त्यांना अचंबित करुन टाकते. आषाढी एकादशीनिमित्त पंढरीत वेगवेगळ्या संतांच्या पालख्यांचा मुक्काम असतो.  वाखरीत विसाव्यावर सगळ्या संतांच्या पालख्या एकत्र येतात. तिथे शितोळे सरकारांच्या गळ्यात रेशमी वस्त्रात लपेटलेल्या पादुका अडकवल्या जातात. तिथून त्या चंद्रभागेला आणल्या जातात. तिथे स्नान घातल्यानंतर त्या माऊलींच्या मंदिरात प्रस्थापित होतात. अशा प्रकारे दशमीला आपापल्या मठ अथवा मंदिरामध्ये संतांच्या पादुका विराजमान होतात. व्यासपौर्णिमेपर्यंत त्यांचा पंढरीत मुक्काम असतो. व्यासपौर्णिमेला जनाबाईच्या मंदिरात काला असतो. तो घेऊन सगळ्या पालख्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये जातात. हा अर्थातच निरोपाचा क्षण असतो. जाण्याआधी विठुरायाची भेट घ्यायची असते. अगदी भल्या पहाटे चारपासून निरोपाच्या भेटीचा हा हृद्य सोहळा पार पडतो. सगळ्या संतांची विठ्ठलभेट झाली की सर्वात शेवटी ज्ञानेश्‍वर माऊलींच्या पादुका विठ्ठलाच्या भेटीसाठी येतात. इथे गंमत बघा, वाखरीतून पंढरीत प्रवेश करताना ज्ञानेश्‍वर महाराज सगळ्या संतांच्या मागे राहून पंढरीत प्रवेश करतात आणि सर्व संतांची विठ्ठलभेट झाल्यानंतर सर्वात शेवटी त्या सावळ्याचे दर्शन घेऊन माघारी फिरतात. अशा प्रकारे आषाढी एकादशीनिमित्त आलेला संतभार स्वस्थानी परततो. 

ही एक श्रद्धा आहे, विठ्ठलाप्रतीचे अमाप प्रेम आहे, त्याच्यावरील अपूर्व विश्‍वास आहे आणि अपार निष्ठा आहे. म्हणूनच वर्षानुवर्षे येत राहिले तरी वारकरी वारी करण्यास कंटाळत नाहीत. गर्दीमुळे विठ्ठलाचे दर्शन झाले नाही तरी हिरमुसत नाहीत. अनंत वेळा ते रुप पाहिले तरी मनीची ओढ संपत नाही. कारण, विठ्ठल त्या मूर्तीत आहे, तसाच सगळीकडे त्याचा संचार आहे. म्हणूनच हाडाचा वारकरी सगळ्यांठायी त्याचे दर्शन घेतो, सान-थोरांच्या पायी लागत वंदन करतो आणि संतुष्ट मनाने परत फिरतो. यावेळी त्याच्या मनात एक वारी पूर्ण केल्याचे समाधान असतेच; पण, त्याच वेळी पुढल्या वारीला येण्याची खूणगाठही त्यानेे मनाशी बांधलेली असते.

(लेखिका वारकरी संप्रदायाशी संबंधित असून, उत्कृष्ट भारुड सादरीकरणाबद्दल त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.)

 

अवश्य वाचा

पैशांसाठी देशद्रोह

टीकेकडे लक्ष द्या...