अलिबाग 

कोरोना विषाणूच्या विरोधातील लढाईत अन्न पुरवठा वितरण प्रणाली देखील मोठया तयारीत मैदानात उतरली आहे. संचारबंदीच्या काळात पात्र शिधा पत्रिका धारकांची गैरसोय होऊ नये यासाठी दक्षता घेत एप्रिल, मे, जुन अशा तीन महिन्यांचा शिधा रास्त भाव धान्य दुकानात (रेशनिंग) 1 एप्रिल पासून वितरण करण्यास सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी मधूकर बोडके यांनी दिली.

संचारंबदीमुळे अन्नपुरवठयावर परिणाम होईल की काय या भीतीने मोठया प्रमाणावर नागरीक गर्दी करुन खरेदीसाठी बाहेर पडत असतानाच पुरवठा विभागाने दिलासा देत एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांचा एकत्रित शिधा वाटप 1 एप्रिल पासून सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील पुरवठा विभागही सज्ज झाला आहे. पुरवठा विभागाकडे पुरेसा साठा असल्याची माहिती  जिल्हा पुरवठा अधिकारी मधूकर बोडके यांनी दिली.

जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा खुल्या बाजारात घाऊक तसेच किरकोळ व्यापार्‍यांकडे उपलब्ध आहे. त्याचे वितरण देखील सुरळीत सुरु आहे. मात्र नागरिकांनी दक्षता घेत सामाजिक सुरक्षित अंतर राखून दिलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

मधूकर  बोडके ,जिल्हा पुरवठा अधिकारी

वाशी येथील कृऊबाजार समितीचे मार्केट सुरु

वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे घाऊक मार्केट सकाळी 7 वाजल्यापासून सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे जिवनावश्यक वस्तूंची खरेदी व्यापार्‍यांना करता येणे शक्य आहे. आवश्यक त्या व्यापार्‍यांना मालाची वाहतूक करण्यासाठी पासेस चे वितरण करण्यात येत असून त्यांनी काळाबाजार अथवा चढया भावाने विक्री करुन जनतेहा त्रास देऊ नये अशा सुचनाही देण्यात आल्याचे मधूकर बोडके यांनी सांगितले.

अवश्य वाचा

मुंबईतील क्राइम रेट घटला.