माणगाव 

माणगाव नगरपंचायत हद्दीत तसेच तालुक्यातील सर्वच गावातून दुपारच्या सत्रात खास करून सर्वत्र कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सन्नाटा पसरल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. कोरोनाच्या विषाणूने  जनता पूर्णपणे भयभीत झाली असून आता या विषाणूवर  मात करण्याचे नागरिकांनीच ठरविले असल्याने कोणीच महत्वाच्या कामाव्यतिरिक्त बाहेर रस्त्यावर येताना दिसत नाही.

  कोरोना महामारीपासून जनतेचा सुटकारा व्हावा यासाठी केंद्र व राज्य सरकार अनेक युक्त्या लढवीत आहे.सरकारच्या आदेशाने वेगवेगळ्या शासकीय यंत्रणेचे आधिकरी व कर्मचारी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी व सफाई कामगार हे सतर्क राहून आपल्या भागातील नागरिकांना वेळोवेळी विनवणी करीत आहेत.माणगाव हे तालुक्याचे ठिकाण असल्याने येथे मोठी बाजारपेठ आहे.त्यामुळे याठिकाणी ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने खरेदीसाठी येत असतात.यासाठी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर माणगाव नगरपंचायतीने अत्यावश्यक असलेली जीवनावश्यक वस्तूंची दुकाने म्हणजेच किरणामाल,दूध,भाजीपाला यांसारखी  दुकाने सकाळी 9 ते 11 व सायंकाळी 4 ते 6 यावेळेत सुरू ठेवली आहेत.या कालावधीत नागरिक येऊन झटपट खरेदी करून घरी जात आहेत.त्यानंतरच्या काळात माणगावात व आसपासच्या सर्वच गावांतून सन्नाटा दिसत आहे.पोलीस अधिकारी व कर्मचारी हे सर्वत्र फेरफटका  मारून बंदोबस्त करीत आहेत.दिलेल्या वेळेच्या पुढे कोणी नागरिक बाजारपेठेत दिसत असल्यास त्यास पोलिसी खाक्या दाखवून  समज देत आहेत.शक्यतो वेळेअभावी तसा कोणीच माणगाव नगरीत दिसत नाही.शासनाच्या संपूर्ण यंत्रणा याकाळात अथक परिश्रम घेऊन गावागावांतून काम करीत आहेत.देशावर आलेले हे संकट दूर करण्यासाठी सर्वांनी यापुढेही असेच 14 एप्रिलपर्यंत सहकार्य करावे असे आवाहन माणगाव नगरीचे माजी नगराध्यक्ष आनंदशेठ यादव यांनी केले आहे.

अवश्य वाचा