नवी दिल्ली 

84 वी वरिष्ठांची राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप कोरोना व्हायरसच्या फैलावामुळे तहकूब करण्यात आली आहे. लखनौमध्ये ही स्पर्धा 27 एप्रिल ते 3 मे या कालावधीत होणार होती, असे भारतीय बॅडमिंटन संघटनेने (बीएआय) सांगितले.

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाने जगभरात 16,000 हून अधिक बळी गेले आहेत तर सुमारे 4 लाख जणांना त्याची लागण झाली आहे. भारतात कोरोनाचे आतापर्यंत 9 बळी गेले असून 500 जणांना त्याची बाधा झाली आहे. सध्याची परिस्थिती पाहून बीएआयने सर्व राज्यांच्या बॅडमिंटन संघटना सचिवाना लखनौकडे येण्याचे टाळण्यास सांगण्यात आले आहे. ङ्ग84 वी वरिष्ठांची राष्ट्रीय बॅडमिंनट चॅम्पियनशिप तसेच 75 वी आंतरराज्य आंतरविभागीय स्पर्धाही तहकूब करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. लखनौला येण्यासाठी तिकिटे काढली जाऊ नये, असे राज्य संघटना सचिवांना आताच कळविण्यात आले आहे,फ असे अजय सिंघानिया यांनी सांगितले.

ङ्गकोरोनाच्या प्रसाराला आळा घालण्याच्या उद्देशाने देशात 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. अशा स्थितीत आम्ही खेळाडू व पदाधिकाऱयांचे आरोग्य धोक्यात घालू इच्छित नाही. या स्पर्धांसंदर्भात 1 एप्रिल रोजी पुन्हा एकदा स्थितीचा आढावा घेतल्यानंतर आणि सरकारच्या नव्या दिशानिर्देशानुसार निर्णय घेतला जाईल,फ असेही सिंघानिया म्हणाले. बीएआयने कार्यकारी कौन्सिलच्या सदस्यांना वरील स्पर्धा भरविण्याबाबत त्यांची मते विचारण्यात आली होती आणि त्यापैकी खूप जणांनी स्पर्धा लांबणीवर टाकली जावी, असेच मत मांडले.

भारतामध्ये 32 राज्ये व केंद प्रशासित राज्यांमध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे तर पंजाब व महाराष्ट्रमध्ये तसेच केंद्रशासित प्रदेश पुडुचेरीमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. ङ्गहे अतिशय चिंताजनक संकट असल्याने आरोग्य यालाच सर्वप्रथम प्राधान्य देण्याची गरज आहे. 31 मार्चपर्यंत प्रतीक्षा करून स्थितीचा आढावा घेऊन त्यानुसार बीएआय निर्णय घेईल,फ असे उत्तरप्रदेश बॅडमिंटन संघटनेचे सचिव अरुण कक्कर म्हणाले. सायना नेहवाल व सौरभ वर्मा हे या स्पर्धेचे विद्यमान विजेते असून गेल्या वर्षी गुवाहाटीत झालेल्या स्पर्धेत त्यांनी जेतेपद मिळविले होते.

जागतिक बॅडमिंटन संघटनेनेही 12 एप्रिलपर्यंत सर्व स्पर्धा कोरोना महामारीच्या संकटामुळे लांबणीवर टाकल्या आहेत. या संकटामुळे अनेक देशांनी आपल्या सरहदी बंद केल्या असून पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आले आहे. या संकटाविरुद्धच्या लढाईत भारतीय खेळाडूंनी सकारात्मक मानसिकता ठेवावी आणि घरीच राहून योगदान द्यावे, अशी विनंतीही बीआयने केली आहे.

 

अवश्य वाचा

माथेरानच्या पायथ्याशी वणवा