मुंबई  

राज्यात 21 दिवसांचा ङ्गलॉकडाऊनफ, संचारबंदी असली तरी दूध, भाजीपाला, फळे, औषधे, अन्नधान्य, कुकिंग गॅसचा आदी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा नियमित सुरु आहे. तरीही बाजारात खरेदीसाठी होणारी नागरिकांची गर्दी चिंताजनक आहे. या पार्श्‍वभूमीवर जीवनावश्यक वस्तू घरपोच किंवा सोसायटी परिसरात उपलब्ध करण्याबाबत स्थानिक स्वराज संस्थांनी नियोजन करावे, अशा सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतरचा आजचा दुसरा दिवस आहे. याच पार्श्‍वभूमीवर राज्यातील परिस्थितीसंदर्भात भाष्य करताना उपमुख्यमंत्र्यांनी बाजारपेठांमध्ये जीवनावश्यक वस्तूंसाठी होणार्‍या गर्दीसंदर्भात चिंता व्यक्त केली. लॉकडाऊनच्या कालावधीत जीवनावश्यक वस्तू घरपोच किंवा सोसायटी परिसरात उपलब्ध होतील यासंदर्भात योग्य ते नियोजन स्थानिक स्वराज संस्थांनी केलं पाहिजे. अशाप्रकारचे नियोजन बारामती आणि वाई शहरात करण्यात आलं आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली.

शहरांमध्ये एकाटेच राहत असलेले ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, रस्त्यावर राहणारे गरीब, बेघर यांच्या भोजनाची सोय करण्यासाठी समाजातील वेगवेगळ्या घटकांनी तसेच स्वयंसेवी संस्थांनी पुढे यावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे. प्रवासबंदी असताना काही जणांनी दुधाच्या टँकरमध्ये बसून प्रवास केल्याच्या घटना पुढे आल्या आहेत. ही बेपर्वाई चिंताजनक असल्याचे मतही अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे.

लोक बाजारात, रस्त्यावर ज्या पद्धतीनं गर्दी करत आहेत, सुरक्षित अंतर पाळत नाहीत, यामुळे कोरोनाच्या प्रादुर्भावाचा धोका वाढत आहे, अशा शब्दांमध्ये अजित पवार यांनी लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावर येणार्‍या गर्दीबद्दलही चिंता व्यक्त केली.

 

 

अवश्य वाचा

लवेनोड येथे जनता मार्केट