रत्नागिरी  

संचारबंदीनंतर रत्नागिरी जिल्ह्यात येणार्‍या सर्व सीमा बंद झाल्यामुळे गावी परतण्याच्या तयारीत असणार्‍यांचे मोठे हाल झाले आहेत. जिल्ह्याच्या सीमेवरूनच पोलिसांनी मुंबई, पुणेकरांना माघारी धाडले आहे. या पार्श्‍वभूमीवर मुंबईतील चाकरमानी गाव गाठण्यासाठी नवनवीन शक्कल लढवू लागले आहेत. काही चाकरमान्यांनी हजारो रुपये भाडे देत मच्छिमारी नौकांच्या सहाय्याने गावात पाऊल टाकले आहे. दरम्यान, ग्राम दक्षता कमिटीच्या सदस्यांनी यांना पकडल्याची चर्चा सुरू आहे.

मुंबईमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने भीतीचे वातावरण आहे. त्यात संचारबंदीसह प्रवासी वाहतुकीची सर्व साधने बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे चाकरमान्यांनी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवण्यास सुरुवात केली आहे. काही तरुण दुचाकीवरुन मुंबईतून रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या दिशेने निघाले होते. त्यांना कशेळी घाटात पोलिसांनी थांबवून माघारी पाठवले. जे तरुण जिल्ह्यात दाखल झाले, त्यांना पोलिसांनी पकडून रुग्णालयात तपासणीसाठी आणले.

स्वत:च्या घरी येण्यासाठी काहीजण असा प्रकार करीत असतानाच, काही चाकरमान्यांनी तर हद्दच केली. मच्छिमारी नौकांना भाडे देऊन काही चाकरमानी गावी येऊ लागले आहेत. यात प्रामुख्याने गुहागर तालुक्यामधील वेळणेश्‍वर, बोर्‍या बंदर, कोंड कारूळ, असगोली, जयगड या भागात चाकरमानी आल्याची चर्चा आहे. काही गावांत ग्राम दक्षता समितीने आलेल्या चाकरमान्यांना शाळांमध्ये ठेवले असल्याची माहिती मिळाली आहे. हे चाकरमानी 70 ते 90 हजार भाडे देऊन नौकेतून आले आहेत. एका नौकेत 18 ते 20 जणांचा समावेश असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, नौकेतून आलेल्या चाकरमान्यांची तपासणी व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. त्याचप्रमाणे प्रवाशांची वाहतूक केल्याप्रकरणी नौकामालकांवर कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस माहिती घेत असल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी सांगितले.

 

अवश्य वाचा

लवेनोड येथे जनता मार्केट