मुंबई 

कोरोनाला अटकाव करण्यासाठी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी कर्फ्युत पोलिसांकडून होणार्‍या कारवाईवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यामध्ये मतभिन्नता असल्याचे निष्पन्न झालेले आहे. मुख्यमंत्र्यांनी पोलिसांनी लाठीचार्ज करु नये असे निर्देश दिलेले असताना गृहमंत्र्यांनी मात्र  टवाळकी करणार्‍यांना दंडुक्याचा प्रसाद द्या,असे फर्मान काढले आहे.

 सौम्यपणे वागा, लाठीमार नको;

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी आणि जमावबंदी लागू असतानाही विनाकारण घराबाहेर पडणार्‍यांना पोलिसांनी अखेर कायद्याचा मदंडुकाफ दाखविण्यास सुरुवात केली आहे. मात्र, बाहेर पडणार्‍या लोकांशी सौम्यपणे वागा आणि त्यांच्यावर थेट लाठीमार करू नका, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य पोलीस आणि शहर पोलिसांना दिले आहेत.

 करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारनं अनेक निर्बंध उपाय योजले आहेत. तसंच राज्यात संचारबंदी लागू केली आहे. या काळात कुणीही घराबाहेर पडू नका, असे आदेश आहेत. मात्र, तरीही काही लोक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. अखेर पोलीस यंत्रणेनं या लोकांना दंडुका दाखवण्यास सुरुवात केली आहे. काही ठिकाणी नागरिकांना विचारपूस करण्याआधीच पोलिसांकडून चोप दिला जात असल्याचं व्हिडिओंमधून दिसून आलं आहे. जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी यांनी यासंदर्भात राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांच्याकडे तक्रार केली. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारे ट्रक अडवले जात आहेत. तसंच पेट्रोल पंपही बंद करण्यात आले असल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली. पालघर येथे भाजीपाल्याची वाहतूक करणारे ट्रक अडवले जात आहेत. तसंच काही ठिकाणी पोलीस हे लोकांना चोप देताना व्हिडिओंमध्ये दिसत आहे. मेहता यांनी सचिवांसोबत झालेल्या आढावा बैठकीत या सर्व बाबी निदर्शनास आणून दिल्या. तसंच या संदर्भात मुख्यमंत्र्यांनाही माहिती दिली.

 यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी महासंचालक सुबोध जयस्वाल आणि पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याशी संपर्क साधून, यासंदर्भात बंदोबस्तावरील सर्व अधिकार्‍यांना सूचना द्याव्यात, असं सांगितलं. जर नागरिक जीवनावश्यक वस्तूंसाठी घराबाहेर पडत असतील तर, त्यांच्याशी सौम्यपणे वागा. याशिवाय अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा, अन्यथा घरीच थांबण्यास सांगावे, असं मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना दिलेल्या संदेशात म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी पोलिसांच्या कामगिरीचं कौतुकही केलं. मास्कचा काळाबाजार करणार्‍यांवर कारवाई करून त्यांना अटक केल्याबद्दल पोलिसांचे मी आभार मानतो, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

 गृहमंत्र्यांचे निर्देश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर केला आहे. राज्यातही संचारबदी लागू असून कोणीही विनाकारण बाहेर न फिरण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. तरीही काही नागरिक हे आवाहन जुमानत नसल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे. यावर आता राज्याचे गृहखाते अधिक कठोर झालेले पाहायला मिळत आहे. सरकारचे आदेश न जुमानता टवाळक्या करणार्‍यांना आता कठोर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.  

 नागरिकांना घरात बसण्याबाबत नागरिकांना वारंवार विनंती केली पण उपयोग झालेला नाही. अनेक जण टवाळक्या करत फिरत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.

अवश्य वाचा

भाजपचे यश ः शोध आणि बोध