जेएनपीटी

 कोरोना बिषाणु संसर्ग रोखण्यासाठी शासनाने जिल्ह्याच्या सीमा रोखण्याचा निर्णय संचारबंदी लागू करून घेतला आहे.तरी पण नागरीक बाजारपेठ,गावा गावातील रस्त्यावर वावरत आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव यापुढे रोखण्यासाठी उरण तालुक्यातील भेंडखळ ग्रामस्थांनी गावाच्या प्रवेशद्वाराजवळ कोरोना बाधित संशयास्पद परप्रांतीय नागरीकांना रोखून ठेवण्यासाठी गाव बंदी घालण्याचा निर्णय घेतला असल्याचे चित्र भेंडखळ गावातील प्रवेशद्वाराच्या जवळ लावण्यात आलेल्या जाहिरातीच्या माध्यमातून पाहावयास मिळत आहे.

 सध्या जगातील व देशातील जनता कोरोनाच्या दहशती खाली वावरत आहेत. त्यामुळे कोरोनाची दहशत मोडीत काढण्यासाठी केंद्र व राज्य सरकार अनेक उपाययोजना करत आहेत.परंतु त्या उपाययोजनाची आणि शासनाच्या अंमलबजावणीच काही ठिकाणी काटेकोर पणे पालन करण्यात येत नसल्याने राज्यात कोरोनाचे संशयास्पद रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी संचारबंदी लागू करून जिल्ह्याच्या सीमा रोखण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे.

  राज्य सरकारच्या निर्णयानुसार उरण तालुक्यातील पोलीस यंत्रणा उरण तालुक्यातील जनतेला आप आपल्या कुटुंबासह घरी राहाण्याचा सबुरीचा सल्ला ठिक ठिकाणी नाका बंदी करुन देत आहेत.परंतु काही हवसे गवसे नागरीक तसेच परप्रांतीय नागरीक बाजारपेठ तसेच या गावातून त्या गावात जाणुन बुजून फेरफटका मारत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव यापुढे रोखणार कोण असा प्रश्‍न गावो गावच्या रहिवाशाना पडला आहे.कोरोनाच्या महामारीला गावाच्या वेशीवर रोखून ठेवण्यासाठी उरण तालुक्यातील भेंडखळ ग्रामस्थांनी ठोस उपाययोजना म्हणून गावाच्या प्रवेशद्वाराजवळ परप्रांतीय नागरीकांना रोखून ठेवण्यासाठी गाव बंदी घालण्याचा निर्णय घेतला असल्याचे चित्र प्रवेशद्वाराच्या जवळ लावण्यात आलेल्या जाहिरातीच्या माध्यमातून पाहावयास मिळत आहे.

 

अवश्य वाचा

भाजपचे यश ः शोध आणि बोध