अलिबाग

ना शोभायात्रा,ना ढोल ताशांचा निनाद,फक्त आणि फक्त शांतता अन शांतता अशा सुतकी वातावरणात बुधवारी प्रत्येकाच्या जीवनात पहिल्यांदाच नववर्षाचा गुढी पाडव्याचा सण अत्यंत साधेपणाने कोरोनाच्या धास्तीने साजरा झाला.अर्थात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने अवघ्या देशभरातच कर्फ्यु लागू केला असल्याने नागरिकांनीही कोरोनाचे विघ्न दूर व्हावे यासाठी घरातून बाहेर न पडता कुटुंबासमवेतच गुढीपाडव्याचा सण साधेपणाने साजरा करीत सरकारला आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत हे कृतीने दाखवून दिले.

गुढी पाडवा हा महाराष्ट्रीयन जनतेसाठी अत्यंत मोलाचा सण.साडेतीन शुभ मुहूर्तापैकी पहिलाच हा शुभ दिन.त्यामुळे या सणाचे स्वागत दरवर्षी महाराष्ट्रात आगळ्यावेगळ्या पद्धतीने आणि धुमधडाक्यात साजरे करण्याची परंपरा आहे.गेल्या काही वर्षात तर नववर्षाच्या स्वागतासाठी शोभायात्रा सुरु करण्यात आलेल्या आहेत.त्यामुळे सारे वातावरण देखील आनंदमय होऊन जायचे.मराठी वर्षाचा पहिला दिवस म्हणून प्रत्येक कुटुंबात श्रीखंडपुरीचा बेतही आखला जायचा.दारात गुढी उभारली जायची,त्यासाठी झेंडुच्या फुलांची माळ,शोभायची,सोबत साखरेची माळ या गुढीची शोभा वाढवून टाकायची.दारात घातलेली रांगोळीने आणि दरवाजाला बांधलेल्या झेंडूच्या फुलाच्या तोरणानी सारे वातावऱण आल्हाददायक बनलेले असायचे.

साडेतीन शुभ मुहुर्तापैकी एक म्हणून गुढी पाडव्याकडे पाहिले जायचे आणि सोने खरेदीसाठी,वाहने खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडायची.सोन्या चांदीच्या पेढ्या तर ग्राहकांनी फुलून गेलेल्या असायच्या आणि वाहनांच्यी खरेदीसाठी ग्राहकांची चढाओढ लागलेली असायची.विविध कंपन्याही यानिमित्ताने आकर्षक सवलती जाहीर करायच्या.वृत्तपत्राची पाने विविध गृहप्रकल्पांच्या जाहिरातीनी भरुन गेलेली असायची.एकूणच गुढी पाडव्याचे हे वर्षानुवर्षे डोळ्यात साठवून ठेवलेले रुप यावेळी मात्र कुणालाच पाहता आले नाही.निमित्त त्या भयावह कोरोना साथीचे.

कुठून त्या चीन,इटलीमधून तो कोरोना भारतात आला अन अवघी अर्थव्यवस्थाच बिघडून टाकली.या साथीचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारला कठोर पाऊले उचलावी लागली आणि अवघ्या राज्यभर कर्फ्यु लागू करावा लागला.पाठोपाठ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अवघ्या देशातच कर्फ्यु जारी करुन 14 एप्रिलपर्यंत घरातच राहण्याचे कळकळीचे आवाहन आम जनतेला केले.त्यांच्या आवाहनानुसार राज्यातील जनतेने गुढी पाडव्याचा सण अत्यंत साधेपणाने साजरा करणे पसंत केले.गुढ्या उभारल्या खर्‍या,पण त्या उभारताना इडा,पीडा टळो,कोरोनाचे संकट दूर होवो,अशी मनोकामना देखील सर्वांनीच त्या विधात्याकडे केली.

सोशल मिडियाही सुनासुना

गुढीपाडव्याला विविध वेषभुषा करुन शोभायात्रेत सहभागी झालेली मंडळी सोशल मिडियावर आपापले फोटो टाकून मित्र परिवाराला पाठवित असतात.त्यामुळे दिवसभर मोबाईल या फोटोनी भरुन जातो.यावेळी मात्र तसे काहीच घडले नाही.त्यामुळे सोशल मिडिया देखील सुनासुनाच वाटला.

अवश्य वाचा

भाजपचे यश ः शोध आणि बोध