मुंबई 

कोरोना व्हायरस हा छुपा शत्रू आहे, तो कुठून हल्ला करेल हे सांगता येत नाही. घराबाहेर पाऊल आपण टाकलं तर शत्रू आपल्या घरात पाऊल टाकेल हे विसरु नका. या करोनाला हरवण्याा संकल्प करा असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

 घरांमध्ये लोक एकत्र आले आहेत. घरातले एसी बंद करा, घरातल्या खिडक्या दरवाजे उघडा असंही आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. काल काहीशी गोंधळाची परिस्थिती होती. त्यामुळे मी सकाळी शुभेच्छा द्यायला आलो नाही, तर दुपारी आलो असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कमी होणार नाही, बंदही होणार नाही. वैद्यकीय सेवाही बंद होणार नाहीत याचा उद्धव ठाकरेंनी पुनरुच्चार केला.

 सध्याच्या घडीला अनेक घरांमध्ये कुटुंबीय एकत्र आले आहेत. ही एक सकारात्मक गोष्ट आहे. आपल्या कुटुंबीयांना वेळ द्या. स्वतःची आणि कुटुंबीयांची काळजी घ्या असंही आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

 घरांमधले एसी बंद करण्यासंबंधीचे निर्देश केंद्राकडून आले आहेत. आम्ही त्यांना सांगितलं की ते तर आम्ही केव्हाच सुरु केलं आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो आहे, घरातले एसी बंद ठेवा आणि दारं खिडक्या उघड्या ठेवा. चला हवा येऊ द्या, कारण असं केल्याने करोनाचा प्रादुर्भाव थांबवता येईल.

 एवढंच नाही तर करोनाची तुलना उद्धव ठाकरे यांनी जागतिक युद्धाशी केली. ते म्हणाले 1971 चं युद्ध आपण लक्षात ठेवलं पाहिजे. शत्रू कुठून हल्ला करेल माहित नाही. त्यामुळे घरात राहिलं पाहिजे. आपण घराबाहेर गेलो तर शत्रू घरात येईल. त्यामुळे घराबाहेर पडू नका असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा केलं.

 तसंच ज्यांच तळहातावर पोट आहे त्यांची काळजी सरकार घेणार आहे. सरकारच्या मदतीला आज अनेक हात येत आहेत. ज्या कंपन्यांनी त्यांचं उत्पादन बंद ठेवलं आहे त्या कंपन्यांना आम्ही विनंती केली आहे की माणुसकीचा विचार करुन त्यांचं किमान वेतन कापू नका अशीही विनंती उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तसंच कोणत्याही परिस्थितीत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, किराणा, भाजीपाला, वैद्यकीय सेवा बंद करणार नाही असंही त्यांनी सांगितलं आहे.

अवश्य वाचा

भाजपचे यश ः शोध आणि बोध