नवी दिल्ली  

कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी आता भारताचा माजी सलामीवीर आणि भाजपचा खासदार गौतम गंभीर पुढे सरसावला आहे. गंभीरने कोरोनाग्रस्तांसाठी 50 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

कोरोनाचा कहर जगभराबरोबर भारतातही सुरु आहे. त्यामुळे भारतातील काही राज्यांमध्ये संचारबंदीही लागू केली आहे. दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे त्यांच्या उपचारांसाठी पैसे कमी पडू नयेत, यासाठी गंभीरने 50 लाख रुपयांची मदत केली आहे.

गंभीरने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये गंभीरने म्हटले आहे की,  कोरोनाग्रस्तांसाठी वैद्यकीय मदत आपल्या राज्याला लागू शकते. कोरोनाग्रस्तांसाठी जी वैद्यकीय उपकरणे लागतील त्यासाठी मी माझ्या खासदार निधीतून 50 लाख रुपयांची मदत राज्य सरकारला करत आहे.

गंभीर हा एक सजग खासदार आहे, असे म्हटले जाते. कारण, जेव्हा संचारबंदी लागली होती, तेव्हाही त्याने लोकांना घरी राहण्याचे आवाहन केले होते.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आणखी कठोर पाऊल उचलले आहे. राज्यात सर्वत्र 31 मार्चपर्यंत संचारबंदी लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या सीमा सील करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले. संचारबंदीदरम्यान रस्त्यावर पाचपेक्षा अधिक लोकांनी एकत्र येऊ नये, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

महाराष्ट्राबरोबर भारतातील अन्य राज्यांमध्येही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या लॉकडाऊनच्या नियमांचे पालन केले नाही तर तुरुंगवास भोगावा लागू शकतो, असा इशारा खासदार आणि भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने दिला होता.

गंभीरने याबाबत एक ट्विट पोस्ट केले होते. या ट्विटमध्ये गंभीर म्हणाला की, संपूर्ण समाजासाठी तुम्ही धोका बनू नका. युद्ध नोकरी किंवा व्यापाराबरोबर नाही, तर आयुष्याबरोबर आहे. ज्या व्यक्ती अत्यावश्यक सेवा देत आहेत, त्यांना अडचण निर्माण होईल, असे कोणतेही काम तुम्ही करू नका. आता तुम्हाला एकांतावासामध्ये जायचे आहे की जेलमध्ये, हे तुम्हीच ठरवा. नियमांचे पालन करा. जय हिंद.

अवश्य वाचा

भाजपचे यश ः शोध आणि बोध