कोलकाता

संपूर्ण जग कोरोनाविरुद्ध लढत आहे. भारतात देखील कोरोनाचे मोठे संकट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. क्रीडा क्षेत्रातील अनेक जण कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढ्यात पुढाकार घेत आहेत. काही जण आर्थिक स्वरुपात, तर काही जण अन्य गोष्टींची मदत करत आहेत. अशातच जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना असलेल्या बीसीसीआयने सरकारला एक ऑफर दिली आहे.

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीने भारतातील सर्वात मोठ्या क्रिकेट मैदानाचे दरवाजे उघडे करण्याची तयारी दाखवली आहे. गांगुलीने कोलकाता शहरातील इडन गार्डन्स मैदान पश्‍चिम बंगाल सरकारसाठी खुले करण्याची तयारी असल्याचे सांगितले आहे. राज्य सरकार क्वॉरंटाइन आणि वैद्यकीय सुविधेसाठी या मैदानाचा वापर करू शकते, असे गांगुलीने म्हटले आहे.

जर सरकारला कोरोनाविरुद्धच्या वैद्यकीय सुविधेसाठी मैदान हवे असेल, तर आम्ही ते उपलब्ध करून देण्यास तयार आहोत. त्याचबरोबर बीसीसीआय काही गरजेच्या वस्तूदेखील देऊ शकते, असे गांगुलीने म्हटले आहे.

कोरोनाविरुद्ध अनेक जण मदतीचा हात पुढे करत आहेत. अशात जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना अद्याप मागे कशी, असा सवाल गेल्या काही दिवसांपासून विचारला जात आहे. पण, आता गांगुलीने देशातील सर्वात मोठे क्रिकेट मैदान उपलब्ध करुन देण्याची तयारी दाखवली आहे.

कोरोना व्हायरसविरुद्ध लढणार्‍या देशासाठी मदत करण्यासंदर्भात बीसीसीआयचे सचिव जय शहा यांच्याशी चर्चा करणार असल्याचे गांगुलीने म्हटले आहे. संपूर्ण भारतात लॉकडाऊन करण्यात आले आहे. कोलकाता शहरदेखील बंद आहे. राज्यात कोरोनाचे नऊ रुग्ण आढळले आहेत.

बीसीसीआयच्या आधी शेजारच्या श्रीलंकेतील क्रिकेट बोर्डाने कोरोनाविरुद्धच्या लढाईत सरकारला एक कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती. तर फुटबॉलपटू लियोनेल मेसी आणि मॅनचेस्टर सिटीचे मॅनेजर पेप गॉर्डिओला यांनी कोरोना व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी दहा लाख युरो म्हणजेच तब्बल आठ कोटी 20 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे.

 

अवश्य वाचा

भाजपचे यश ः शोध आणि बोध