चंदीगड  

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना कोरोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. डॉक्टर आणि रुग्णालयातील इतर सहकार्‍यांच्या अथक परिश्रमामुळे जवळपास लाखभर लोक कोरोनातून पूर्णपणे बरे झाले असल्याची माहिती आहे. त्यामुळे योग्य ती काळजी आणि उपचार घेतल्यास हा आजार बरा होऊ शकतो, यावर सार्‍यांचा विश्‍वास असून, भारतातही याबाबत जनजागृती केली जात आहे.

कोरोनाचा क्रीडा क्षेत्रालाही फटका बसला असून, सर्व क्रीडा स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. सुरू असलेल्या काही क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही स्पर्धा स्थगित करण्यात आल्या आहेत. ऑलिम्पिक स्पर्धादेखील लांबणीवर टाकण्यात आली आहे. यादरम्यान कोरोनाग्रस्तांसाठी कुस्तीपटू बजरंग पुनिया याने मदतीचा हात दिला आहे. बजरंग पुनियाने आपले सहा महिन्यांचे वेतन हरियाणा सरकारच्या कोरोनाग्रस्तांच्या मदत निधीमध्ये दान केले आहे. ट्विटरवरुन त्याने याबाबत घोषणा केली.

काही क्रीडापटूंना ऑलिम्पिक स्पर्धा महत्त्वाची वाटत आहे, तर काही क्रीडापटू सध्या स्पर्धेचा विचार नको, अशा भावना व्यक्त करत आहेत. यादरम्यान भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनिया याने मत व्यक्त केले आहे. सध्या कोरोना विषाणूमुळे जगभरात जे काही सुरू आहे, त्यामुळे ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलावी, असंच मला तरी वाटतं. कारण, आताचा काळ सार्‍यांसाठीच कसोटीचा आहे, असं पुनिया म्हणाला.

ऑलिम्पिक समितीने नियोजित वेळापत्रकानुसार स्पर्धा सुरू केली आणि इतर देशाचे खेळाडू सहभागी झाले तर आम्हालाही जावंच लागेल. पण, सध्या तरी त्यांनी परिस्थिती सामान्य होण्याची वाट पाहायली हवी. कारण, जिवंत राहिलो तरच खेळू शकतो.. जीव गमवावा लागला तर ऑलिम्पिक खेळून काय उपयोग? असं रोखठोक मत पुनियाने व्यक्त केलं.

 

अवश्य वाचा

भाजपचे यश ः शोध आणि बोध