टोकियो  

जगभरात कोरोना व्हायरसच्या प्रकोपाचे जीवघेणे वादळ शमण्याचे नाव घेत नसताना टोकियो ऑलिम्पिकला देखील त्याचा जबरदस्त फटका बसला आहे. यंदाची ऑलिम्पिक स्पर्धा एका वर्षाने लांबणीवर टाकण्याचा निर्णय आयोजकांना मंगळवारी जाहीर करावा लागला. जपानचे पंतप्रधान शिन्झो अ‍ॅबे व आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष थॉमस बाक यांच्यात चर्चा झाली आणि त्यानंतर जपान व आयओसी यांनी संयुक्त पत्रक जारी करत या निर्णयावर शिक्कामोर्तब केले.

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयवोसी) टोकियो ऑलिम्पिकबाबत ठोस निर्णय घ्यावा, या मागणीवरुन मंगळवारी अमेरिकेनेही आक्रमक पवित्रा घेतला होता. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने चार आठवड्यानंतर परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका मांडली होती. त्यावर जगभरातील अ‍ॅथलिटस्नी टीकेचे आसूड ओढले. यामुळे आयओसीला याबाबत गांभीर्याने निर्णय घ्यावा लागला.

कॅनडा व ऑस्ट्रेलिया या संघांनी ऑलिम्पिकमधून माघार जाहीर केल्यानंतर अमेरिकन ऑलिम्पिक संघटनेने स्पर्धा लांबणीवर टाकणे हाच सध्याच्या घडीला सर्वोत्तम पर्याय असल्याचे नमूद केले होते. जागतिक स्तरावरील विविध ऑलिम्पिक संघटना व वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्ससारख्या क्रीडा कार्यकारिणीने ही स्पर्धा लांबणीवर टाकावी, अशी मागणी यापूर्वीपासूनच केली होती. मात्र, आयओसीने आतापर्यंत थांबा व पाहा अशी भूमिका घेणे अधिक पसंत केले होते.

प्रत्यक्ष स्पर्धेला अद्याप जवळपास चार महिन्यांचा कालावधी हाताशी बाकी असल्याने आताच स्पर्धा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेणे घाईचे ठरेल, असे आयओसीने म्हटले. पण, 24 तासांचा कालावधी उलटण्यापूर्वीच त्यांना प्रतिकूल निर्णय घ्यावा लागला.

अमेरिकन ऑलिम्पिक पथकाने यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेबाबत सर्वेक्षण केले असून, त्यात स्पर्धा लांबणीवर टाकावी का, असा प्रश्‍न 1780 अमेरिकन अ‍ॅथलिटसमोर ठेवला. त्यात 68 टक्के अ‍ॅथलिटस्नी ही स्पर्धा लांबणीवर टाकणे बेहत्तर ठरेल, असे नमूद केले होते. कोरोना व्हायरसच्या प्रकोपामुळे ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा पूर्णपणे ठप्प झाल्या असून, स्पर्धेच्या तयारीतही अडथळे आले आहेत. काही देशांनी घरी थांबून राहण्याचे सक्त आदेश जारी केले आहेत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासावर कमालीची बंधने आली आहेत. अमेरिकेच्या जलतरण व ट्रक अँड फिल्ड पथकाने आपल्या ऑलिम्पिक संघटनेशी यापूर्वीच संपर्क साधत स्पर्धा लांबणीवर टाकण्याची मागणी केली होती.

दरम्यान, ब्रिटिश ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष ह्यूज रॉबर्टसन यांनी व्हायरसचा प्रकोप असाच कायम राहिला तर आपण आपले पथक पाठवू शकणार नाही, असे स्पष्ट केले होते. एकीकडे, स्पर्धेला विरोध कायम असताना, गुरुवारपासून जपानमध्ये ऑलिम्पिक क्रीडा ज्योतीच्या दौडीला सुरुवात होणे अपेक्षित होते. ते ही आता रद्दबातल झाले आहे.

ब्रिटिश सायकलिस्ट कॅलम स्किनरने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक यांच्यावर जोरदार टीका केली. बाक यांना कोणत्याही परिस्थितीत ही स्पर्धा यशस्वी करुन दाखवायची होती. पण, ते यासाठी खेळाडूंना पणाला लावत होते, अशी टीका कॅलमने केली. 

अवश्य वाचा

भाजपचे यश ः शोध आणि बोध