अलिबाग 

कोरोना करोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भाने जनता त्रस्त झाली असून या परिस्थितीत केंद्र सरकारने अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना किमान सहा महिने दरमहा 3 हजार रुपये द्यावेत. तसेच रेशनवरील जीवनावश्यक वस्तूंचा साठा वाढविण्याबरोबरच केशरी रेशन कार्ड धारकांना दरमहा मोफत तांदूळासह जीवनावश्यक वस्तू द्याव्यात अशी मागणी भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.

जगभरात कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाने जगभरात मंदीची लाट आली आहे. भारतालाही या व्हायरसचा मोठा फटका सहन करावा लागत आहे. अनेकांचे रोजगार या मंदीच्या तडाख्याने जाणार आहे. याचा सर्वाधिक फटका देशातील सर्वसामान्य शेतकरी कामगार वर्ग तसेच अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना बसत आहे. या पार्श्‍वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने विविध मागण्या सरकारकडे करण्यात आल्या आहेत. तसेच काही प्रस्ताव सुचविण्यात आले आहेत, यात रोख राखीव प्रमाण (सीआरआर) आणि वैधानिक तरलता प्रमाण (एसएलआर) मध्ये सध्याच्या मूल्याच्या 50  टक्के च्या मर्यादेपर्यंत कपात करावी.शासकीय रोखे खरेदीसह 100 अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या मर्यादेपर्यंत कर्ज देण्याच्या कार्यक्रमाची सुरूवात करावी.

 वर्तमान होल्डिंगच्या वैयक्तिक इक्विटी विक्रीवर 50 टक्के  मर्यादेपर्यंत निर्बंध घालावेत. म्युच्युअल फंड्स (एमएफ), भविष्य निर्वाह निधी (पीएफ), पोस्टल बचत योजना (पीएसएस), विमा पॉलिसींवर  50  टक्केपर्यंत मूल्याचे विमोचन करावे. मुदत ठेवी (टीडी) च्या तरलतेवर 50 टक्क्यापर्यंत निर्बंध आणावेत. गोल्ड लोन (जीएल) आणि डिमांड लोन (डीएल) चे मूल्य 50 टक्क्यांपर्यंत मर्यादित करावे. लॉकडाउन चालू असेपर्यंत कर्जाची परतफेड थांबवावी. ज्यांना सरकार थेट लाभ विविध सवलतींचा देते त्या अल्प उत्पन्न गटातील लोकांना किमान सहा महिने दरमहा तीन हजार रुपये द्यावेत.  रेशनवरील जीवनावश्यक वस्तूंचा साठा वाढवावा. केशरी रेशन कार्ड धारकांना दरमहा मोफत तांदूळासह जीवनावश्यक वस्तू द्याव्यात. असे प्रस्ताव केंद्र सरकारला सुचविण्यात आले आहेत.

या उपायांमुळे जनतेला होणारा आर्थिक जाच काही प्रमाणात नक्कीच कमी होऊ शकतो. जनतेला दिलासा देऊन,  एक  परिपक्व व  जबाबदार राष्ट्र म्हणून आपल्याला एकत्रितपणे महामारीच्या संकटाचा  सामना करण्याची गरज आहे.

अवश्य वाचा

भाजपचे यश ः शोध आणि बोध