मराठी नववर्षदिन म्हणजेच गुढीपाडवा. या सणाचं वेगळंच महत्त्व आहे. गुढीपाडवा हे मराठी संस्कृती, परंपरेचं प्रतीक. या दिवशी घरोघरी गुढ्या उभारल्या जातात. गोडाधोडाचा स्वयंपाक होतो. उत्सवप्रेमी मराठी माणूस नववर्षाचं मोठ्या उत्साहात स्वागत करतो. गेल्या काही वर्षांपासून गुढीपाडव्याला भव्य स्वागतयात्रा काढल्या जातात. या स्वागतयात्रांमधून मराठी संस्कृतीचं दर्शन घडतं. रस्त्यांवर रांगोळ्या काढल्या जातात. पारंपरिक पेहराव केलेले मराठीजन ढोल-ताशाच्या गजरात, लेझीमच्या तालावर नववर्षाचं स्वागत करतात. या स्वागतयात्रांमधला तरुणाईचा सहभाग लक्ष वेधून घेतो. गुढीपाडवा याच चैतन्याचं, उल्हासाचं, उत्साहाचं प्रतीक आहे. चराचरात नवनिर्मितीची ओढ जागवणारा असा हा सण. गुढीपाडवा आपल्याला खूप काही देऊन जातो. याच काळात निसर्गही कूस बदलत असतो. चैतन्यरुपी वसंताचं आगमन झालेलं असतं. याच आनंदात कोकिळेला कंठ फुटतो. तिचं कर्णमधुर कुजन मनात वेगळीच संवेदना जागवतं. झाडांना, वेलींना नवी पालवी फुटलेली असते. ही येत्या काळातल्या बहराची सुरुवात असते. शिशिरातली पानगळती, कोरडेपणा, भकासपणा दूर सारून निसर्गही नवनिर्मितीचा संदेश देत असतो. हिरवाईचं लेणं ल्यालेली धरित्री मन मोहवून टाकते. म्हणूनच गुढीपाडव्याचा सण फक्त नववर्षापुरता मर्यादित राहात नाही. त्याला इतरही असंख्य आयाम जोडलेले असतात. हा सण प्रत्येकाच्या मनात नवचेतना जागवून जातो. जीवनातलं औदासिन्य, मरगळ दूर करून नव्या, सकारात्मक गोष्टींचा स्वीकार करण्याची शिकवण गुढीपाडवा देत असतो.

गुढीपाडव्याचा हा सण नेहमीच मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा होतो. पण, यंदा कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचं सावट या सणावर पडलं आहे. शोभायात्रा, स्वागतयात्रा रद्द करण्यात आल्या आहेत. कोरोना विषाणू ही संपूर्ण जगावर आलेली आपत्ती आहे. ती दूर व्हावी, हीच माझी मनोकामना आहे. यंदा गुढीपाडवा घरीच साजरा करावा लागणार आहे. घरात गुढी उभारून, गोडाधोडाचा स्वयंपाक करून हा सण साजरा होणार आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आपण सर्वांनीच काळजी घ्यायला हवी. या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. सणाच्या निमित्ताने आपण एकत्र येत असतो. आपल्यातली एकी दाखवतो. पण, आता या विषाणुरुपी संकटावर मात करण्यासाठी आपण एकत्र यायला हवं. प्रभू रामचंद्राने रावणाचा वध केला. रावणाच्या रुपातली कुप्रवृत्ती संपवली. रामचंद्र सीतामाईला घेऊन चैत्र शुक्ल प्रतिपदेला अयोध्येत परतले. हा आनंद साजरा करण्यासाठी अयोध्यावासियांनी गुढ्या उभारल्या, घरादाराला तोरणं बांधली. हा विजयोत्सव होता. रावणाच्या त्रासातून मुक्त झाल्याच्या आनंदात लोकांनी मोठा जल्लोष केला. आज पुन्हा कोरोनारुपी विषाणूला हरवण्याचं आव्हान आपल्यासमोर आहे. या आव्हानावर, संकटावर आपण नक्कीच मात करू, असा विश्‍वास मला वाटतो.

नववर्षानिमित्ताने प्रत्येकजण संकल्प करत असतो. कोणाला काही नवं सुरू करायचं असतं. कोणी एखादं व्यसन सोडण्याचा संकल्प करतं. असाच एक संकल्प आपण सर्वांनीच करायला हवा. हा संकल्प आहे कोरोनाविरोधात लढण्याचा. त्याबाबत जागरूकता निर्माण करण्याचा. आपली आणि इतरांची काळजीही आपणच घ्यायला हवी. गुढीपाडव्याच्या निमित्ताने निसर्गाकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन विकसित होतो. निसर्गाचं जतन-संवर्धन करणं किती गरजेचं आहे हे या निमित्ताने आपल्या समोर आलं आहे. माणसाने निसर्गाला अक्षरश: ओरबाडलं. याच कारणामुळे कोरोनासारखे विषाणू आपला घात करत आहेत. अमेरिकेसारखी महासत्ताही इवल्याशा विषाणूपुढे हतबल झाली आहे. निसर्गापुढे आपण खुजे आहोत, हेच आता दिसून आलं आहे. यातून आपण धडा घ्यायला हवा. माणसाने आजवर अनेक संकटांवर यशस्वीपणे मात केली आहे. आज अनेक शास्त्रज्ञ, संशोधक कोरोनावर लस शोधण्याचे आटोकाट प्रयत्न करत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊ दे, हीच प्रार्थना मला याप्रसंगी करावीशी वाटते.

गुढीपाडव्याच्या पार्श्‍वभूमीवर वाईट गोष्टींचा नाश व्हायला हवा. आपल्या आसपास बरीच कुकर्म घडत असतात. आज मुली, महिला सुरक्षित नाहीत. त्यांना सुरक्षा देण्यासाठी काय करता येईल, याचा विचार व्हायला हवा. कोणीही अन्यायाला खतपाणी घालू नये. एखाद्यावर अन्याय होत असेल तर थांबवायला हवा. आपल्यातली एकी दिसली पाहिजे. महिलांवर अन्याय होत असेल, तर लोकांनी पुढे येऊन हे प्रकार थांबवायला हवेत. आपण स्वार्थी होत चाललो आहोत, आपल्यापुरता विचार करत आहोत. ही स्वार्थी वृत्ती बाजूला सारण्याची गरज आहे. हा संकल्प प्रत्येकानेच करायला हवा. गुढी उभारताना महिलांच्या सुरक्षेचा वसा घ्यायला हवा. महिलांवर अन्याय होत असताना आपण गप्प बसू नये, हा विचार मनात रुजवूनच पुढे जायला हवं. दुसरं म्हणजे निसर्गाचा र्‍हास थांबवून संवर्धन करायला हवं. प्रत्येकानेच गुढीपाडव्याला पाच झाडं लावण्याचा संकल्प करावा. घरात गुढी उभारल्यानंतर निसर्गालाही झाडरुपी गुढीची भेट द्यावी. आपल्याकडे करण्यासारखं खूप काही आहे. निसर्गाला खूप काही परत देता येईल. एखाद्याच्या शिक्षणाला हातभार लावता येईल. पण, यासाठी एक पाऊल पुढे टाकण्याची गरज आहे. आपण या दृष्टीने गुढीपाडव्याला एक चांगली सुरुवात नक्कीच करू शकतो.

नव्या संकल्पनांना मूर्त रुप देण्याचं सण हे खूप चांगलं निमित्त असतं. त्यातही गुढीपाडवा साडेतीन मुहुर्तांपैकी एक. गुढीपाडवा म्हटलं की दुसरं काही बघावं लागत नाही. या दिवशी नव्या गोष्टींची सुरुवात होत असते. आम्हीही गुढीपाडव्याला चित्रपटांच्या, मालिकांच्या चित्रिकरणाला सुरुवात करतो. हा मुहूर्त साधण्याचा आटोकाट प्रयत्न होत असतो. आताही आम्ही आई काळूबाईवर मालिका करणार आहोत. गुढीपाडव्याला या मालिकेचा मुहूर्त करण्याचा मानस होता. पण, कोरोनामुळे त्याचं चित्रिकरण पुढे ढकलावं लागलं. असं क्वचितच घडतं. गुढीपाडव्याचं माझ्या आयुष्यात मोठं महत्त्व आहे. राहत्या घराची वास्तूशांतही आम्ही गुढीपाडव्यालाच केली होती. या दिवशी आम्ही ठरवून बर्‍याच चांगल्या गोष्टी केल्या आहेत. आमच्या आयुष्याची नवी सुरुवातही गुढीपाडव्यालाच झाल्यामुळे हा सण माझ्यासाठी खास आहे. लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा मला अजूनही आठवतो. समीरशी लग्न झाल्यानंतर मी गुढीपाडवा खर्‍या अर्थाने साजरा करू लागले. समीरने मला गुढीपाडव्याला साडी घेतली. दागिनाही केला. अशा या खूप गोड आठवणी माझ्यासोबत आहेत. प्रत्येक गुढीपाडव्याला या आठवणींना उजाळा मिळतो आणि या आठवणीच सण नव्याने साजरा करण्याची ऊर्मी देऊन जातात.

अवश्य वाचा

भाजपचे यश ः शोध आणि बोध