मुंबई  

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठा विपरीत परिणाम होत असून पुढच्या महिन्यापर्यंत तो नियंत्रणात आला नाही तर देशाला फार मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागेल. महाराष्ट्रात कोरोनाच्या फैलावापासून रोखतानाच सरकारने असंघटित, लघु तसेच मध्यम उद्योगांना पैसा पुरविण्याची गरज आहे, असे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

देशातल्या कोरोनाग्रस्तांतील जास्त संख्या महाराष्ट्रात आहे. आपण आपली अर्थव्यवस्था सुधारू शकतो. परंतु राज्यातल्या जनतेचे आरोग्य महत्त्वाचे आहे. मात्र, त्याचवेळी असंघटित क्षेत्रातल्या कामगारांचाही विचार होणे गरजेचे आहे. रोजंदारीवर जगणार्‍या कामगारांचे कोरोनामुळे प्रचंड नुकसान होत आहे. त्यांना त्यांच्या कंत्राटदारांकडू किंवा सरकारकडून वेतन मिळेल, हे शासनाने सुनिश्‍चित करावे. सरकार कोरोनाच्या साथीला रोखण्याचे प्रयत्न करत आहे. परंतु जर ही साथ 31 मार्चपर्यंत नियंत्रणात आली नाही तर सरकारला प्रत्येक क्षेत्राची काळजी घेणे भाग पडेल, असेही ते म्हणाले.

राज्य सरकारच्या कामगारविषयक महामंडळाकडे बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी पाच हजार कोटी असेच पडून आहेत. बांधकाम क्षेत्रातल्या कामगारांना वेतन देण्यासाठी त्याचा वापर करता येईल. अशा पद्धतीनेच असंघटित कामगारांना मदत करता येऊ शकते. त्याशिवाय कामगारांना वेतन देणार्‍या कंत्राटदारांच्या करातून तितकी रक्कम वजा करता येऊ शकते. अशा कामगारांना पुढचे काही दिवस किंवा महिने शिधावाटप केंद्रांतून धान्य देता येईल. मात्र, यासाठी त्यांच्या आधार क्रमांकाचा वापर करावा जेणेकरून त्याचा गैरफायदा घेता येणार नाही, असेही फडणवीस म्हणाले. केंद्र तसेच राज्य सरकारने कॉर्पोरेशन टॅक्स, जीएसटीसारख्या करांसाठी एक ते महिन्यांची मुदतवाढ द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

 

अवश्य वाचा

भाजपचे यश ः शोध आणि बोध