कोरोना विषाणूच्या प्रकोपामुळे जोरदार फटका सहन करणार्‍या क्षेत्रांमध्ये क्रीडाक्षेत्रही अपवाद नाही. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे टोकियो ऑलिम्पिकवर अनिश्‍चिततेचं सावट आहे. आयपीएल पुढे ढकलण्यात आली आहे. युरो कप, कोपा अमेरिकासारख्या महत्त्वाच्या फूटबॉल स्पर्धांचं आयोजन वर्षभरासाठी टळलं आहे. रिकाम्या मैदानात सामने खेळवले जात आहेत. यामुळे क्रीडाक्षेत्राचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे.

चीनमधल्या वुहान शहरात कोरोना विषाणूचा उगम झाला. कोरोनाने अनेकांचे बळी घेतले. या घातक, जीवघेण्या विषाणूने चीनची वेस ओलांडली. पार युरोप, अमेरिकेत कहर केला. सुरूवातीला चीनपुरता मर्यादित असणारा हा आजार संपूर्ण जगात पसरला आणि सुरू झाली ती कोरोना विषाणूची दहशत. कोरोनामुळे अमेरिकेसारख्या शक्तीशाली राष्ट्रानेही आणीबाणी जाहीर केली. अनेक देशांची अर्थव्यवस्था कोलमडली, उद्योगधंदे ठप्प झाले. अनेक क्षेत्रं कोरोनामुळे प्रभावित झाली. क्रीडाक्षेत्रही याला अपवाद राहिलं नाही. ऑलिम्पिकसारख्या कुंभमेळ्यावर कोरोना विषाणूचं सावट आहे. ही स्पर्धा पुढे ढकलण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतातही आयपीएल स्पर्धा 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. भारत सरकारने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर व्हिसावर बंधनं आणल्यामुळे परदेशी खेळाडू या स्पधेंत सहभागी होऊ शकणार नाहीत. त्यातच आयपीएलचे सामने रिकाम्या मैदानात खेळवण्याची शक्यता लक्षात घेता फ्रेंचायझींचं बरंच नुकसान होऊ शकतं.ऑलिम्पिक किंवा क्रिकेटच नाही तर कोरोनाने संपूर्ण क्रीडाक्षेत्रालाच विळखा घातला आहे. बर्‍याच क्रीडा स्पर्धा रद्द किंवा स्थगित करण्यात आल्या आहेत. फूटबॉल, बास्केटबॉल, बेसबॉलसारख्या खेळांच्या स्पर्धांवर गदा आल्यामुळे अनेक देशांना मोठं आर्थिक नुकसान सोसावं लागणार आहे.

फूटबॉल खेळणार्‍या देशांची संख्या खूप जास्त आहे. कोरोनामुळे आयोजकांवर फूटबॉलच्या लीग स्पर्धा रद्द करण्याची वेळ आली आहे. युरो कप आणि कोपा अमेरिकासारख्या  अत्यंत प्रतिष्ठेच्या फूटबॉल स्पर्धा वर्षभरासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. 2016 मध्ये युरो कप स्पर्धा झाली होती. त्यावेळी 16,280 कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. आता ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्यामुळे हा महसूल बुडणार आहे. त्यामुळे आयोजक संघटनेने सदस्य देशांकडून नुकसानभरपाई म्हणून भारतीय चलनात 2470 कोटी रुपयांची मागणी केली आहे. ही मागणी पूर्ण होणार का, हे येत्या काळात कळेल. दरम्यान, पुढील वर्षी म्हणजे 2021 च्या जून-जुलै महिन्यात चीनमध्ये फिफा क्लब विश्‍वचषक स्पर्धा रंगणार होती. मात्र या स्पर्धेवरही अनिश्‍चिततेचं सावट आहे. याच काळात युरो कप खेळवण्यात येणार असल्यामुळे चीनमध्ये पहिल्यांदाच होणारी क्लब पातळीवरची ही विश्‍वचषक स्पर्धा रद्द होऊ शकते. इटलीमध्ये कोरोना व्हायरसने कहर केला आहे. या देशातले क्लब पातळीवरचे सामने प्रेक्षकांविनाच खेळवले जात आहेत. तीन एप्रिलपर्यंत प्रेक्षकांना मैदानात येण्यात बंदी घालण्यात आली आहे. स्वीत्झर्लंडनेही आपल्या देशातली फूटबॉल लीग स्पर्धा 23 मार्चपर्यंत स्थगित केली आहे. इराणमध्येही फूटबॉल सामने स्थगित करण्यात आले आहेत. चीनमध्येही लीग हंगामाला सुरूवात झालेली नाही. एशियन चॅम्पियन्स लीगही एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. दक्षिण कोरिया, जपानमधली परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही. कोरोनाबाधीत देशांनीही क्रीडा स्पर्धा स्थगित किंवा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

टेनिसविश्‍वातली महत्त्वाची फ्रेंच ओपन ही ग्रँड स्लॅम स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे. 24 मे ते सात जून या कालावधीत रंगणारी ही स्पर्धा आता 20 सप्टेंबर ते चार ऑक्टोबरदरम्यान खेळवली जाईल. अमेरिकन ओपन स्पर्धा संपल्यानंतर आठवड्याभरातच खेळाडूंना क्ले कोर्टवर उतरावं लागणार आहे. फ्रान्समध्ये कोरोना विषाणू मोठ्या प्रमाणावर पसरला आहे. त्यामुळे फ्रेंच ओपन पुढे ढकलण्यावाचून पर्याय नसल्याचं फ्रेंच टेनिस फेडरेशनने म्हटलं आहे. अमेरिकेतल्या क्रीडा स्पर्धांनाही ब्रेक लागला आहे. बास्केटबॉलवर गंडांतर आलं आहे. कोरोना विषाणूचा धसका इतका प्रचंड आहे की कोट्यवधी डॉलर्सचं आर्थिक नुकसान नगण्य वाटू लागलं आहे. एनबीए एमएलबी, एमएलएस आणि एनएचएलने पुढील सूचनेपर्यंत स्पर्धा स्थगित केल्या आहेत तर एनसीएएने एक पाऊल पुढे टाकत मार्च मॅडनेस बास्केटबॉल स्पर्धा रद्द करण्याचा कठोर निर्णय घेतला आहे. आयोजकांना पैशांपेक्षाही आपल्या कर्मचार्‍यांचं आरोग्य आणि सुरक्षा महत्त्वाची वाटू लागली आहे.

एनसीएएने पुरुषआणि महिलांची बास्केटबॉल स्पर्धा रद्द केल्यामुळे खूप मोठं नुकसान होणार आहे. एनसीएएची पुरुषांची डिव्हिजन एक फूटबॉल स्पर्धा वर्षाला 867.5 दशलक्ष डॉलर्सचा महसूल मिळवते. हा महसूल टीव्ही आणि मार्केटिंग हक्कांमधून मिळतो. एनसीएएच्या वार्षिक महसुलात या स्पर्धेच्या महसुलाचा खूप मोठा वाटा आहे. 2019 मध्ये माध्यमांचे हक्क, तिकिटविक्री आणि प्रायोजकांच्या माध्यमातून एसीएएने 933 दशलक्ष डॉलर्स महसूल मिळवला होता. एनसीएएला या महसुलावर पाणी सोडावं लागणार आहे. सामने अचानक थांबवल्यामुळे एनबीएचंही बरंच नुकसान झालं आहे. चीनी प्रायोजकांसोबतच्या वादामुळे गेल्या वर्षी एनबीएला 200 दशलक्ष डॉलर्सचं नुकसान झालं होतं. या आर्थिक नुकसानातून एनबीए अद्याप सावरलेलं नाही. त्यातच आता कोरोना विषाणूमुळे एनबीएची आर्थिक गणितं कोलमडण्याची वेळ आली आहे. सामन्यांना स्थगिती देण्यात आल्यामुळे तिकिटव्रिकी आणि  जाहिरातींच्या माध्यमातून मिळणारा महसूल पूर्णपणे ठप्प झाला आहे. यामुळे खेळाडूंच्या मानधनातही कपात होणार आहे.

कोरोना विषाणूच्या दहशतीमुळे क्रिकेटही थांबलं आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या एकदिवसीय मालिकेतला पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर संपूर्ण मालिकाच स्थगित करण्यात आली. ऑस्ट्रेलियातली प्रथम श्रेणीची शेफिल्ड शिल्ड स्पर्धा रद्द करण्यात आली. ही स्पर्धा पहिल्या आणि दुसर्‍या जागतिक महायुद्धादरम्यान रद्द करण्यात आली होती. त्यानंतर कोरोनामुळे स्पर्धेवर गंडांतर आलं आहे. रोड सेफ्टी सिरिज ही स्पर्धाही रद्द झाली आहे. सचिन तेंडूलकर, वीरेंद्र सेहवाग, ब्रायन लारा, मुथय्या मुरलीधरनसारखे दिग्गज खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. इंग्लंडच्या संघाचा श्रीलंका दौराही स्थगित झाला आहे. क्रिकेट वर्ल्ड कप लीग 2 चे सामने रद्द झाले आहेत. तसंच काही सामने प्रेक्षकांविनाच खेळवण्यात आले. बीसीसीआयनेही देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला. तिकडे ऑलिम्पिक स्पर्धेपुढे प्रश्‍नचिन्ह उभं राहिलं असलं तरी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक महासंघ ही स्पर्धा निर्धारित वेळेत घेण्यावर ठाम आहे. 24 जुलै ते नऊ ऑगस्ट या कालावधीत  टोकियोमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहे. ऑलिम्पिक महासंघाच्या या निर्णयामुळे खेळाडू नाराज झाले आहेत. संघटनेला खेळाडूंचा जीव धोक्यात घालायचा आहे का, असा सवाल केला जात आहे. ऑलिम्पिकमध्ये अनेक देश सहभागी होतात. ऑलिम्पिकसाठी खेळाडू खूप मेहनत करतात. मात्र सध्या बरेच खेळाडू प्रशिक्षण शिबिरांमध्ये सहभागी व्हायला तयार नाहीत. त्यातच ऑलिम्पिक पात्रता फेरीच्या स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत फक्त दोन ते तीन महिन्यात सर्व काही सुरळीत होण्याची शक्यता खूप कमी आहे.

चीनने खेळाडू ऑलिम्पिकमध्ये जबरदस्त कामगिरी करतात. पण आता चीनी खेळाडूंच्या सहभागाबाबत काहीच सांगता येत नाही. टोकियोमध्ये होणारी जिम्नॅस्टिक्सची ऑलिम्पिक पात्रता फेरीची स्पर्धा रद्द झाली. त्यातच जपानच्या ऑलिम्पिक समितीच्या उपप्रमुखांनाही कोरोनाची लागण झाली. त्यामुळे ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलणं योग्य ठरेल, असं खेळाडूंचं म्हणणं आहे. कोरोना विषाणू आटोक्यात यायला अजून बराच काळ जावा लागणार आहे. त्यातच टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठी खेळाडू तयार होतील किंवा नाही याचीही शाश्‍वती नाही. त्यामुळे ऑलिम्पिक स्पर्धेचं काय होणार हे येत्या काळात स्पष्ट होईलच. सध्या तरी कोरोनाचं हे विघ्न लवकरात लवकर टळावं आणि खेळाची मैदानं पुन्हा गजबजून जावीत, एवढीच अपेक्षा क्रीडाचाहते करू शकतात.

...म्हणून आयपीएल पुढे ढकलली

आयपीएल स्पर्धा म्हणजे सोन्याचं अंडं देणारी कोंबडी. या स्पर्धेदरम्यान प्रचंड आर्थिक उलाढाल होते. आयपीएल रद्द केल्यास बीसीसीआय, प्रायोजक आणि फ्रँचायझींना मिळून तब्बल 3000 कोटी रुपयांचा फटका बसू शकतो. हे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी बीसीसीआयने आयपीएल पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. सद्यस्थितीत आयपीएल पुढे ढकलण्याचा निर्णय बीसीसीआयला तारू शकतो. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणू ही जागतिक महामारी घोषित केली. मात्र त्यानंतरही बीसीसीआयने आयपीएलबाबत कोणताही निर्णय घेतला नव्हता. त्यामुळे बीसीसीआयवर बरीच टीका झाली. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आयपीएल रद्द करावी, अशी मागणी होऊ लागली. त्यातच केंद्र सरकारने व्हिसाबाबतचे नियम कडक केल्यामुळे परदेशी खेळाडूंनाही स्पर्धेत सहभागी होता येणार नव्हतं. मग नुुकसान टाळण्यासाठी ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली.

अवश्य वाचा

भाजपचे यश ः शोध आणि बोध