भोपाळ  

मध्य प्रदेशात गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या राजकीय नाट्याची सांगता अखेर झाली आहे. सुप्रीम कोर्टाने कमलनाथ सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंतची वेळ दिली असताना  त्या अगोदरच मुख्यमंत्री कमलनाथ यांनी राजिनामा दिला तर दुसरीकडे विधानसभा अध्यक्ष एनपी प्रजापती यांनी 16 बंडखोर आमदारांचे राजीनामेही स्वीकारले आहेत.

 मध्य प्रदेशात काँग्रेसला बहुमत मिळून सुद्धा राजकीय स्वार्थापोटी भाजपने येथील जनतेला दगा दिला असा आरोप मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केला. त्यांनी   पत्रकार परिषदेत आपल्या सरकारने राज्यासाठी केलेल्या कामांचा पाढा वाचला. तसेच भाजपकडून कशा स्वरुपाचे राजकीय षडयंत्र रचले जात आहे त्याबद्दल आरोप केले.

भाजपकडून आमदार फोडण्यासाठी राज्यात मोठ्या प्रमाणात घोडेबाजार झाला. आमदार विकत घेण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. काँग्रेसचे 22 आमदार बंगळुरूला नेऊन चक्क ओलीस ठेवण्यात आले असेही कमलनाथ म्हणाले. भाजपला 15 वर्षे मध्य प्रदेशची सत्ता मिळाली होती. यावेळी लोकांनी मला 5 वर्षांसाठी सत्ता दिली होती. यामध्ये आम्ही 15 महिने जनतेच्या हितासाठी काम केले.

भाजपने जे 15 वर्षांत केले नाही ते आम्ही 15 महिन्यांत करून दाखवले. 3 लाख शेतकर्‍यांचे कर्ज माफ केले. परंतु, भाजपला विकास आवडत नाही. मध्य प्रदेशातील जनता भाजपला माफ करणार नाही. तसेच काँग्रेस दगा देणार्‍यांना माफ करणार नाही असे सांगताना त्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांचाही खरपूस समाचार घेतला. हा षडयंत्र भाजप, एक महाराज आणि त्यांच्या चेल्यांनीच रचला होता असे नाव न घेता त्यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर टीका केली. 

 

अवश्य वाचा

भाजपचे यश ः शोध आणि बोध