कोरोना विषाणूच्या आक्रमणामुळे संपूर्ण जगच त्रस्त झालं असताना त्याचा मुकाबला करण्यासाठी अनेक देशांनी तंत्रज्ञानाची मदत घेतल्याचं पहायला मिळत आहे. यात मुख्यत: यंत्रमानव आणि कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’चा वापर केला जात आहे. अमेरिकेतल्या प्रसिद्ध टाईम स्क्वेअर चौकात ‘प्रोम्बो’ या प्रकारचा यंत्रमानव बसवण्यात आला असून, तो तिथे येणार्‍या लोकांना कोरोनापासून होणार्‍या रोगाची लक्षणं आणि त्याचा प्रसार रोखण्यासाठी काय करावं याची माहिती देतो. डेन्मार्कच्या ‘युव्हीडी रोबोज’ या कंपनीने अतिनील किरणांचं उत्सर्जन करणारा यंत्रमानव तयार केला आहे. हा यंत्रमानव हवेतल्या सर्व जीवाणू आणि विषाणूंचा नायनाट करून जागा निर्जंतूक करतो. यामुळे विशेषतः रुग्णालयांच्या कर्मचार्‍यांना कोणताही धोका न पत्करता कोरोनाचा फैलाव रोखता येऊ शकतो, असा दावा कंपनीने केला आहे. त्यांच्या मते, हा यंत्रमानव फिरताना तीव्र अतिनील किरणं उत्सर्जित करतो. या किरणांमुळे हवेतले जवळ जवळ सर्व सूक्ष्म जीवजंतू मारले जातात.

चीनमध्येही सुमारे दोन हजार रुग्णालयांमध्ये निर्जंतुकीकरणासाठी यंत्रमानवांची मदत घेतली जात आहे. पण, इथे हे यंत्रमानव सर्वत्र निर्जंतुकीकरणासाठी लागणारं रसायन (सॅनिटायझर) फवारतात. असे अनेक यंत्रमानव चीनमधून युरोप, अमेरिका आणि आशियामधल्या काही देशांमध्ये निर्यात केले जात आहेत. चीनमध्येच एक स्थानिक कंपनी कोरोनाबाधित रुग्णांचं निदान करण्यासाठी कृत्रिम बुध्दिमत्तेचा वापर करत असल्याचं समजतं. या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता माणसांकरवी एवढ्या मोठ्या प्रमाणावर रुग्णांचं निदान करणं शक्य नाही. बिजिंग शहरातल्या ‘इन्फर व्हिजन’ या कंपनीने यासाठीचं सॉफ्टवेअर तयार केलं असून, वुहान शहरातल्या झोंगनान या रुग्णालयात ते वापरलं जात आहे. त्याचबरोबर इ-कॉमर्समध्ये मोठं नाव असलेल्या अलिबाबा डॉट कॉम या कंपनीच्या ‘डॅमो अकॅडमी’ या संशोधन संस्थेनेही कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून एक प्रणाली तयार केली आहे. यामुळे कोरोनाबाधितांचं निदान करण्याची अचूकता 96 टक्क्यांंपर्यंत वाढली आहे. चीनमधल्या ‘बायडू’ या आणखी एका कंपनीने अशीच एक प्रणाली तयार केली असून, त्यामुळे कोरोनाबाधितांच्या निदानासाठी लागणारा वेळ 55 मिनिटांपासून 27 सेकंदांवर आला आहे. अमेरिकेतल्या ‘इन्सिनिको’ या कंपनीने कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ‘मशिन लर्निंग’ यांचा वापर करून कोरोना विषाणूंचा प्रतिकार करू शकणारे रेणू शोधून काढले आहेत. या कंपनीच्या मते त्यांनी केवळ चार दिवसांमध्ये असे हजारो नवे रेणू शोधून काढले आहेत. या रेणूंचा वापर औषधांमध्ये करता येईल. हे होऊ शकलं तर केवळ काही आठवड्यांच्या कालावधीतच या औषधांच्या मानवी चाचण्या सुरू करता येतील.

या चाचण्या सुरू करण्यासाठी वर्षभराचा कालावधी लागू शकतो. विविध देश तंत्रज्ञानाच्या मदतीने कोरोना विषाणूविरुद्धचं युद्ध लढण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यात त्यांना चांगलं यश मिळावं, हीच सदिच्छा. कोरोना विषाणूने सध्या जगभर हाहाकार माजवला आहे. याचे दूरगामी परिणाम अनेक देशांच्या (विशेषतः चीनवर) अर्थव्यवस्थेवर होत आहेत. परंतु, आजघडीला जगभरातल्या अनेक शहरांमध्ये याची लागण झाली आहे. इटलीमधलं व्हेनिस हे शहर आज ओस पडलं आहे. व्हेनिसमध्ये रोज किमान 30 लाख पर्यटक भेट देतात. आजमितीला ही संख्या शून्यावर आली आहे. राजधानी दिल्लीसह मुंबई, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद, कोच्ची आणि कोलकाताच्या विमानतळांवर थर्मल स्क्रिनिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. चीन, हाँगकाँग तसंच इतर काही देशांहून परतलेल्या प्रवाशांचं थर्मल स्क्रिनिंग करण्यात येत आहे. पर्यटन उद्योगाला कोरोनाचा सर्वात जास्त फटका बसतो आहे. अर्थात, या विषाणूने इतर अनेक उद्योगांना कमी-अधिक प्रमाणात ग्रासलं आहे. या विषाणूमुळे बाधित झालेला रुग्ण प्रथम वुहान शहरात आढळल्याने वुहान व्हायरस असं नाव ठेवण्यात आलं आहे. हा विषाणू कोरोना व्हायरसच्या कुटुंबाचा एक सदस्य आहे; ज्यामुळे सामान्य सर्दीसारख्या सौम्य परिस्थितीने सुरुवात होऊन त्याचं रूपांतर गंभीर तीव्र श्‍वसन सिंड्रोमसारख्या प्राणघातक रोगात होऊ शकतं. चीनने या विषाणूच्या मानवी संक्रमणाची पुष्टी केली आहे. जागतिक स्तरावर त्याचा वेगवान प्रसार होत आहे. लाखभर लोकांना त्याची लागण झाली असून, काही हजार व्यक्ती मृत्युमुखी पडल्या आहेत, तर अनेकजण गंभीर आहेत. याच्या निराकरणासाठी अनेक तंत्रज्ञान उद्योग आर्थिक, तांत्रिक आणि मनुष्यबळाचं योगदान देत आहेत.

चीनमधले मोठे उद्योजक जॅक मा यांनी मोठ्या प्रमाणावर आर्थिक तशीच तांत्रिक मदत देऊ केली आहे. अलिबाबा क्लाऊड वैज्ञानिक संशोधन संस्थांना एआय संगणकीय क्षमता विनामूल्य उपलब्ध करुन देत आहे. यावर प्रतिबंधक लस लवकरात लवकर उपलब्ध करण्यासाठी अनेक संशोधक अथक काम करत आहेत. प्राणघातक कोरोनाव्हायरस थांबवण्याचं रहस्य त्याच्या जीनोममध्ये लपलं आहे. चीनमधलं क्रमांक एकचं सर्च इंजिन असलेल्या बायडूने आपले जनुक अनुक्रम अल्गोरिदम वैज्ञानिकांना मोफत उपलब्ध करून दिले आहेत. अनेक देशांमधली हॉस्पिटल्स गजबजली आहेत. त्यामुळे अशा तपासण्यांचा वेग वाढला पाहिले आणि त्यासाठी सिंगापूरस्थित व्हेरडस लॅबोरेटरीजने पोर्टेबल लॅब-ऑन-चिप डिटेक्शन किट विकसित केलं आहे. यायोगे आपण बाधित आहोत का नाही हे प्रत्येक व्यक्ती स्वतःच ठरवू शकणार आहे.  

वैद्यकीय कर्मचार्‍यांना या विषाणूचा  संसर्ग होण्याचा धोका असतो. ते टाळण्यासाठी मेडिकल यंत्रमानव विकसित केले गेले आहेत. ते चिकित्सकांना स्क्रीनद्वारे रूग्णाशी संवाद साधू देतात. हे यंत्रमानव स्टेथोस्कोपसह सुसज्जदेखील आहेत. त्यामुळे रुग्णाला स्पर्श करायची गरजच रहात नाही. चीनमधील प्रमुख बाधित क्षेत्र असलेल्या वुहान इथे वैद्यकीय सामग्री औषधं वितरित करण्यासाठी ड्रोनचा वापर केला जात आहे. त्याचप्रमाणे विशेष रोबोज वापरुन वैद्यकीय कचरा वेगळा काढला जात आहे. मानवी हस्तक्षेप टाळून त्यावर प्रक्रिया होत आहे. चीन आणि इतर आशियाई देशांमध्ये ‘व्हीचॅट’ हे मेसेंजर अ‍ॅप स्मार्टफोनवर लोकप्रिय आहे. त्याचे एक अब्जाहून अधिक वापरकर्ते आहेत. या अ‍ॅपने वापरकर्त्यांना जवळचं रुग्णालय शोधण्यात मदत करण्यासाठी बाह्यरुग्ण क्लिनिक नकाशा लाँच केला आहे. कोरोनाच्या उद्रेकानंतर, जगभरात सोशल मीडियावर दहशत पसरली. फेसबुक, ट्विटर आणि लिंक्ड इनने विकृत प्रतिमाप्रसार टाळण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता अल्गोरिदम विकसित करून स्मार्ट यंत्रणेचा अवलंब सुरु केला आहे. ही आपत्ती हे एक जागतिक संकट मानून तंत्रउद्योग आणि संगणक व्यावसायिक जगभर आपल्या परीने आपला खारीचा वाटा उचलत आहेत. इंटरनेट, स्मार्टफोन आणि त्यामधील अ‍ॅप्समुळे चांगल्या दर्जाची आरोग्य सेवा, वैद्यकीय सल्ला आणि इतर सुविधा रुग्णांपर्यंत तातडीने (किंवा पुष्कळच वेळेत) पोहचवणं शक्य होत आहे.

अवश्य वाचा

भाजपचे यश ः शोध आणि बोध