कोरोनाने आपल्या सर्वांनाच धसका बसला आहे. मात्र, याने खचून जाण्याचे किंवा घाबरण्याचे कारण नाही. फक्त प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखून खबरदारी घेणे आवश्यक ठरले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात तातडीने निर्णय घेऊन कोरोनावर मात करण्यासाठी पंधरा दिवसांची सुट्टी जाहीर केली. तसेच सार्वजनिक ठिकाणी लोकांनी जमू नये, असे आवाहन केले. सरकारने तातडीने केलेली ही कारवाई स्वागतार्ह होतीच; परंतु, आता केवळ सरकारकडे डोळे लावून बसण्यापेक्षा प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून शक्यतो घरात बसून राहिले पाहिजे. तसेच आवश्यकता असल्यासच घराबाहेर पडले पाहिजे. अन्य कोणत्याही प्रकारच्या मेसेजवर विश्‍वास न ठेवता अधिकृत सरकारने जारी केलेली पत्रके किंवा डॉक्टरांच्या संघटनांनी जारी केलेल्या माहितीपत्रकांवरच विश्‍वास ठेवून तशी पावले उचलली पाहिजेत. महाराष्ट्राची राजधानी मुंबई आज ठप्प झाल्यासारख्या स्थितीत आहे. त्यातच कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे पहिला मृत्यू झाला आणि गेले काही आठवडे जगभर हैदोस घालणार्‍या या जीवघेण्या हल्ल्याच्या टप्प्यात आपण आलो आहोत, असे वाटणे साहजिक आहे. अर्थात, यामुळे घाबरुन जाण्याचे काहीच कारण नाही. कोरोनाविरुद्धची लढाई आपल्याला लढायची आहे व जिंकायची आहे. कोरोनाविषयी माहिती प्रसारित करीत असताना, लोकांना सजग करण्याच्या प्रयत्नांत विनाकारण भीतीचे वातावरण तयार करीत नाही ना, याचे तारतम्य बाळगले गेले पाहिजे. याची सर्वस्वी जबाबदारी प्रसार माध्यमांवर आहे. या आजाराची विनाकारण भीती वाढणार नाही, याची काळजी घेत असताना, आपल्याकडून निष्काळजीपणाकडेही दुर्लक्ष होता कामा नये. आपल्याकडे देशात आता अजूनही कोरोनाचे संशयित रुग्ण मर्यादित असले, तरी त्यांची संख्या झपाट्याने कधीही वाढू शकते. याची सर्वस्वी जबाबदारी नागरिकांची आहे. इकडे सरकार तुमच्या मदतीला येणार नाही. यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळले पाहिजे. निगराणीखाली असलेले लोक सतत वाढत आहेत किंवा एखाद्या नागरिकास जरा जरी संशय आल्यास त्याने लगेचच डॉक्टारांकडे जाऊन निगराणीखाली राहिले पाहिजे. माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी विदेश दौरा केल्याने खबरदारीचे उपाय म्हणून स्वत:हून पंधरा दिवस घरीच राहण्याचे ठरविले. अशा प्रकारची जागरुकता सर्वांमध्ये आल्यास आपण कोरोनाविरुद्ध मुकाबला करु शकतो. हा विषाणू मानवी संपर्काद्वारे पसरतो आणि तो चोवीस तास जिवंत राहू शकतो. त्यामुळे आपण स्वच्छतेचे नियम पाळणे, सजग राहणे आणि गर्दी टाळणे, हे त्यावरचे परिणामकारक मार्ग आहेत. गर्दीच्या अनेक ठिकाणी सरकारने अधिकृत बंद केली आहेत. यात शाळा, कॉलेज, मॉल इत्यादी ठिकाणांचा समावेश आहे. राज्यातील प्रमुख देवस्थानांनीही सरकारच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. सिद्धीविनायक, शिर्डीचे साई मंदिर, कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर, अहमदनगरचे विशाल गणेश मंदिर, शनी मारुती मंदिर ही प्रामुख्याने गर्दीची देवस्थाने सध्या बंद आहेत. यात मुस्लिम समाजानेही पुढाकार घेत अनेक ठिकाणचे नमाजच नव्हे, तर शुक्रवारचा नमाजही घरच्या घरी प्रत्येकाने करावा, असा निर्णय बहुतांशी ठिकाणी घेण्यात आला आहे. या विषाणूचे भयावह थैमान चीनपासून सुरु होऊन इटलीत पसरलेले दिसले आणि परिणामी 2500 हून अधिक जणांचा मृत्यू झाला. चीनमध्ये तर एक लाखाहून जास्त लोकांना त्याची लागण झाली व तीन हजारांहून जास्त लोकांना प्राण गमवावे लागले. त्याखालोखाल इटलीसह युरोपातील अनेक शहरांत लागण झाली असून, जवळपास 3000 जणांवर यशस्वी उपचार झाले आहेत. अमेरिकेत 116 जणांचा मृत्यू झाला आहे आणि 106 जणांवर यशस्वी उपचारही झाले आहेत. ज्यांना शक्य आहे, त्यांना घरुन काम करण्याची संधी देण्यात आली आहे. मात्र, घरी बसूनच काम करावे लागेल. त्यांना मोकाट फिरण्याचा परवाना दिलेला नाही. अशा प्रकारे सुट्टीचा फायदा घेणे म्हणजे खरोखरीच घरात बसणे, असा त्याच अर्थ आहे. हीच सर्व सुजाण नागरिकांची जबाबदारी आहे. समाधानाची बाब म्हणजे, अमेरिकेने कोरोना व्हायरसवर लस तयार केली आहे. ज्याची ट्रायल नुकतीच वॉशिंग्टन आरोग्य अनुसंधान संस्थेमध्ये झाली. ही लस अमेरिकन फार्मा कंपनी मॉडर्माने तयार केली आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर प्रत्यक्षात त्याचे व्यापारी उत्पादन तयार करण्यासाठी 18 महिन्यांचा कालावधी लागेल. ही लस जेनेटिक इंजिनिअरिंगवर आधारित आहे. जेव्हा रुग्णांना याचे इंजेक्शन दिले जाते, तेव्हा शरीरातील पेशी व्हायरसला छोट्या-छोट्या तुकड्यांमध्ये कापतात. तुड्यांच्या मदतीने शरीराची इम्यून सिस्टीम व्हायरस ओळखण्यास सुरुवात करते. इंजेक्शनमध्ये असलेले औषध आरएनएला प्रभावित करते, जे इम्यून सिस्टिमला आपले टार्गेट म्हणजेच व्हायरसला पकडण्याचा आदेश देते. वैज्ञानिक थेअरीनुसार, जेव्हा कृत्रिम आरएनए मनुष्याच्या शरीरात जातात, तेव्हा पेशींमध्ये पोहोचून जास्त प्रमाणात प्रोटीन तयार करू लागते. हे प्रोटीन व्हायरसच्या वरच्या स्तराशी मिळतेजुळते असते. जे इम्यून सिस्टीमवर दबाव बनवते की, मनुष्याला इजा न पोहोचवता विषाणूला पकडते. जगाच्या 157 देशांना कोरोनाने आपला निशाणा बनवले आहे. जगभरात 1,69,524 लोक अजूनही कोरोनाच्या जाळ्यात आहेत. आपल्या देशात अजूनही ही साथ मर्यादित आहे. मात्र, ही साथ वाढू न देणे, हे सर्वांच्या हातात आहे. खरे तर, ती आपली जबाबदारीच आहे.

 

अवश्य वाचा

मुंबईतील क्राइम रेट घटला.