सातारा 

राज्यसभेच्या खासदारपदी उदयनराजे भोसले यांची बिनविरोध निवड झाली आहे. बुधवारी या निवडीवर शिक्कामोर्तब झाले. उदयनराजे यांचे खंदे समर्थक ऍड. दत्ता बनकर व जितेंद्र खानविलकर यांनी निवडणूक आयोगाकडून उदयनराजेंच्या खासदारकीचे प्रमाणपत्र स्वीकारले.

राज्यसभेच्या सात जागांसाठी आठ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले होते. अर्जाच्या छाननीत एक अर्ज अवैध ठरला. त्यामुळे उर्वरित सात उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असून, भाजप नेते व माजी खासदार उदयनराजे भोसले यांची बिनविरोध निवड झाल्याचे निश्‍चित झाले होते. केवळ घोषणेची औपचारिकता बाकी होती. बुधवारी 18 मार्चला अर्ज मागे घेण्याची मुदत होती. छाननीमध्ये अपक्ष उमेदवाराचा अर्ज अवैध ठरल्याने सात जागा बिनविरोध ठरल्या. या बिनविरोध निवडीवर बुधवारी शिक्कामोर्तब झाले. राजे समर्थकांनी या निवडीचा आनंद व्यक्त करत उदयनराजे भोसले यांना शुभेच्छा दिल्या. आता श्रीनिवास पाटील, रणजितसिंह नाईक-निंबाळकर व उदयनराजे असे तीन खासदार जिल्ह्याला मिळाले आहेत.

लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर उदयनराजेंना राज्यसभेवर घेऊन त्यांचे पुर्नवसन करण्याचा भाजपच्या वरिष्ठांनी दिलेला शब्द खरा करण्यात आला. उदयनराजे यांच्या खासदारकीमुळे सातारा जिल्हा भाजपला मोठी ताकद मिळणार आहे. त्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा व भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याकडे पाठपुरावा केला होता.

 

 

अवश्य वाचा

भाजपचे यश ः शोध आणि बोध